सातार्‍यात महाविकास आघाडीचा सुफडासाफ

सातारा, प्रतिनिधी : अतंत्य चुरशीने झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का हा महायुतीच्या फायद्याचा ठरला आहे. जिल्ह्याने पहिल्यांदाच शरद पवारांची साथ सोडताना काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे यांना पराभवाची धुळ चारली आहे. जिल्ह्यातील आठही मतदारसंघावर महायुतीचा झेंडा फडकला असून महाविकास आघाडीचा एकही उमेदवार विजयी न झाल्याने तीन्ही पक्षांचा जिल्ह्यात सुफडासाफ झाला आहे. (Satara Election)

विधानसभा निवडणूक लागल्यापासून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी पश्‍चिम महाराष्ट्रावर जास्तीचे लक्ष दिले होते. एकीकडे बालेकिल्ला सावरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी खास प्रयत्न केले होते. तर, दुसरकीकडे पवारांचा हाच बालेकिल्ला हस्तगत कण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी प्रचाराची आखणी केली होती. असे असले तरी शरद पवारांच्या सभांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून सातारा जिल्ह्यात कराड उत्तर, फलटण, कोरेगाव, माण हे मतदारसंघ त्यांच्या पक्षाला मिळतील असे अनेकांचे अंदाज होते.

मात्र, हे अंदाज फोल ठरवत कराड उत्तरमधून भाजपाचे मनोज घोरपडे यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पराभव केला. कोरेगावमधून शिवसेनेचे महेश शिंदे यांनी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा दुसर्‍यांदा पराभव केला आहे. माणमधून भाजपाचे जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे प्रभाकर घार्गे यांचा पराभव करून विजयाचा चौकार मारला आहे. कराड दक्षिण या मतदारसंघात काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा जिंकतील असे वाटत होते. मात्र, भाजपाचे अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून जायंट किलर म्हणून विधानसभेत जाणार आहेत.

सातारा मतदारसंघात भाजपाचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचे अमित कदम यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. वाई मतदारसंघात राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अरूणादेवी पिसाळ यांचा पराभव करून विजयाचा चौकार मारला आहे. फलटण मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षापेक्षा मोठा धक्का रामराजे नाईक निंबाळकर यांना असून गेली तीस वर्षे त्यांचे वर्चस्व असलेल्या त्यांच्या मतदारसंघ दीपक चव्हाण यांचा पराभव भाजपाच्या सचिन पाटील यांनी केला. पाटण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचे हर्षल कदम आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बंडखोर सत्यजित पाटणकर यांचा पराभव केला आहे. (Satara Election)

सातारा जिल्ह्यात आठपैकी एकाही मतदारसंघात महाविकास आघाडीला विजयी होता आले नसल्याने सातारा आता भाजपाचा आणि महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे चित्र आहे. बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे दीपक चव्हाण यांचे पराभव हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीला सातारा जिल्ह्यातून क्लीन स्वीप मिळालेला आहे. 1978 ते 1999 काँग्रेसचा त्यानंतर 1999 ते 2024 पर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्हा आता महायुतीचा बालेकिल्ला म्हणून पुढे आला आहे . भारतीय जनता पार्टीने अतिशय कौशल्यपूर्ण अशी राजकीय डावपेच आखत राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली असलेला जिल्हा ताब्यात घेतला. या निकालामुळे जोशात असलेेली महायुती आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड देण्यासाठी तयार  झाली आहे.

ठळक मुद्दे

  • आ.जयकुमार गोेरे, आ.मकरंद पाटील चौथ्यांदा विधाससभेत
  • आ.सचिन पाटील,आ.मनोज घोरपडे,आ.अतुल भोसले पहिल्यांचा विधानसभेत जाणार
  • आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले मताधिक्याने पाचव्यांदा विधानसभेत
  • आ. महेश शिंदे दुसर्‍यांचा विधानसभेत
  • आ.शंभूराज देसाईं, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात पालकमंत्री पदासाठी चुरस
  • विधान परिषदेचे आ. शशिकांत शिंदे यांची पराभवाची मालिका सुरूच

या दिग्गजांचा पराभव

या दिग्गजांचा पराभव काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,कराड उत्तरचे सलग पाचवेळा आमदार असलेले माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, फलटणचे तीनवेळा आमदार राहिलेले दीपक चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी