दुबईला जाणे आता झाले अवघड

दुबईः सौदी अरेबिया सरकारने व्हिसा नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यांचा विशेषत: दुबईमध्ये कुटुंब किंवा मित्रांसह राहण्याची योजना असलेल्यांवर परिणाम होईल. नवीन नियम आठ डिसेंबरपासून लागू होतील आणि ख्रिसमस आणि नवीन वर्षात दुबईला जाणाऱ्या हजारो भारतीयांवर त्याचा परिणाम होईल. या नियमांमुळे भारतीयांना दुबईला जाणे सोपे राहणार नाही.

हा नियम ८ डिसेंबर ते १४ जानेवारी या कालावधीत दुबईमध्ये खरेदीचा सण आणि सुट्टीचा हंगाम असताना लागू होईल. दुबईमध्ये मित्र किंवा नातेवाइकांसोबत राहणाऱ्या प्रवाशांनी व्हिसासाठी अर्ज करताना होस्टच्या भाडे कराराची प्रत, एमिरेट्स आयडी, निवासी व्हिसा आणि संपर्क माहिती प्रदान करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांशिवाय व्हिसा अर्ज स्वीकारला जाणार नाही. हॉटेलमध्ये राहण्याची योजना आखत असलेल्या प्रवाशांना हॉटेल बुकिंगची कागदपत्रे आणि परतीच्या तिकिटाचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. या नियमांमुळे ज्या प्रवाशांना त्यांच्या ओळखीच्या किंवा मित्रांच्या घरी राहायचे आहे; परंतु आवश्यक कागदपत्रे जमा करता येत नाहीत, त्यांना हॉटेलमध्ये राहण्याची सक्ती केली जाईल.

दुबईमधील हॉटेलचे भाडे प्रतिव्यक्ती वीस हजार रुपये ते एक लाख रुपये असू शकते. कागदपत्रे जमवता न आल्याने अनेकांना प्रवास रद्द करावा लागू शकतो. आठ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुबई शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक सहभागी होत आहेत; मात्र या कडक नियमांमुळे या वेळी पर्यटकांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. दुबई प्रशासनाचे म्हणणे आहे, की सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि अनधिकृत स्थलांतर रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे; मात्र यामुळे भारतीयांसह इतर देशांतील पर्यटक आणि रहिवाशांची गैरसोय होणार आहे.

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले