कोल्हापूर जिल्ह्यात पारंपरिक लढतीकडे कल

सतीश घाटगे

कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपरिक, प्रस्थापित घराण्यातील उमेदवारांमध्ये लढती होणार आहेत. इच्छुकांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर ‘आत्ता नाही तर कधी नाही’ अशी भूमिका घेत बंडखोरी करण्याचे संकेत दिल्याने जिल्ह्यात काही मतदार संघात दुरंगी तर काही मतदार संघात तिरंगी लढती पहायला मिळणार आहेत. (Maharashtra Assembly Election)

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सत्ता मिळाल्यानंतर महायुती सावध झाली असून अनेक लोकोपयोगी विकास कामांच्या घोषणा करत मतदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांच्या दौऱ्यांनी जिल्हा ढवळून निघाला आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती आणि आमदार बच्चू कडू यांची तिसरी आघाडीही निवडणुकीत रंग भरणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्र पक्षांना कोणता मतदारसंघ वाट्याला येणार हे लक्षात घेऊन रणनिती आखली जात आहे. (Maharashtra Assembly Election)

महायुतीमध्ये कागल मतदार संघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाणार असल्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी तुतारी हातात घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. इचलकरंजी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जात असल्याने अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहूल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राधानगरी मतदार संघ शिवसेना शिंदे गटाकडे असल्याने अजित पवार गटात असलेले माजी आमदार के.पी.पाटील आणि त्यांचे मेव्हणे ए.वाय. पाटील यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ज्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळणार नाही किंवा मित्र पक्षाला जर जागा मिळाली तर त्या मतदार संघातील इच्छुक बंडखोरी करण्याची शक्यता आहे. माजी आमदार सुजीत मिणचेकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर, चंदगडमधील भाजपचे शिवाजीराव पाटील, कोल्हापूर उत्तरमधून भाजपचे सत्यजित कदम, कागलमधून विरेंद्र मंडलिक, राधानगरीमधून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहूल देसाई निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. हे इच्छुक पक्षाद्येश पाळणार की बंडखोरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. निवडणूक प्रकिया सुरू झाल्यानंतर कोणाला उमेदवारी मिळते, कोणाचा पत्ता कट होणार, कोण बंडखोरी करणार याचे चित्र ऐन दिवाळीत पहायला मिळणार आहे. (Maharashtra Assembly Election)

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार

कोल्हापूर उत्तर : आमदार जयश्री जाधव, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, (काँग्रेस), माजी आमदार राजेश क्षीरसागर (शिवसेना शिंदे गट), सत्यजित कदम, महेश जाधव (भाजप), संजय पवार, रवीकिरण इंगवले, विजय देवणे (शिवसेना ठाकरे गट), व्ही.बी.पाटील (राष्ट्रवादी), वसंतराव मुळीक, दौलत देसाई.

कोल्हापूर दक्षिण : आमदार ऋतुराज पाटील (काँग्रेस), माजी आमदार अमल महाडिक (भाजप)

करवीर : माजी आमदार चंद्रदीप नरके (शिवसेना), राहूल पाटील (काँग्रेस)

कागल : मंत्री हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी अजित पवार गट), समरजीत घाटगे (राष्ट्रवादी शरद पवार गट), विरेंद्र मंडलिक, (शिवसेना शिंदे गट)

राधानगरी : आमदार प्रकाश आबिटकर (शिवसेना शिंदे गट), माजी आमदार के.पी. पाटील, ए.वाय.पाटील, राहूल देसाई.

चंदगड : आमदार राजेश पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट), शिवाजीराव पाटील, नंदीनी बाभूळकर, अप्पी पाटील.

इचलकरंजी : माजी आमदार सुरेश हाळवणकर, राहूल आवाडे भाजप, (भाजप), राहूल खंजिरे (काँग्रेस), मदन कारंडे (राष्ट्रवादी शरद पवार गट)

शाहूवाडी : आमदार विनय कोरे (जुनसराज्य पक्), माजी आमदार सत्यजीत पाटील (शिवसेना उध्द्व ठाकरे गट), डॉ. प्रदीप पाटील.

हातकणंगले : आमदार राजूबाबा आवळे (काँग्रेस), माजी आमदार सुजित मिणचेकर (शिवसेना उध्दव ठाकरे गट), अशोकराव माने (जनसुराज्य किंवा भाजप)

शिरोळ : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष), माजी खासदार राजू शेट्टी (तिसरी आघाडी), माजी आमदार उल्हास पाटील (शिवसेना), गणपतराव पाटील (काँग्रेस)

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी