इस्लाम कॅलेंडरमधील मोहरम हा पहिला महिना आहे. मुस्लीम धर्मिय हा महिना शोक आणि आत्मचिंतन करतात. कारण याच माहिन्यात इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याला मुस्लीम धर्मिय आठवण काढतात. भारतात मोहरमला पीर पंजाची प्रतिष्ठापना केली जाते. ताबूतांची मिरवणूक काढली जाते. पोलिस प्रशासनाच्यादृष्टीने मोहरमची मिरवणूक ही तणावाची असते. याला अपवाद आहे कोल्हापूर शहर आणि जिल्हा. कोल्हापूर शहरात हिंदू मुस्लीम ऐक्याचा सण म्हणून मोहरमकडे पाहिले जाते. सध्या शहरातील प्रमुख तालमी, मंडळामध्ये पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सर्वधर्मियांच्या घरीही पंजांची प्रतिष्ठापना झाली आहे. पारंपरिक वाद्याच्या गजरात पंजेभेटीचा कार्यक्रम सुरू आहे. उद्या शनिवारी (दि.५) खत्तलरात्र असून रविवारी (दि.६) ताबूत विसर्जन आहे. या सणात मुस्लीम धर्मियापेक्षा कोल्हापूरात हिंदू लोक अतिशय श्रद्धेने सहभागी होतात. संपूर्ण शहर मोहरममय झाले आहे. कोल्हापूरातील मोहरम सणातील प्रथांची माहिती घेऊया.
सतीश घाटगे
गल्ली बोळात पंजांची प्रतिष्ठापना
कोल्हापूरात गल्ली बोळात पंजांची प्रतिष्ठापना झाली आहे. ज्या गल्लीत एकही मुस्लीम व्यक्ती रहात नाही तिथेही पीर पंजे बसवण्यात आले आहेत. मोहरमच्या महिन्यात अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदा तिथीला कुदळ पडते आणि दुसऱ्या दिवशी पंजांची प्रतिष्ठापना केली जाते. उद, धूपाचा सुगंध सगळीकडे दरवळत चालला आहे. झेंड्याची मिरवणूक काढून घरोघरी दक्षिणाही मागितली जात आहे. कोल्हापूरात मानाचा पंजा म्हणजे बाबूजमाल तालमीचा नाल्या हैदर पंजा. या पंजांच्या दर्शनासाठी दिवसभर गर्दी असते. शिवाजी चौकातील घुडणपीर, पाण्याच्या खजिन्याजवळील नंगीवली तालीम, बाराईमाम तालीम, काळाईमाम, सरदार, अवचितपीर जुना बुधवार, भुई गल्ली, नारायण मेढे तालीम, खंडोबा तालीम, गंगावेश तालीम, भवानी मंडपातील वाळव्याची स्वारी पंजाची प्रतिष्ठापना झाली आहे. (Kolhapurs Muharram)
कोल्हापूरातील अनेक तालमींची नावे मुस्लीम धर्मातील दर्ग्यांशी संबधित आहेत. त्यामध्ये बाबूजमाल, अवचितपीर, दिलबहार, नंगीवली, बारामईमाम, काळाईमाम अशी आहेत. या तालमीत पंजांची प्रतिष्ठापना होते. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठेसह शाहूपुरी आणि राजारामपुरीतील तालमी आणि मंडळामध्ये पंजांची प्रतिष्ठापना झाली आहे. तालमींची नावे सर्वसामान्यांची आहेत. त्यामध्ये म्हादू गवंडी, नाथा गवळी, सुबराव गवळी, बजाप माजगावकर, बोडके, शिपुगडे, सरदार, अशी आठरा पगड जातीतील सर्वसामान्य कर्तबगार व्यकतींची नावे तालमीना दिली आहेत. तसेच हिंदू देवतांच्या नावाने खंडोबा, फिरंगाई, वेताळमाळ, महाकाली अशी तालमींची नावे आहेत. या सर्व तालमीमध्ये पंजाची प्रतिष्ठापना आहे.
तालमी मंडळाबरोबर अनेकांच्या घरीही पंजाची प्रतिष्ठापना आहे. त्यामध्ये मुस्लीमांबरोबर हिंदू, लिंगायत धर्मीय पंजाची प्रतिष्ठापना करतात. त्यामध्ये पाटील, इंगळे, सांगावकर, खाडे आडनावाच्या घरीही पंजे बसवले जातात. लिंगायत समाजातील कुटुंबातही पंजाची प्रतिष्ठापना केली जाते.
खत्तलरात्रीला खिचडी मलिद्याच्या नेवैद्य
मोहरममधील खत्तलरात्र हा मुख्य दिवस असतो. या दिवशी कोल्हापूरातील ८० टक्क्याहून अधिक घरात खिचडी आणि मलिदा केला जातो. हा नेवैद्य पीराला दाखवला जातो. बाबूजमाल, घुडणपीर, अवचितपीर, ब्रम्हपुरी टेकडीवर बुऱ्हाणबाबा दर्गा, नंगीवली, अवचितपीर, बाराईमाम या ठिकाणी भाविकांची गर्दी होते. सर्वात जास्त गर्दी बाबूजमाल आणि घुडणीपर दर्ग्यात असते. बाबूजमाल दर्गा परिसरात खाई फोडली जाते. लाकडे पेटवलेल्या विस्तवावरुन भाविक चालत जातात. हा विधी पाहण्यासाठी मोठी गर्दी असते.
गल्लीतील सर्व लोक पीराच्या दर्शनासाठी जातात. त्यामध्ये हिंदू धर्मियांची संख्या जास्त आहे. अनेक हिंदू धर्मिय पीराला नवस बोलतात. नवस फेडण्यासाठी एक दिवसासाठी फकीरही होतात. तसेच पीराला भरजरी वस्त्र म्हणजेच फेटाही अर्पण करतात. (Kolhapurs Muharram)
पंजे भेटी कार्यक्रम
मोहरम सण हा अकरा दिवसाचा असतो. पहिल्या दिवशी कुदळ पडते, दुसऱ्या दिवशी प्रतिष्ठापना होते. तर पाचव्या दिवशी पंजेभेटीचा कार्यक्रम असतो. आठव्या दिवशी पंजे मोठ्या संख्येने भेटीला बाहेर पडतात. खत्तलरात्र या मुख्य दिवशी पंजेभेटी मोठी मिरवणूक असते. बाबूजमाल, घुडणपीर, नंगीवली, ब्रह्मपुरीतील बुऱ्हानबाबा, बारा ईमाम येथे पंजे मोठ्या संख्येने भेटीला येतात. ढोल ताशांच्या वाद्याच्या गजरात पंजे भेटीला बाहेर पडतात. गेली दोन दशके साउंड सिस्टीमचा तालावर मिरवणूका काढल्या जातात. खत्तलरात्री पहाटेपर्यंत पंजे भेटीचा कार्यक्रम सुरु असतो. बाबूजमालचा पंजा मशालीच्या उजेडात भेटीस बाहेर पडतो.
पहिला मान आईचा, मग पिराचा
चार पाच वर्षापूर्वी मोहरम सण ऐन नवरात्र उत्सवात आला होता. अष्टमीला देवीची पालखी आणि पंजांची मिरवणूक एकाच मार्गावर जात असल्याने कोल्हापूरात नव्याने आलेले पोलिस अधिकारी चिंतेत होते. मिरवणूक मार्गावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात बैठक बोलावली. त्यांनी दोन्ही मिरवणूकीची अडचण सांगितल्यावर उपस्थित पंजे प्रतिष्ठापना करणाऱ्या हिंदू मुस्लीमांनी ‘पहिला मान आईचा, मग पिराचा’ असे सांगून अष्टमीला पंजाची मिरवणूक निघणार नाही असे जाहीर केले. अवघ्या एका मिनिटात तोडगा निघाल्याने पोलिस अधिकाऱ्याच्या डोक्यावर टेन्शन एका झटक्यात निघून गेले.
वाळव्याची स्वारीची कथा
संस्थानकाळात राधानगरी तालुक्यातील कसबा वाळव्यातील एका व्यक्तीच्या घरावर जप्ती करण्यात आली. जप्तीतील जप्त केलेली भांडीकुंडी जुन्या राजवाडयात ठेवण्यात आली. शंभर सव्वाशे वर्षापूर्वी मोहरमच्या काळात ढोल ताशे वाजू लागल्यावर जप्त केलेल्या भांड्यामध्ये पंजाची नाल नाचू लागली अशी कथा सांगितली जाते. यावेळी राजवाड्यातील नोकरांनी राजघराण्यातील व्यक्तींना ही माहिती दिली. त्यांनी ती नाल घेऊन जुन्या राजवाड्यासमोरील हत्तीच्या कमानीत पंजाची प्रतिष्ठापना करायला सांगितली. हीच ती वाळव्याची स्वारी. (Kolhapurs Muharram)