इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या घरावर बॉम्बहल्ले

तेलअवीव : वृत्तसंस्था : गेल्या वर्षभरापासून पश्चिम आशियामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराला बॉम्बने लक्ष्य करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर इस्रायलच्या सीझेरिया शहरात नेतन्याहू यांच्या घराच्या दिशेने दोन फ्लॅश बॉम्ब टाकण्यात आले; पण सुदैवाने हे बॉम्ब घराबाहेरील बागेत पडल्याने जीवितहानी टळली.

सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सीझेरिया शहरात नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ दोन बॉम्ब टाकण्यात आले. पोलिस आणि अंतर्गत सुरक्षा यंत्रणेच्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आले, क पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील बागेत दोन बॉम्ब पडले. घटनेच्या वेळी पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या महिनाभराच्या काळात नेतन्याहू यांच्या घराला लक्ष्य करण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १९ ऑक्टोबरलाही नेतन्याहू यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले होते. तेव्हा ड्रोनच्या माध्यमातून त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या हल्ल्याची जबाबदारी इराणचा पाठिंबा असलेल्या ‘हिजबुल्लाह’ संघटनेने घेतली होती. त्या वेळी नेतन्याहू यांनी ‘हिजबुल्लाह’ने त्यांची व पत्नीची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे २३ सप्टेंबरनंतर इस्रायलने लेबनॉनमधील ‘हिजबुल्लाह’च्या ठिकाणांवरील हल्ल्यांचा वेग वाढवला आहे.

या घटनेनंतर इस्रायलचे राष्ट्रपती आयझॉक हर्झोग यांनी निषेध नोंदवला आहे, तर संरक्षणमंत्री इस्रायल कॅटझ यांनी सांगितले, की शत्रूंनी आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांना कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

इस्त्रायलच्या हल्ल्यात दहा ठार

शनिवारी, गाझा शहरातील शाती निर्वासित छावणीतील शाळेवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात दहा पॅलेस्टिनी ठार तर २० जण जखमी झाले आहेत. या निर्वासित शिबिरात लोकांवर उपचार केले जात असून सध्या ते विस्थापित कुटुंबांना आश्रय देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले, की संयुक्त राष्ट्र संचालित अबू अस्सी शाळेत अजूनही लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तिथे बचाव कार्य चालू आहे. इस्रायली अधिकाऱ्यांकडून तूर्तास कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Related posts

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित