Manmohan Singh कर्मयोगी

  • सुजय शास्त्री

डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाची सलग दहा वर्षे पार केली. पं. नेहरु सलग १७ वर्षे (१९४७-१९६४) पंतप्रधान होते. इंदिरा गांधी एकूण १६ वर्षे पण त्यातील प्रथम १९६६ ते १९७७ ही ११ वर्षे आणि नंतर १९८० ते १९८४ अशी पाच वर्षे. बाकी अटलबिहारी वाजपेयी सुमारे सात वर्षे आणि राजीव गांधी पाच वर्षे. लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, चरणसिंग, व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, देवेगौडा आणि आय. के. गुजराल यांना कुणालाही निरनिराळ्या कारणामुळे पूर्ण पाच वर्षे सलग कारभार करण्याची संधी मिळाली नाही. भारताचा पंतप्रधान नेहमी ज्वालामुखीच्या तोंडावर उभा असतो असे म्हटले जाते, ते खरे हे. त्या ज्वालामुखीने इंदिरा व राजीव गांधी यांना आपल्या अग्निकुंडात खेचून घेतले होते. २००४ मध्ये लोकसभेतील साडेतीनशेहून अधिक खासदारांनी सोनिया गांधींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला समर्थन दिले होते, परंतु ते पद व सन्मान नाकारून त्यांनी जगाच्या इतिहासात एक नवा पायंडा रुढ केला. इतके मोठे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीने दिलेले पद नाकारणे याला खरोखरच त्याग-कर्मवाद अशी मानसिक बैठक लागते. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यास आपण मुंडण करून घेऊ असा ‘शाप’ सुषमा स्वराज आणि उमा भारती या भाजपाच्या ज्येष्ठ महिला नेत्यांनी दिला होता. परंतु त्यांची ती अभ्रदवाणी प्रत्यक्षात आणायला सोनिया गांधींनी त्यांना संधी दिली नाही. काँग्रेसप्रणित आघाडीला बहुमत मिळून सोनिया गांधी पंतप्रधान होणार याची धास्ती शेअर बाजारालाही वाटली. दलाल स्ट्रीटवर बाजार इतका कोसळला की त्याचे वर्णन त्यावेळी टीव्ही वाहिन्यांनी सोनियांच्या विरोधात तो ब्लड बाथ आहे असे केले. परंतु सोनिया गांधींनी त्यांचे कर्मवादी वज्रास्त्र काढून त्याग तर केलाच पण डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवले.

