मणिपूर : मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या घरांवर हल्ले

इम्फाळ; वृत्तसंस्था :  मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. संतप्त जमावाने मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या खासगी निवासस्थानावरही हल्ला केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. बिरेन सिंग त्या वेळी घरी नव्हते. अन्य मंत्र्यांच्या घरावरही हल्ले करण्यात आले.

राज्य सरकारने अलीकडेच इम्फाळमध्ये संचारबंदी लागू केली आहे. येथील तीन जणांच्या हत्येनंतर उसळलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सहा जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आंदोलकांनी इम्फाळमध्ये दोन मंत्री आणि तीन आमदारांच्या घरांवर हल्ला केला. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. मिळालेल्या माहितीनुसार, इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लानफेले संकेथेल येथील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन यांच्या निवासस्थानावरही जमावाने हल्ला केला. त्याचवेळी जमावाने ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री एल. सुसिंद्रो सिंग यांच्या घरालाही लक्ष्य केले.

मुख्यमंत्री सिंह यांचे जावई आणि भाजप आमदार आरके इमो यांच्या घराबाहेरही आंदोलक जमले होते. या वेळी आंदोलकांनी सहा जणांच्या हत्याकांडावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. २४ तासांत दोषींना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. केशमथोंग मतदारसंघातील तिड्डीम रोड येथील अपक्ष आमदार सपम निशिकांत सिंह यांच्या घराबाहेरही आंदोलकांनी निदर्शने केली. या वेळी आंदोलकांनी आमदारांच्या मालकीच्या स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यालयावरही हल्ला केला. जिरीबाम जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या सहापैकी तीन जणांचे मृतदेह शुक्रवारी रात्री मणिपूर-आसाम सीमेवर जिरी आणि बराक नद्यांच्या संगमाजवळ सापडले होते. यामध्ये काल रात्री आसाममधील सिलचर येथे एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह आणण्यात आले. पोलिस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. ओळखीसाठी छायाचित्रे गोळा करण्यात आली आहेत.

दरम्यान, पोलिसांनी सांगितले, की बिष्णुपूर जिल्ह्यातील इरेंगबाम मॅनिंग भागात संशयित अतिरेक्यांची सुरक्षा दलांशी संक्षिप्त चकमक झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. १४ नोव्हेंबर रोजी, गृह मंत्रालयाने इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील सेकमाई आणि लमसांग, इम्फाळ पूर्वेतील लामलाई, बिष्णुपूरमधील मोइरांग, कांगपोकपीमधील लिमाखोंग आणि जिरीबाम जिल्ह्यातील जिरीबाम अंतर्गत भागात ‘अफ्स्पा’ कायदा पुन्हा लागू केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या जाहीर सभा रद्द केल्या आहेत. गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि सावनेर येथील त्यांच्या चारही सभा रद्द करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील घटनेमुळे शाह यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शाह आजच्या चार सभांसाठीच नागपुरात पोहोचले होते. ते नागपुरातील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले होते. ते आज सकाळी ११ वाजता गडचिरोली येथे जाहीर सभेसाठी रवाना होणार होते; मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द झाला. मणिपूरच्या घटनेमुळे शाह अचानकपणे त्यांचे सर्व राजकीय कार्यक्रम रद्द करून दिल्लीला परतले.

दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुप खर्गे यांनी मणिपूरच्या घटनेवरून संताप व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ७ नोव्हेंबरपासून आतापर्यंत १७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. संघर्षग्रस्त भागांच्या यादीत नवीन जिल्हे जोडले जात आहेत आणि आग सीमेवरील ईशान्येकडील राज्यांमध्ये पसरत आहे. मणिपूर या सुंदर सीमावर्ती राज्यात तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरला आहात. भविष्यात तुम्ही मणिपूरला गेलात, तरी राज्यातील जनता कधीही माफ करणार नाही. इथले लोक कधीच विसरणार नाहीत, की तुम्ही त्यांचे दुःख कमी करण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी त्यांच्या राज्यात कधीही गेला नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

ना एकसंघ, ना सुरक्षित!

तुमच्या डबल इंजिन सरकारमध्ये ना मणिपूर एकसंघ आहे, ना मणिपूर सुरक्षित आहे. मे २०२३ पासून राज्य अकल्पनीय वेदना, विभाजन आणि वाढत्या हिंसाचारातून जात आहे. आपल्या लोकांचे भवितव्य उद्ध्वस्त झाले आहे. भाजपला त्यांच्या घृणास्पद विभाजनवादी राजकारणामुळे मणिपूर जाळायचे आहे, असा आरोप खर्गे यांनी केला.

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले