दुस-याच्या खिशातून पैसे काढून तिस-याला खूश करणारी अनेक माणसं असतात. त्यांना स्वतःला काही झळ बसत नाही. आयजीच्या जिवावर… असं काही ठिकाणी त्यांना म्हणतात. प्रत्येक भागात त्यासाठी वेगवेगळी नावं असतील. परंतु आताचा विषय आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील. (Modi and Jill)
जिल बायडन यांना लाखोंचा हिरा भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महागड्या शौकांची चर्चा वेळोवेळी झाली आहे. यावेळी विषय पुढं आला आहे, त्याचं कारण मोदीजींनी अमेरिकन राष्ट्रपती जो बायडन (Je Biden) यांच्या पत्नी जिल बायडेन (Jill Biden) यांना दिलेली महागडी भेटवस्तू. त्या भेटवस्तूची किंमत समोर आली आहे. ती आहे २० हजार अमेरिकन डॉलर. म्हणजे भारतीय रुपयांत बोलायचं तर सतरा ते अठरा लाख रुपये. (Modi and Jill)
ज्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ही भेटवस्तू दिली होती, त्यावेळी एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनं त्यासंदर्भात विचारणा केली होती. अमरावतीच्या अजय बोस नामक कार्यकर्त्यानं मोदीजींनी दिलेल्या भेटीसंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे विचारणा केली होती. परंतु भारत-अमेरिका संबंधांशी निगडित (दोन राष्ट्रांशी संबंधित) ही बाब असल्यामुळे तिची माहिती देता येणार नाही, असे त्यांना कळवण्यात आले होते. (Modi and Jill)
मोदींची भेट सगळ्यात महाग
तर जो बायडेन यांना २०२३ मध्ये मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती अमेरिकेकडूनच प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०२३ मध्ये बायडेन कुटुंबाला मिळालेल्या भेटवस्तूंपैकी मोदीजींनी दिलेला साडेसात कॅरटचा हिरा ही सगळ्यात महागडी भेटवस्तू होती. महागड्या भेटवस्तू देण्यात मोदीजींचा हात जगात कुणी धरू शकत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबीयांनाही मोदीजींनी सतरा भेटी दिल्या होत्या. त्यांची एकूण किंमत ५० हजार अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे ४३ ते ४४ लाख रुपये होते. इव्हांका ट्रम्प म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीला सोन्याचे कडे दिले होते. सात लाखांची फुलदाणी होती आणि चार लाखांची ताजमहालाची प्रतिकृती होती.
भारतीय जनतेच्या करातून हे पैसे येतात.
मनमोहन सिंग देत पुस्तके (Manmohan Singh)
मोदीजींना महागड्या वस्तूंचा शौक आहेच. पण ज्या देशात ८० कोटी लोकांना मोफत धान्य द्यावे लागते, त्या देशाचे लाखोंचा सूट वापरतात. आठ हजार कोटींचे विमान वापरतात. परदेशी नेत्यांना दिलेल्या भेटींची माहिती वर आलीच आहे.
व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. माणसागणिक आवडीनिवडी वेगळ्या असतात. सहज तुलना म्हणून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात त्यांनी काय भेटी दिल्या याची माहिती घेतली. २००९ मध्ये ते अमेरिका भेटीसाठी गेले तेव्हा ओबामा कुटुंबीयांना त्यांनी एक भारतीय गालिचा, पश्मिना शाल भेट दिली होती. त्याचसोबत काही पुस्तकं भेट दिली होती. पंचतंत्राच्या गोष्टी, गांधीजींच्यासंदर्भातलं एक पुस्तक, history of ancient and early medieval india अशा पुस्तकांचा त्यात समावेश होता.
नेत्यानेत्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. छंद वेगळे असतात. मोदीजींना आणि त्यांच्या भक्तांनाही वाटत असावं की अशा महागड्या भेटी देऊन आपली आणि भारताची प्रतिष्ठा वाढते. त्यांचा तो समज कुणी बदलू शकत नाही.
पण एवढं करूनही डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीचं निमंत्रण अद्याप तरी आलेलं नाही. ते लवकरात लवकर यावं, असंच सगळ्यांना वाटतं.
हेही वाचाः
Triple Talaq: व्हिडीओ कॉलद्वारे दिला तलाक
kejari hits back: दहा लाखांचा सूट घालणाऱ्याने ‘शीशमहल’बद्दल बोलू नये