महागाईने सामान्यांचे बजेट बिघडले

मुंबई; वृत्तसंस्था : कांदा, टोमॅटो, लसूणपाठोपाठ खाद्यतेलानेही सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे. एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकांना मासिक रेशनसाठी अधिक बजेट करावे लागेल.

भाज्या आधीच महागल्या आहेत. अन्नधान्याच्या चलनवाढीमुळे ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाईने १४ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी शेंगदाणा तेलाची किंमत १९३.५८ रुपये प्रति लिटर होती. गुरुवारी ती एक टक्क्याने वाढून १९५.५९ रुपये प्रति लिटर झाली. मोहरीचे तेल २.५ टक्क्यांनी महागून १६७ रुपये प्रतिलिटर तर वनस्पती तेल पाच टक्क्यांनी महागून १४२ रुपये प्रतिलिटर झाले आहे. सोया तेलाची किंमत पाच टक्क्यांनी महागून १४१ रुपये प्रतिलिटर झाली आहे. सूर्यफूल तेलही पाच टक्क्यांनी वाढून १४० रुपयांवरून १४७ रुपये प्रतिलिटर झाले आहे. पामतेलाचे भाव सर्वाधिक ८ टक्क्यांनी वाढून १२० ते १२९ रुपये प्रतिलिटर झाले आहेत.तेलांसोबतच चहाही महाग झाला आहे. त्याची किंमत तीन टक्क्यांनी वाढून २७१ रुपये प्रति किलो झाली आहे. भाज्यांचे दर ३० ते ८० रुपये किलोपर्यंत आहेत. कांद्याला अजूनही ७० ते ८० रुपये किलो भाव मिळत असताना बटाट्याचा भाव ३० रुपये किलो आहे. या महिन्यातही कांद्याचे भाव चढेच राहतील.

‘आयसीआयसीआय’ बँकेच्या अहवालानुसार नोव्हेंबरमध्ये भाज्यांचे भाव चार टक्क्यांनी कमी होऊ शकतात; पण कांद्याचे भाव चढेच राहणार आहेत. नोव्हेंबरमध्ये भाज्यांच्या किमतीत घसरण होऊनही, दर वार्षिक आधारावर अजूनही उच्च आहेत. ऑक्टोबरमध्ये त्यांच्या किमती ४२ टक्क्यांनी वाढून ५७ महिन्यांतील उच्चांकावर पोहोचल्या. टोमॅटो, बटाटे, कांदा या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने बटाटे वर्षभरात ६५ टक्क्यांनी महागले आहेत. एका वर्षात टोमॅटोचे भाव १६१ टक्क्यांनी वाढले आहेत. बटाटे ६५ टक्के आणि कांदे ५२ टक्क्यांनी महागले आहेत.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