निस्पृह, निष्कलंक, विद्वान, सभ्य आणि चारित्र्यसंपन्न

डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल समाजात नितांत आदराची भावना इतकी होती की भाजपवाले खासगी बैठकांमध्ये डॉ. मनमोहन सिंग त्यांच्या पक्षात हवे होते असे म्हणतं असतं. इतका निस्पृही, निष्कलंक, विद्वान, सभ्य आणि चारित्र्यसंपन्न व्यक्ती पंतप्रधानपदी आल्यामुळे पहिला काळ विरोधकांची वाचाच गेली होती. परंतु पहिल्या पाच वर्षांत असे अनेक प्रसंग आले की, डॉ. मनमोहन सिंग यांना अग्निपरीक्षेतून जावे लागले. तिथेच त्यांच्या स्थितप्रज्ञतेची कसोटी घेतली गेली. त्यातून ते तावून सुलाखून बाहेर पडले. इतकेच नव्हे तर जवळजवळ सर्व मीडियाने व विरोधी पक्षांनी २००९ च्या काँग्रेसच्या दणदणीत विजयाचे श्रेय डॉ. सिंग यांच्या चारित्र्याला आणि कारभाराला गव्हर्नन्सला दिले. तेव्हा नरेंद्र मोदीप्रणित गव्हर्नन्सचा गाजावाजाला सुरुवात झालेली नव्हती. पण २०१० नंतर २०१४ च्या निवडणुकांच्या घोषणा होईपर्यंत विरोधी पक्षांनी आणि त्यांच्या वतीने ‘स्लीपर सेल्स’ चालवणार्याा मीडियाने डॉ. मनमोहन सिंग यांची इतकी क्रूर अवहेलना चालवली होती की दुसरी कोणतीही व्यक्ती त्या दर्पयुक्त आक्रमक टीकेने उद्धवस्त झाली असती वा शस्त्र टाकून संन्यास पत्करला असता. परंतु अशा टीकेला योगी वृत्तीने सामोरे जाऊन, चित्त विचलित होऊ न देता आपली 16 तासांची काम करण्याची दिनचर्या सुरू ठेवणे याला विलक्षण मानसिक सामर्थ्य लागते. कुणीही येऊन पंतप्रधानपदाची जबाबदारी, शान, प्रतिष्ठा यांचा विचार करता डॉ. सिंग यांच्यावर अश्लाघ्य टीका करत होते. विरोधकांना आणि या बेजबाबदार पत्रकारांना हे माहीत होते की, गेल्या दहा वर्षांत डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वतः एका पैशाचाही स्वार्थासाठी लाभ घेतलेला नाही वा गैरव्यवहार केलेला नाही की नातेवाईकांची धन केलेली नाही. परंतु डॉ. सिंग यांच्या सर्वात मोठ्या सामर्थ्यावर त्यांच्या चारित्र्यावर आघात करून त्यांना नामोहरम करण्याची व्यूहरचना भाजप व कम्युनिस्टांनी आणि मीडियानेही आखली. डॉ. सिंग यांच्या अखत्यारित असलेल्या खात्यांमध्ये कोट्यवधींचे घोटाळे झाल्याचे आरोप या सर्वांनी केले होते. या सर्व आरोपांची न्यायालयांमार्फत आणि चौकशी आयोगांतर्फे शहानिशा सुरू असताना आणि डॉ. सिंग यांना त्यामध्ये प्रत्यक्ष कोणताही थेट लाभ झालेला नाही हे मान्य करीत ही त्यांनाच या सर्व घोटाळ्यांसाठी जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी या सर्वांनी सातत्याने केली. डॉ. सिंग त्यांच्यासारखे वाचाळवीर नव्हते. त्यांचे मीडियामध्ये लॉबिंग नव्हते. किंवा कोणा एका प्रभावशाली पत्रकाराला हाताशी घेऊन त्यांनी मीडियात एखादी बातमीही पेरली नव्हती. ‘एकला चालो रे’च्या विरक्त भूमिकेतून त्यांनी त्यांचे कार्य कर्मवादी वृत्तीने अखेरपर्यंत केले. एकेकाळी ‘मितभाषी’ व ‘मृदुभाषी’ म्हणून त्यांचा गौरव होत असे. पण नंतर ते तोंडही उघडत नाहीत म्हणून त्यांची चेष्टा केली गेली. वास्तविक दहा वर्षांच्या काळात त्यांनी देश-विदेशात अनेक कार्यक्रम, समारंभ, सेमीनारच्या माध्यमातून सुमारे १४०० भाषणे विविध निमित्ताने केली. त्याला प्रसिद्धी किती दिली आणि ते काय सांगताहेत याचे भान मीडियाला असते तर असा एकांगी व बिनडोकपणाचा प्रचार केला गेला नसता.

दोन्हीकडून टीका

२००४ रोजी पंतप्रधानपदाची माळ अनपेक्षितपणे त्यांच्या गळ्यात पडल्यानंतर भाजपासह सर्वच विरोधकांनी डॉ. मनमोहन सिंग यांना स्वतःचे व्यक्तिमत्व नाही आणि ते केवळ सोनियांच्या तालावर नाचणारे बाहुले आहेत अशी टीका सुरू केली होती. अमेरिका-भारत अणुकरारानंतर मात्र डॉ. सिंग यांनीच सोनियांना आव्हान दिले असा प्रचार सुरू झाला. पुढे दुहेरी सत्ताकेंद्राचा मुद्दा उपस्थित करून डॉ. सिंग यांच्यावर पुन्हा आरोपांच्या फैरी डागल्या गेल्या.
डॉ. मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार राहिलेले ज्येष्ठ पत्रकार हरीश खरे यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर सातत्याने होत असलेल्या टीकेच्या निमित्ताने ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रात एक लेख लिहीला होता. या लेखात त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांच्याशी संवाद साधला होता. या संवादातून त्यांच्या निस्पृह व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते. ते सांगतात,“ जून 2009चे ते साल होते. यावर्षी मी (हरीश खरे) पंतप्रधानांचा प्रसिद्धी माध्यम सल्लागार म्हणून रुजू झालो होतो. माझ्या नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी माझ्याशी एक तास दीर्घ चर्चा केली. ही चर्चा संपल्यानंतर मी जात असताना पंतप्रधानांनी मला परत बोलावले व एक मिनिट बसायला सांगितले आणि मला म्हणाले, “हरीश, एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, तुम्हाला जेव्हा केव्हा मी किंवा माझ्या कुटुंबातील एकही सदस्य वा नातेवाईक कोणत्याही मतलबासाठी, स्वार्थासाठी एखादी बेकायदा गोष्ट करताना आढळून आल्यास मला त्याबद्दल तडक सांगत जा. ही गोष्ट माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबियासाठी कितीही अडचणीची वा आम्हाला न रुचणारी असली तरी तुम्ही विचारत जा.”

पण हेच डॉ. मनमोहन सिंग भ्रष्टाचाराच्या आरोपात दुर्दैवाने असे अडकत गेले की, त्यांनी विरोधकांच्या वा मीडियाच्या प्रश्नांना उत्तर न देता असेल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा मनोग्रह केला. गंभीर बाब अशी की, अण्णांच्या आंदोलनातून जे स्वयंभू नीतिवान शंकराचार्य निर्माण झाले होते ते अहंगंडाने, स्वार्थी राजकारणाने, मत्सराने पछाडलेले होते. कोणतेही पुरावे हाती नसताना केवळ सर्वच घोटाळ्यांना डॉ. मनमोहन सिंग जबाबदार ही थिअरी या स्वयंभू नीतीवाद्यांनी अशी बेमालूमपणे राजकारणात स्थिर केली की, सर्वसामान्य माणसालाही पुढे पुढे अशा आरोपांमध्ये तथ्य वाटू लागले. अनेक वर्तमानपत्राच्या संपादकांनी, डॉ. मनमोहन सिंग यांना तुम्ही प्रामाणिक असला म्हणून काय झाले तुमच्या डोळ्यादेखत भ्रष्टाचार होत असताना त्याच्याकडे कानाडोळा करण्याचे धार्ष्ट्य दाखवले कसे, असे प्रश्न विचारले.

लोकशाहीचे पुरस्कर्ते

अशा प्रश्नांची उत्तरे काय असू शकतात? एरवी, प्रश्नकर्त्याला डॉ. मनमोहन सिंग हे हुकुमशाहसारखे का वागले नाहीत, आंदोलने वेळीच का चिरडली नाहीत, मोदींच्या फॅसिझमला रस्त्यावर उतरून का सामना केला नाही, असे वास्तविक प्रश्न विचारायचे असतात. प्रश्नकर्त्याला लोकशाही मूल्यांशी प्रतारणा करणारे नेतृत्त्व अपेक्षित असते. लोकशाही ही लोकांच्या कल्याणासाठी असते. पक्षीय भेद किंवा भिन्न विचारधारा हा लोकशाहीचा प्राण असतो, लोक आंदोलने ही विशिष्ट लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्यामुळे निर्माण होत असतात. हाच वैचारिक विरोध मोडून काढला तर लोकशाही संस्थांचे अस्तित्व काय राहिल, हे प्रश्न प्रश्नकर्त्यांना पडत नाही.

१७ जानेवारी २०१४ रोजी अखिल काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत त्यांनी बदलत्या भारताचा उल्लेख केला ते म्हणाले की,
“ मेरा मानना है कि हमें अपनी सफलताओं के लिए जितना श्रेय मिलना चाहिए, उतना नहीं मिल पाया है। इसकी एक वजह यह है कि पिछले 10 सालों में तेज़ आर्थिक विकास, सामाजिक बदलाव और राजनैतिक सशक्तिकरण के कारण हमारे नौजवानों में नई उम्मीदें पैदा हुई हैं। Social और Electronic media के जरिए जानकारी और विचारों का आदान प्रदान बढ़ा है। अब लोग सरकारी agencies से बेहतर काम चाहते हैं। वह हमारी सामाजिक, आर्थिक और राजनैतिक व्यवस्था में तेज़ बदलाव चाहते हैं। इस बात से इंकार नहीं किया जा सकता कि हमारे देश के कई हिस्से और बहुत से लोग अभी भी गरीबी से जूझ रहे हैं। देश की जनता चाहती है कि इन हालात को जल्द बदला जाए।
ऐसे माहौल में यह कोई आश्चर्य की बात नहीं है कि सरकार पर इस बात का दबाव बने कि वह बेहतर काम करे और देश के नागरिकों को बेहतर सुविधाएं उपलब्ध कराए।

भ्रष्टाचार एक ऐसा मुद्दा है जिस पर हमारे देश की जनता ख़ास तौर पर चिंतित है। हमारी सरकार पर यह इल्जाम अक्सर लगाया जाता है कि हमने भ्रष्टाचार कम करने की पूरी कोशिश नहीं की है। लेकिन सच्चाई तो यह है कि हमने सरकार के काम-काज में पारदर्शिता और जवाबदेही लाने के लिए जितना काम किया है उतना किसी भी और सरकार ने नहीं किया।”

अराजकाची नांदी

यूपीए-२ सरकारची वादळी चारवर्षे ही अराजकाची नांदी होती. या अराजकात डॉ. मनमोहन सिंग यांनी राजीनामा दिला असता तर सर्व व्यवस्था एकाएकी कोसळून भारताच्या लोकशाहीला सुरुंग लागला असता. घरातली वृद्ध व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्या घराला घरपण असते, एक सिस्टिम म्हणून ते घर विसंवादी असूनही उभं असतं. पण घरातली वृद्ध व्यक्तीच निघून गेल्यानंतर घरामध्ये भेदभाव, मारामार्या, खूनबाजी होऊ शकते. डॉ. मनमोहन सिंग यांनी हे अराजक ओळखूनच पंतप्रधानपदावरून राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला होता व त्याला सोनिया गांधी यांची संमती होती. या दोघांचा दोष एवढाच की त्यांनी या सगळ्या काळात अविचलित राजकीय सभ्यता दाखवली व इतर घटकांशी प्रतिरोधाची नाही तर सामंजस्याची भूमिका घेतली.

सभ्यता हा अल्पकालिन सद्गुण असतो व तो पूर्ण व्यक्तिमत्वात रुजवायला मनाची मोठी तयारी लागते. राग-लोभ-मत्सर या दुर्गणांना जिंकणे म्हणजे स्व वर विजय मिळवणे असे हिंदू तत्वज्ञान सांगते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वात सभ्यता हा गुण ओतप्रोत भरला होता. सभ्यता हा गुण सहसा लगेच लक्षात येत नाही किंवा तो मोजता येत नाही. पण त्याचे नसणे पुढच्याला लगेच जाणवते. ही सभ्यता डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अहोरात्र धावून जाणार्या कोणत्या नेत्याकडे होती? डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेणारे विविध न्यूज चॅनेलचे संपादक, भाजपामधील नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्वच बडे नेते, जयललिता, ममता बॅनर्जी यांच्या गुणांचे मूल्यमापन कोण करणार होते? अण्णांच्या आंदोलनात निर्माण झालेली झुंडशाही मोदींच्या विरोधात एक ब्र ही काढू शकली नाही. त्याची कारणे काय होती ?

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर बाबा रामदेव हे दिल्लीला येत होते. त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी चार कॅबिनेट मंत्र्यांना दिल्ली विमानतळावर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामागची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ होती की, रामदेव बाबा यांच्याशी कोणत्याही मुदद्यावर चर्चा करण्यास सरकारची तयारी आहे.! हा निर्णय एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी घेतला असता का? रामदेव बाबांची त्या काळातील देशातील प्रतिमा ही फसवी होती. ते लबाड, दुट्टप्पी, गटबाजी करणारे आणि महत्त्वाकांक्षी आहेत हे नंतर देशाच्या लक्षात आले पण ती वेळच अशी होती की सरकारची प्रामाणिकता दाखवण्यासाठी त्यांनी हे पाऊल एक पंतप्रधान म्हणून उचलले.

विरोधकांचेही ऐकून घेण्याची भूमिका

मतभेद असतील तर संघर्ष निर्माण न करता ते सोडवणे. दुसर्याचे पहिले म्हणणे ऐकून घेणे व ते चर्चेच्या माध्यमातून सोडवणे अशी डॉ. मनमोहन सिंग यांच्या कामकाजाची शैली होती. सोनिया गांधी यांचीही होती. त्यामुळे राजकारणी किंवा वकिल किंवा पोलिस किंवा महसूल अधिकारी किंवा व्यापारी-उद्योजक असे काहीही नसलेले डॉ. मनमोहन सिंग हे निस्पृहपणे, सद्सद्विवेकबुद्धीने, प्रामाणिकपणे दुसर्याशी व्यवहार करताना दिसले. हा त्यांचा दोष की गुण ? टग्यांच्या सामाजिक व्यवहाराला उत्तर देताना स्वतःची पातळी, सभ्यता सोडून त्यांच्यासारखे वागायचे की आपला सुसंस्कृतपणा, विनयशीलता, संयम जपायचा हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी आपली विनयशीलता, संयमीपणा अखेरपर्यंत सोडला नाही, ते आक्रमक झाले नाहीत, व्यक्तिगत पातळीवर त्यांनी कुणावरही टीकाटिप्पणी अथवा निंदानालस्तीही केली नाही.

