कोल्हापूरचे ‘उत्तर’ क्षीरसागर की लाटकर ?

कोल्हापूर; सतीश घाटगे :  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारीच्या घोळानंतर महाविकास आघाडी ‘तू चाल गड्या, तुला भीती कशाची’ अशा आत्मविश्वासाने मैदानात उत्तरली आहे. त्यामुळे आता महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्यात कडव्या झुंजीचे संकेत मिळत आहेत. मतदारसंघात महायुतीची रणनीती यशस्वी होणार की आमदार सतेज पाटील भारी पडणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती विजयी झाल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसचे वारे खेळू लागले. काँग्रेसने पाच मतदारसंघात उमेदवार उभे करताना कोल्हापूर उत्तरची जागाही राखली. पण राजेश लाटकर यांची जाहीर झालेली उमेदवारी, त्यानंतर काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी घेतलेली तडकाफडकी माघार आणि परत लाटकरांना उमेदवारी यामुळे महाविकास आघाडीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पण सतेज पाटील यांनी परत इंडिया आघाडीची मोट जुळवत लाटकरांच्या प्रचाराचा नारळ फोडत वादळात दिवा लावण्याचा चंग बांधला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर हे तुल्यबळ उमेदवार आहेत. २००९ आणि २०१४ च्या निवडणूकीत सलग दोन वेळा विजय मिळवत त्यांनी या मतदारसंघात आपला दबदबा कायम ठेवला.

२०१९ च्या निवडणूकीत ते पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी राजकीय आणि सामाजिक कार्यात लक्ष घालून तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी बांधणी सुरू केली. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारमध्ये ते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक असल्याने कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात निधी आणला. शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी, अमृत योजना, रंकाळा आणि पंचगंगा सुशोभिकरण, तालमी आणि मंडळांची बांधकामे यासाठी भरीव निधी आणल्याने त्यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये चांगले संघटन केले आहे. भाजपचे इच्छुक सत्यजित कदम आणि काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्याचा फायदा क्षीरसागर यांना होणार आहे. सतेज पाटील विरोधक असलेले भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि भाजपची ताकद त्यांना मिळणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकदही मोलाची ठरणार आहे. राजेश लाटकर यांची जडणघडण सेवा दलातून झाल्याने कष्टकरी, गरीब,  मध्यमवर्गीयांमध्ये काम केल्याने त्यांची चांगली नाळ जुळली आहे.

त्यांचे वडील भारत लाटकर सेवादलात असल्याने डावी आघाडी त्यांच्या मागे जोमाने उतरली आहे. सतेज पाटील यांनी ‘तुम्ही बावडा, लाईन बाजार सांभाळा.. मी वादळात दिवा लावतो’ अशी साद घालत कोल्हापूर उत्तरमध्ये लक्ष घातल्याने शहरातील माजी नगरसेवक पुन्हा चार्ज झाले आहेत. क्षीरसागर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्याविरोधात शिवसेना  उद्धव ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रवीकिरण इंगवले, सुनील मोदी आणि शिवसैनिक जिद्दीने मैदानात उतरले आहेत.

काँग्रेसचे हात चिन्ह नसल्याने व लाटकर यांचे प्रेशर कुकर चिन्ह असल्याने कट्टर शिवसैनिकांची मतेही लाटकर यांच्याकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते लाटकर यांच्या प्रचारात उतरले आहेत. खासदार शाहू छत्रपतीनी लाटकर यांना खुल्या दिलाने पाठिंबा दिला असून मालोजीराजे सक्रीय झाले तर प्रेशर कुकरच्या शिट्ट्या आणखीन वाजतील.

युती आणि आघाडीने प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून मतदासंघात शिवसेनेची घरवापसी होणार की काँग्रेस आपला गड कायम राखणार हे मतदारांच्या कौलावर ठरणार आहे.

आमदार सतेज पाटील भारी

कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ देश स्वतंत्र झाल्यापासून सुरवातीला शेतकरी कामगार पक्षाचा तर १९९० नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदार संघात काँग्रेसचे १९८५ मध्ये लालासाहेब यादव, २००४ मध्ये मालोजीराजे यांनी विजय मिळवला होता. २०१९ च्या निवडणूकीत सतेज पाटील यांनी उत्तरेवर काँग्रेसचा पुन्हा कब्जा मिळविला आणि चंद्रकांत जाधव काँग्रेसचे आमदार झाले. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत भाजप महाशक्तीला पराभूत करुन काँग्रेसच्या जयश्री जाधव आमदार झाल्या.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी