कोल्हापूर; प्रतिनिधी :राज्य सरकारकडे ठेकेदारांनी केलेल्या कामाची प्रलंबित सुमारे चाळीस हजार कोटींची बिले थकित आहेत. ती तातडीने देण्यात यावीत, अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्यावतीने आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करण्यात आले. (Kolhapur News)
यावेळी महासंघाचे राज्य सचिव सुनील नागराळे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे २४ हजार कोटी, ६ हजार कोटी प्रधानमंत्री सडक योजना, मुख्यमंत्री सडक योजना आणि जलसंधारण विभागाची प्रत्येकी १५०० कोटी अणि इतर शासकीय कार्यालयाचे असे एकूण मिळून साधारण ४०हजार कोटी महाराष्ट्र सरकारकडून येणे बाकी आहे. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात साधारण दीड ते दोन हजार कोटी रुपयांची बिले थकित आहेत. जिल्ह्यात साधारण तीन हजार ठेकेदार आहेत. त्यांची बिले थकल्यामुळे बँकेची कर्जे आणि इतर आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे थकित बिले तातडीने मिळावीत, अशी आमची मागणी आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जलसंधारण विभाग, मुख्य कार्यकारी, अधिकारी जिल्हा परिषद, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. (Kolhapur News)
जिल्हा शासकीय ठेकेदार संघाचे अध्यक्ष निवास लाड, कोल्हापूर अर्थमुव्हर्स असोसिएशनचे सचिव आर. आर. पाटील, महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनचे सदस्य बापू कोंडेकर, कोल्हापूर अर्थमुव्हर्स असोसिएशनचे संचालक संजय श्रेष्ठी, बापू चौगुले, राधानगरी कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष बी. एस. पाटील आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य ठेकेदार आंदोलनावेळी उपस्थित होते.
हेही वाचा :