अण्णांच्या झुंडशाहीचे मूल्यमापन करण्यास डॉ. मनमोहन सिंग एक राजकारणी म्हणून निश्चितच चुकले. त्यांना या झुंडशाहीमागे लपलेला कपटीपणा, धुर्तपणा, कुटील नीती, मत्सर, द्वेषाचे राजकारण, मीडियाशी असलेली त्यांची हातमिळवणी यांचे मोजमाप त्यांना लगेचच करता आले नाही. पक्के राजकारणी असते तर या आंदोलनाची हवा स्वतःच्या शिडात घेऊन ते विरोधकांवर उलटवले असते. पण त्यांनी तसे केले नाही. उलट हे आंदोलन उग्र होईपर्यंत व नंतर ते विरुन जाईपर्यंत त्याच स्थितप्रज्ञतेने त्यांनी या सगळ्यांचा मुकाबला केला. कधीही अविचल झाले नाहीत.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुसर्या कारकिर्दीच्या प्रारंभीच निरा राडिया टेप प्रकरण उघडकीस आले आणि देशाच्या कॉर्पोरेट जगतातील साठमारी टुजी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या निमित्ताने बाहेर आली. या कॉर्पोरेट जगतातल्या चोरांनी आपल्यातील संघर्ष व चोरी लपवण्यासाठी मीडियाला हाताशी धरले व सिव्हिल सोसायटीच्या मदतीने हा घोटाळा त्यांनी थेट नैतिकतेच्या चौकटीत बंदिस्त करून ठेवला. मग काय गोबेल्स प्रचारसूत्रानुसार सिव्हिल सोसायटीने जनतेचे लक्ष सोयीस्करपणे कॉर्पोरेट जगतावर केंद्रीत न करता राजकीय नेत्यांवर केंद्रीत केले. त्यांनी राजकीय नेत्यांना लक्ष्य केले पण भ्रष्टाचाराचा फायदा घेतलेल्यांबद्दल त्यांनी एक अवाक्षरही काढले नाही. या देशाला विकासाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न डॉ. मनमोहन सिंग यांनी केला पण या विकासप्रक्रियेत लोभी भांडवलदारांनी लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली याचा दोष मात्र त्यांच्यावर आला.
70 आणि 90 च्या दशकाच्या सुरूवातीस या देशात झुंडशाहीचे राजकारण असेच उफाळून लोकशाही संस्थांना हादरे बसले होते या इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे डॉ. मनमोहन सिंग यांना जाणवत असावे. मत्सर आणि सूडाच्या भावनेवर उभी असलेली कोणतीही राजकीय वादळे अधिक काळ टिकत नसतात हा द्रष्टेपणा त्यांच्याकडे होता.

