शिवेंद्रसिंहराजेंच्या विजयात जावळीकरांचा वाटा मोलाचा

दत्तात्रय पवार, मेढा : विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळवत विजय संपादन केला. शिवेंद्रसिंहराजे यांना पहिल्या फेरीपासून मताधिक्य मिळत गेल्याने कार्यकर्त्यांच्यात उत्साह व जल्लोषाचे वातावरण होते, तर निकालानंतर तब्बल १ लाख ४२ हजार १२४ मताधिक्याने विजय घोषित होताच संपूर्ण जावळी तालुक्यात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली.

लोकसभा निवडणुकीत भूमिपुत्र म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांना जावळीकरांनी मताधिक्य दिले होते, मात्र विधानसभा निवडणुकीत भूमिपुत्र अमित कदम यांना डावलून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वावर जावळीतील जनतेने विश्वास ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवेंद्रसिंहराजे यांना मताधिक्य मिळवण्यासाठी वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड कारखाना चेअरमन सौरभ शिंदे, बाजार समिती चेअरमन जयदीप शिंदे यांच्यासह मातब्बरांची फौज कार्यरत होती.

लोकसभेमध्ये झालेले मतांचे विभाजन विधानसभेत होऊ नये यासाठी या विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नेत्यांनी मताधिक्य मिळवण्यात यश मिळवले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजेंना कुडाळ गटातून ११ हजार ९७१, म्हसवे गटातून १० हजार ९७२, तर कुसुंबी जिल्हा परिषद गटातून ११ हजार ७८८ मतांची आघाडी मिळाली आहे. तालुक्यातील नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये मताधिक्याचा आत्मविश्वास होताच, त्यामुळे निकालाच्या आधी दोन दिवस कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर देखील काही ठिकाणी लावले होते. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गेल्या पंधरा वर्षांमध्ये केलेली विकासकामे, युवा कार्यकर्त्यांशी जोडलेले मैत्रीचे नाते, ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांना दिलेले आदराचे स्थान यामुळे ही निवडणूक त्यांना सोपी गेली.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवार कोण, असा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडला होता. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघाची हक्काची असणारी जागा शरद पवार गटाने शिवसेनेला देऊ केली. राष्ट्रवादी अजित पवार गट व शरद पवार गट नंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या अमित कदम यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले. या सर्व झालेल्या नाट्यमय घडामोडी पाहता अमित कदम यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली ही बाब शिवेंद्रसिंहराजे यांना फायद्याची ठरली. जावळीतून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी नेते व कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ लागलेली पाहायला मिळाली.

जिल्हा परिषद गटात मताधिक्य

कुडाळ जिल्हा परिषद गटात साखर कारखाना पदाधिकाऱ्यांचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. कुडाळ गटाची मोर्चेबांधणी सौरभ शिंदे यांनी करीत शिवेंद्रसिंहराजेंच्या मताधिक्यासाठी प्रयत्न केले. प्रतापगड सहकारी साखर कारखाना, लालसिंगराव बापूराव शिंदे पतसंस्था, तालुका खरेदी-विक्री संघ इत्यादी सहकारी संस्थांच्या माध्यमातून असलेल्या जाळ्याचा निवडणुकीत फायदा झाला. तसेच म्हसवे, कुसुंबी गटातूनही मताधिक्य मिळाले.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी