विश्वास नांगरे यांचा खुलासा शाळकरी पातळीवरचा

  • संग्राम गायकवाड

नुकतेच वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे नागपूरमध्ये ‘सकल हिंदू समाज’ या संघटनेतर्फे आयोजित एका कार्यक्रमास हजर राहिले. त्यांच्या या कृतीवर अनेक व्यक्ती आणि संघटनांनी आक्षेप घेतला. काल नांगरे यांनी या आक्षेपांना उत्तर देताना त्यांच्या कृतीचे समर्थन केले आणि ‘सकल हिंदू समाज’ या संघटनेने त्या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते असे नमूद केले. (Vishwas Nangre Patil Controversy)

सकल हिंदू समाज काय आहे?

विश्वास नांगरे ज्या संघटनेने आयोजित कार्यक्रमाला गेले होते त्या ‘सकल हिंदू समाज’ या संस्थेचे चरित्र थोडे जरी खरवडून बघितले तर असे लक्षात येते की, सारासार विवेक असलेला कुठलाही सरकारी अधिकारी अशा संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गेला नसता. ‘सकल हिंदू समाज’ या संघटनेबद्दलची इंटरनेटवर सहज पणे उपलब्ध असलेली माहिती खालीलप्रमाणे:

१) ही कोणतीही नोंदणीकृत संस्था नसून भारतीय कायद्यांतर्गत या संघटनेला कोणताही औपचारिक वैधानिक नोंदणीचा दर्जा प्राप्त नाही. (Vishwas Nangre Patil Controversy)

२) ही संघटना/व्यासपीठ विविध स्वतंत्र नोंदणीकृत हिंदुत्ववादी व उजव्या विचारसरणीच्या संघटनांतील नेते आणि स्वयंसेवक यांच्या सामूहिक पुढाकारातून कार्यरत आहे. या संघटनांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा समावेश होतो.

३) या संघटनेने महाराष्ट्रभर अनेक जन आक्रोश मोर्चांचे आयोजन केलेले आहे. या जन आक्रोश मोर्चांमध्ये हमखास मुस्लिम द्वेष पसरवणारी टोकाची विधाने केली जातात. टी. राजा सिंह, सुरेश चव्हाणके, नितेश राणे यांनी मुस्लिमांबद्दल केलेल्या अनेक आक्षेपार्ह विधानांवरून समाजामध्ये तेढ पसरवली जात असल्याचे आरोप वारंवार केले जात असतात. अनेक एफ आय आर यावरून दाखल झालेले आहेत. (Vishwas Nangre Patil Controversy)

खुलासा चिंताजनक

अशा प्रकारे समाजात द्वेषाचे विष पसरवण्याचे आरोप असणाऱ्या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजर राहण्याबद्दल विश्वास नांगरे यांनी केलेला शाळकरी पातळीवरचा खुलासा चिंताजनक आहे. (Vishwas Nangre Patil Controversy)

‘सकल हिंदू समाज’ या unregistered संघटनेची काळी बाजू त्यांना माहीत नसणे शक्यच नाही. तरीसुद्धा ते त्या व्यासपीठावर जातात, त्याचे समर्थन करतात आणि अशा प्रकारे त्या संघटनेला/व्यासपीठाला अधिकृतता मिळवून देण्याचे काम करतात. सध्याच्या काळात ‘महाशक्ती’ने संबंध वातावरणात खास करून सत्तेच्या विविध वर्तुळांमध्ये, मग ती राजकीय सत्तेची असतील किंवा प्रशासकीय सत्तेची असतील, भीती आणि प्रलोभने यांचा मेळ घालून काय जबरदस्त चुंबकीय भार (magnetic charge) तयार केला आहे याचा ही घटना एक पुरावा आहे.

विश्वास नांगरे हे माझे परिचित आहेत. ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आत्ताच्या या कृत्याबद्दल नापसंती व्यक्त केल्यानंतर त्याबद्दल त्यांनी माझ्याकडे व्यक्तिगत पातळीवरती त्याबद्दल खुलासा केला होता, जो समाधानकारक नव्हता. विश्वाससारख्या बहुजन समाजातील तरुणांमध्ये fan following असणाऱ्या अधिकाऱ्याने समाजात विपरीत संदेश जाईल अशी कृती करणे आणि त्याचे समर्थन करणे याचा सार्वजनिक रित्या निषेध करणे आवश्यक वाटल्याने मी ही पोस्ट लिहीली आहे.

(लेखक निवृत्त आयकर आयुक्त तसेच मराठीतील महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. आटपाट देशातल्या गोष्टी आणि मनसमझावन ` अशा त्यांच्या दोन कादंब-या वाचकप्रिय ठरल्या आहेत.)

Related posts

तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो….

आमदार क्षीरसागरांनी मांडले वकिलांना संरक्षण देणारे महाराष्ट्र अधिवक्ता विधेयक

भाजप, अमित शाह मुर्दाबाद घोषणा दिल्याने हद्दपारी कशी? ; न्यायालयाचा सवाल