उदारमतवादी विचारधारा

रामचंद्र गुहासारखे विचारवंत डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना म्हणतात, डॉ. मनमोहन सिंग हे विद्वान, बुद्धीवादी, प्रशासनाचा सुमारे ४० वर्षांचा दीर्घ अनुभव असलेले व्यक्तीमत्व होते पण घाबरटपणा, वेळकाढूपणा आणि बौद्धीक अप्रामाणिकता यामुळे त्यांची इतिहासातील प्रतिमा अशीच काळवंडलेलीच राहिल. (“He’s intelligent, upright, and possesses all these vast experience of working in the government for over four decades,”. “But the timidity, complacency and intellectual dishonesty will make him a tragic figure in our history.”) राजकारणात ‘ठकास महाठक’ असावे लागते हे जरी सकृतदर्शनी योग्य वाटत असले तरी राजकारणात सुसंस्कृतपणा, शालिनता, सभ्यताही जपण्याची नितांत गरज असते. भारताच्या राजकीय विचारधारेत गोखले, रानडेंपासून म. गांधी- नेहरुपर्यंत सर्वांनीच सुसंस्कृतपणा अखेरपर्यंत राखला होता. राजकारण हे विचारधारेवर चालते ते गुंडागर्दीच्या बळावर, संसदेतल्या संख्याबळावर चालवता आले असते तर डॉ. मनमोहन सिंग हे नक्कीच त्यात कमी पडले असते. पण सोनिया गांधी यांनी जेव्हा त्यांची पहिल्यांदा पंतप्रधानपदी निवड केली ती डॉ. मनमोहन सिंग यांच्यातील सद्गुणांमुळेच, ते राजकारणी आहेत की नाही याला त्यांनी महत्त्व दिले नाही. भारताच्या पंतप्रधानपदी बसणारी व्यक्ती विद्वान, सुसंस्कृत, जगाचे भान असणारी व या पदाची प्रतिष्ठा या पदावर अखेरपर्यंत राखणारी असावी याबद्दल त्या आग्रही होत्या. पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा व सन्मान त्याकाळच्या राजकीय परिप्रेक्ष्यात राखण्याची ती वेळ होती. हा आदर्श रुजवणे हे पक्षाध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची नैतिक जबाबदारी होती. ती जबाबदारी त्यांनी दोनही वेळा पार पाडली होती. एनडीए सरकारच्या राजवटीत देशात भय आणि असुरक्षितता पसरली होती. त्यामुळे जनतेने एनडीएच्या विरोधात कौल देऊन काँग्रेसप्रणित युपीए आघाडीकडे देशाची सत्ता सोपवली होती. ही संधी युपीएसाठी ऐतिहासिक अशी होती. कारण एनडीएच्या काळात देशातील बहुसंख्य (हिंदू) आणि अल्पसंख्याकांमध्ये दरी वाढत चालली होती. 2002 मध्ये गुजरातमध्ये घडवून आणलेल्या दंगलीपुढे अटलबिहारी वाजपेयीसारखा मवाळ नेताही हतबल झाला होता. या घटनेमुळे एनडीएच्या ‘शायनिंग इंडिया’ मोहिमेला सुरुंग लागला होता. याचवेळी जनतेने ठरवले होते की देशाचे स्थैर्य टिकवण्यासाठी एनडीएला सत्तेपासून दूर ठेवायचे. 1977 नंतर देशातील असे पहिले सरकार होते की ज्याला जनतेच्या प्रचंड रोषाला बळी पडून सत्तेबाहेर अशापद्धतीने जावे लागले होते आणि या देशाच्या राजकारणात अशी पहिल्यांदा परिस्थिती आली होती की जनतेला नवे सरकार हे सभ्य, सुसंस्कृत हवे होते. त्यांना राजकीय नेत्यांकडून अशा चांगल्या गुणांची, वर्तनाची अपेक्षा होती. आपल्या देशाला नवे भान देणाऱया परिसस्पर्शाची गरज होती. अत्यंत सभ्य, राजकीय पार्श्वभूमी नसलेले डॉ. मनमोहन सिंग हे त्यावरचे उत्तर होते.

राजकीय मुरब्बीपणाचा अभाव

अनेक विचारवंत डॉ. मनमोहन सिंग हे मुरब्बी राजकारणी नसल्याने सरकारची ढासळणारी प्रतिमा ते सावरू शकले नाही असा आरोप करत असतात. या लोकांचा आरोप खरा आहे व वस्तुस्थितीही तशी होती. डॉ. मनमोहन सिंग हे खरोखरी राजकारणी नव्हते व तशी राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांनी त्यांच्या वर्तनातून दाखवली नाही. इंदिरा गांधी जनतेचा मूड पाहून त्या वादळात स्वतःला झोकून द्यायच्या. राजीव गांधीही प्रत्यक्ष लोकांमध्ये फिरले होते. सोनिया गांधी यांनी देशभर झंझावाती दौरे करून काँग्रेसमध्ये नवसंजीवनी आणली होती. तसे व्यक्तिमत्व डॉ. मनमोहन सिंग यांचे नव्हते. त्यांनी कधी मोर्चे गाजवले नाहीत की धरणे धरले नाही की भारतभर भ्रमण केले नाही. ते अखेरीस स्वतःच्या कोषात गेले. त्यांचा मितभाषीपणा मौनात परिवर्तीत होत गेला. ते संसदेतही कोणाशी बोलताना दिसत नसतं. संसदेतील हास्यकल्लोळाच्या प्रसंगातही त्यांच्या चेहर्यावरचे भाव बदलत नसतं. ही विरक्ती होती की स्थितप्रज्ञता होती? आपले काम अविरत करत राहणे हे स्थितप्रज्ञतेचे लक्षण असते. कोणताही विरोध, संकटे आली तरी डगमगून न जाता आव्हानांना सामोरे जायचे हा सुद्धा स्थितप्रज्ञतेचा गुण असतो. म्हणून स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचे आरोप जेव्हा त्यांच्या परिघात आले तेव्हा त्यांनी ते स्वीकारून सरकार माझी कोणतीही चौकशी करू शकते, कोणत्याही चौकशी समितीला मी सामोरे जाण्यास तयार आहे अशी थेट भूमिका घेतली होती.

त्यांच्यातील मौनामुळे त्यांचा जनतेशी संवाद तुटला होता. त्यांच्या मनाचा थांगपत्ता लागत नसे. जेव्हा आपल्याला एखाद्याच्या मनाचा शोध लागत नाही तेव्हा त्या व्यक्तिविषयी नकारात्मक गोष्टी आपल्या मनात येतात. डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबतीत काहीसे असे झाले.
मौन ही नकारात्मक स्थिती असते असं सामान्यपणे समजलं जातं. एक रिक्तता, आवाज किंवा गोंधळाचा अभाव. हा एक गैरसमज पसरलेला आहे. कारण मौनाचा अनुभव फार कमी लोकांनी घेतलेला असतो. मौनाच्या नावावर त्यांनी जे काही अनुभवलं ते म्हणजे गोंधळ आणि आवाजाचा अभाव, पण मौन हे पूर्णपणे दुसरे अंग आहे. हे पूर्णपणे विधायक आहे. ते अगदी अस्तित्वमय आहे. कोणतीही रिक्तता नाही. तुम्ही कधीच ऐकला नाही असा तो संगीताचा गाढ प्रवाह आहे. तुम्हाला माहित नसलेला सुवास आहे.
मौनामुळे समोरच्या परिस्थितीतील अंतरंग लक्षात येते. जेव्हा त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले, आंदोलने पेटू लागली, मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले, फायली गायब होऊ लागल्या, सर्वोच्च न्यायालयाचे फटकारे बसू लागले, लष्करप्रमुखांची दादागिरी वाढू लागली, सीबीआय गोत्यात आणू लागली, पक्षातील धुरंधर दगाबाजी करू लागले, मीडिया खरे नव्हे तर खोटेचं बोलू लागली तसे डॉ. मनमोहन सिंग यांना त्यांच्या भोवतीच्या मत्सराच्या राजकारणाचा अंदाज येऊ लागला. त्यांना अराजकी राजकारणाची सुरूवात दिसू लागली. त्यांनी आपल्या १० वर्षांच्या कारकिर्दीत एकाही नेत्याचे नाव घेऊन टीका केली नाही पण अखेरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यास देश उद्धवस्त होईल असा इशारा दिला. कारण देशात वेगाने वाढत चाललेला मोदीझम हा देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी, बहुसांस्कृतिकतेला मोठा धोका आहे हे त्यांनी ओळखले होते. मोदी हे भारतातल्या सर्वसमावेश राजकारणाचे उदाहरण खचितच नाही. तो भारताचा चेहराही नाही. हे त्यांना अप्रत्यक्षपणे सांगायचे होते.

पण यूपीए-२च्या अखेरच्या चारवर्षांत त्यांच्या प्रतिमेवर विरोधकांनी प्रचंड हल्ला करूनही यापैकी कुणाचीही त्यांचे सरकार पाडण्याची हिंमत झाली नाही. डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपद स्वतःच्या कार्यशैलीद्वारे स्वच्छ-प्रामाणिक-स्थितप्रज्ञ राहू शकते असा नवा पायंडा पाडला. भविष्यात जेव्हा पंतप्रधानपदाच्या प्रतिमेची जेव्हा चर्चा होईल तेव्हा त्याची तुलना निश्चितच डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेशी होत राहील.

(डॉ. मनमोहन सिंग एक वादळी पर्व या  सुजय शास्त्री यांच्या ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार)

Related posts

Sonia Gandhi: फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड

२६/११ हल्ल्याचा आरोपी अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू

देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यलढ्यात डॉ मनमोहन सिंग यांचे नाव अजरामर