३१ वर्षे तुरुंगवास आणि १५४ फटक्यांची शिक्षा, कोण आहेत नरगिस मोहम्मदी?

नर्गिस मोहम्मदी

तेहरानः तुरुंगात असलेल्या इराणच्या नोबेल पुरस्कार विजेत्या महिला हक्क कार्यकर्त्या आणि पत्रकार नरगिस मोहम्मदी यांची तीन आठवड्यांसाठी जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२१पासून त्या तुरुंगात आहेत. हिजाबविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व केल्यानंतर त्यांना अटक केली होती. त्यानंतर ३१ वर्षांचा तुरुंगवास तसेच १५४ फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Narges Mahammadi)

महिलांच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवल्याबद्दल नरगिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना तीन आठवड्यांसाठी जामिनावर सोडण्यात आले. तशी माहिती त्यांच्या वकिलांनी, मुस्तफा नीली यांनी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली आहे. किमान तीन महिन्यांच्या सुटकेची मागणी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांनी केली आहे.

नरगिस यांचे व्यक्तिगत जीवन

नरगिस यांचा जन्म २१ एप्रिल १९७२रोजी इराणच्या कुर्दिस्तान प्रांतातील झंजन शहरात झाला. त्यांनी भौतिकशास्त्राची पदवी मिळवल्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. नंतर अभियंता म्हणूनही काम केले. त्या अनेक वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन करीत होत्या. त्यांचे पती तागी रहमानी हेदेखील एक राजकीय कार्यकर्ते आहेत. त्यांनाही चौदा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. अली आणि कियाना या त्यांच्या जुळ्या मुली सध्या फ्रान्समध्ये राहतात. नरगिस गेल्या आठ वर्षांपासून आपल्या मुलांना भेटू शकलेल्या नाहीत.

महिलांच्या हक्कांसाठी लढा

१९९०च्या दशकापासून नरगिस महिलांच्या हक्कांसाठी लढत होत्या. २००३ मध्ये, त्यांनी तेहरान येथील डिफेंडर्स ऑफ ह्यूमन राइट्स सेंटर मध्ये काम सुरू केले. तुरुंगात असलेल्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत केल्याच्या आरोपाखाली २०११मध्ये त्यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली.


व्हाइट टॉर्चर आणि इतर कामगिरी

नरगिस यांनी जेलमध्ये असलेल्या कैद्यांच्या वेदना नोंदवल्या.`व्हाइट टॉर्चर` या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी त्या प्रकाशित केल्या. इराणी सरकारच्या क्रूर अत्याचारांचा दस्तावेज म्हणून या पुस्तकाला ओळखले जाते. २०२२ मध्ये, त्यांना `रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स`च्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

समानता आणि महिला हक्कांची समर्थक

नरगिस मोहम्मदी यांना २०२३ चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. (Nobel Peace laureate) महिलांच्या हक्कांसाठी वीस वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी संघर्ष केला. त्याचमुळे त्यांना इराणी धर्मसत्तेविरुद्धच्या लढाईत स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाऊ लागले. २००३ साली त्या वर्षाच्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या शिरीन एबादी यांनी स्थापन केलेल्या मानवाधिकार केंद्राच्या कामात सहभागी झाल्या. त्यानंतरच्या वर्षांमध्ये, मोहम्मदी यांनी कैद झालेल्या कार्यकर्त्यांना मदत केली. मृत्युदंडाविरुद्ध मोहिमेचे नेतृत्व केले. सरकारपुरस्कृत अत्याचार आणि लैंगिक हिंसाचाराविरोधात आवाज बुलंद केला. नरगिस मोहम्मदी यांच्या कुटुंबीयांनी २०२३मध्ये नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे त्यांच्यावतीने नोबेल पुरस्कार स्वीकारला. त्यामुळे इराणी सरकारने त्यांची शिक्षा पंधरा महिन्यांनी वाढवली.

नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर, “मी लोकशाही, स्वातंत्र्य आणि समानतेच्या प्राप्तीसाठी लढाई कधीच थांबवणार नाही. नोबेल शांतता पुरस्कार मला अधिक खंबीर, ठाम, आशावादी आणि उत्साही बनवेल.” अशा भावना नरगिस मोहम्मदी यांनी व्यक्त केल्या होत्या.

तेरा वेळा अटक

स्वातंत्र्यासाठीच्या लढाईत त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागली. त्यांना तेरा वेळा अटक करण्यात आली. ३१ वर्षांची तुरुंगवासाची तसेच १५४ फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. ऑक्टोबर २०२३ मध्ये, नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यावेळीत्या तेहरानच्या कुख्यात एविन जेलमध्ये कैदेत होत्या.

तुरुंगात असताना नरगिस मोहम्मदी यांनी २०२२ मध्ये इराणी सरकारविरुद्धच्या मोठ्या आंदोलनाला दिशा देण्याचे काम केले. हिजाब परिधान केला नाही म्हणून इराणमधल्या नैतिक पोलिसांनी महसा जीना अमिनी या तरुण कुर्द महिलेला अटक केली. तिचा छळ केला त्यात तिचा मृत्यू झाला. त्याविरोधात इराणमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. त्यातून हे आंदोलन उभे राहिले होते. यातील आंदोलनकर्त्यांविरोधातही सरकारने कठोर कारवाई केली. पाचशेहून अधिक लोक मारले गेले. हजारो जखमी झाले. आणि सुमारे वीस हजार लोकांना अटक करण्यात आली.

महासत्तेच्या पडछायेत 
नईम कासिमचा इस्त्रायलविरुद्ध मोठा विजय मिळवल्याचा दावा
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला

Related posts

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले

झोपेत श्वास अडखळणाऱ्या विकारावरील औषधाला मंजुरी