न्यूझीलंडला हरवून भारत तिस-यांदा टी-२० वर्ल्डकप विजेता

अहमदाबादः येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या टी‑20 वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत करून विजेतेपद मिळवले. या विजयाबरोबरच भारत तीन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला देश ठरला आहे. त्याचबरोबर सलग दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणारा आणि मायदेशात वर्ल्ड कप जिंकणाराही भारत पहिला देश ठरला आहे. भारताने यापूर्वी टी‑20 वर्ल्ड कप २००७ आणि टी‑20 वर्ल्ड कप २०२४ जिंकले होते. (India Win T20 World Cup 2026)

तीन अर्धशतकांसह ८०.२८च्या सरासरीने ३२१ धावा फटकावणा-या संजू सॅमसनची प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवड करण्यात आली. तर १५ धावांत चार बळी घेणारा जसप्रीत बूमराह प्लॅअर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आला.

न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे आव्हान

भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. खरेतर भारत तीनशेपर्यंत धावांचे लक्ष्य ठेवेल, अशी एका टप्प्यावरची परिस्थिती होती. परंति जिमी नीशमने एका षटकात तिघांना बाद करून भारताच्या धावसंख्येला लगाम घातला. न्यूझीलंडची संपूर्ण टीम १९ ओव्हरमध्ये १५९धावांवर ऑलआउट झाली. त्यामुळे भारताने ९६ धावांनी विजय मिळवला. (India Win T20 World Cup 2026)

भारताच्या गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी

भारताच्या गोलंदाजांनी अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने चार ओव्हरमध्ये फक्त १५ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने ३ ओव्हरमध्ये २७ धावा देत ३ फलंदाज बाद केले. अर्धशतक झळकावणा-या इशान किशनने तीन अप्रतिम झेल घेऊन विजयात मोलाचा वाटा उचलला. या तिघांबरोबरच संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माच्या कामगिरीमुळे भारताचा विजय सोपा झाला. (India Win T20 World Cup 2026)

न्यूझीलंडची खराब सुरुवात

२५६ धावांच्या मोठ्या लक्ष्यामुळे न्यूझीलंडचे ओपनर टिम सायफर्ट आणि फिन ऍलन यांच्यावर सुरुवातीपासूनच दबाव दिसत होता. पहिल्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडने फक्त चार धावा केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र सायफर्टने आक्रमक खेळ करत हार्दिक पंड्याला २१ धावा ठोकल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने फिन ऍलनला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने रचिन रवींद्रला बाद करून मोठा अडथळा दूर केला. पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडने ३ विकेट गमावून ५२ धावा केल्या. (India Win T20 World Cup 2026)

एकीकडे पडझड होत असताना सायफर्टने मात्र क्रीजवर टिकून राहून २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आठव्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याने मार्क चॅपमन यांना बाद केले. पुढच्या ओव्हरमध्ये वरुण चक्रवर्तीने सायफर्टला बाद करून विजय भारताच्या आवाक्यात आणला. त्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद ७२ अशी होती. यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर आणि डॅरिल मिचेल यांनी थोडाफार प्रतिकार केला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. मात्र तेराव्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने डॅरिल मिचेलला बाद करून ही जोडी तोडली.

बुमराहचा घातक स्पेल

सोळाव्या ओव्हरमध्ये बुमराहने सलग विकेट्स घेतल्या. त्याने जिमी नीशम आणि मॅट हेन्री यांना बाद केले. त्यानंतर अठराव्या ओव्हरमध्ये त्याने कर्णधार सॅन्टनरलाही बोल्ड केले. सॅन्टनरने ४३ धावा केल्या. एकोणिसाव्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अभिषेक शर्माने  जेकब डफीला बोल्ड केले आणि न्यूझीलंडचा डाव१५९ धावांवर संपला. (India Win T20 World Cup 2026)

भारताची झंझावाती सुरुवात

भारताकडून सलामीला नेहमीप्रमाणे संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी जबाबदारी सांभाळली. या संपूर्ण वर्ल्डकपमध्ये खराब कामगिरीमुळे टीकेचे लक्ष्य बनलेल्या अभिषेक शर्माने या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात आपली उपयुक्तता सिद्ध केली. सुरुवातीच्या दोन ओव्हरमध्ये भारताने फक्त १२ धावा केल्या. पण तिसऱ्या ओव्हरपासून दोघांनी जोरदार फलंदाजी सुरू केली. चार ओव्हरमध्येच भारताचा स्कोर ५० पार गेला.

अभिषेक शर्माचे वेगवान अर्धशतक

अभिषेक शर्माने१८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पॉवरप्ले संपेपर्यंत भारताचा स्कोर 92 धावा झाला. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात हा पॉवरप्लेमधील सर्वाधिक स्कोर ठरला. आठव्या ओव्हरमध्ये रचिन रवींद्रने आपल्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माला विकेट कीपरकडे झेल द्यायला भाग पाडले. अभिषेकने २१ चेंडूत ५२ धावा केल्या.(India Win T20 World Cup 2026)

सॅमसन आणि किशनची शतकी भागीदारी

यानंतर ईशान किशन आणि संजू सॅमसन यांनी जोरदार फलंदाजी केली. दहा ओव्हरमध्ये भारताचा स्कोर 127 धावा झाला. संजू सॅमसनने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ही त्यांची सलग तिसरी अर्धशतकी खेळी होती. चौदाव्या ओव्हरमध्ये सॅमसनने रचिन रवींद्रच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार मारले. ईशान किशननेही २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूत १०० धावांची भागीदारी केली. १५ ओव्हरमध्ये भारताचा स्कोर २०० पार गेला.

शेवटच्या ओव्हर्समध्ये नाट्य

सोळाव्या ओव्हरमध्ये जिमी नीशमने तीन विकेट्स घेत न्यूझीलंडला थोडी उभारी दिली. त्याने संजू सॅमसन (८९), ईशान किशन (५४) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (०) यांना तंबूत पाठवले.  यानंतर हार्दिक पंड्या १८ धावा करून बाद झाला.(India Win T20 World Cup 2026)

शेवटच्या ओव्हरमध्ये शिवम दुबेने जिमी नीशमच्या गोलंदाजीवर २४ धावा काढल्या. शिवम दुबे ८ चेंडूत २६ धावा करून नाबाद राहिला. त्यामुळे भारत अडीचशे पार जाऊन न्यूझीलंडला २५५ चे लक्ष्य देऊ शकला.

Related posts

आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम  

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘दिलबहार’उपांत्य फेरीत  

श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनराईज हैद्राबादवर विजय