आमच्या लोकांना त्रास द्याल तर हिशेब करू

बीड; प्रतिनिधी : आमच्या लोकांना त्रास दिल्यास त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. आता मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा आहे, असे सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थित समर्थक आणि कार्यकर्त्यांना मतदानानंतरच ऊसतोडीसाठी बाहेर पडा, असे आवाहन केले. त्याचवेळी दलित, वंचितांना त्रास दिल्यास हिशेब केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. (Pankaja Munde)

भगवान गडावर आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. मंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे, ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यावेळी प्रमुख उपस्थित होते.  परळीतून आम्ही धनुभाऊला तर निवडून देणारच आहोत. पण आता सगळीकडे मी येणार आहे. असे म्हणत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली.

त्या म्हणाल्या, आपल्या मेळाव्याला १८ पगड जातीचे लोक येतात. आजच्या सभेला महाराष्ट्रातून समर्थक आले आहेत.  मी दरवर्षी तुम्हाला साष्टांग दंडवत घालते. कारण माझ्या वडिलाने माझ्या झोळीत तुमची जबाबदारी टाकली आहे. तुम्ही मला जिंकवले, मान दिला. माझा पराभव झाल्यावर तर सर्वांत जास्त मान दिला, या शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. (Pankaja Munde)

भविष्यातील संघर्षात पंकजासोबत : धनंजय मुंडे

धनंजय मुंडे म्हणाले की, मी १२ वर्षांनंतर दसरा मेळाव्याला आलो आहे. १२ वर्षांचा प्रारब्ध मी भोगला आणि त्यांनीही भोगला. पण आता हा प्रारब्ध आता संपला आहे. पुढच्या संघर्षात पंकजाच्या मागे उभे राहायचे असा निर्धार करू या. माझ्या दृष्टीने निवडणूक, राजकारण याच्या पलिकडे हा विचारांचा, भक्तीचा आणि हा शक्तीचा, गोपीनाथ मुंडेंच्या परंपरेचा आणि तो वारसा चालवत असलेल्या पंकजा मुंडे हा दसरा मेळावा आहे.  गोपीनाथ मुंडे आणि पंकजाचा संघर्ष कधी स्वतःसाठी नव्हता. तो फक्त मायबाप जनतेसाठी होता. गोपीनाथ मुंडे यांची संघर्षाची लढाई आता पंकजाने स्वतःकडे घेतली आहे. आता पुढच्या संघर्षामध्ये आपल्याला पंकजाच्या मागे  उभे राहायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

आमचं ध्येय सत्ता नाही : प्रीतम मुंडे

माजी खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या की, ‘हा मेळावा  मुंडे साहेबांच्या लेकीचा आणि बहुजनांच्या एकीचा आहे. म्हणून आजच्या दसरा मेळाव्याचे वेगळे महत्त्व आहे. हा कोणत्याही पक्षाचा राजकीय कार्यक्रम नाही. आजच्या दसरा मेळाव्याला हजारो-लाखो कार्यकर्त्ये स्वयंस्फुर्तीने उपस्थित राहिले आहेत. हजारो-लाखो समर्थक पाठीशी असणाऱ्यांना दोन मिनिटांत सत्ता हाती घेण सहज शक्य आहे. परंतु, आपले ध्येय सत्ता नाही तर सर्वसामान्य जनतेची सेवा करणे हे आहे. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून पंकजा मुंडेंनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.’

पंकजा मुंडे यांच्या पाठीशी राहूया : लक्ष्मण हाके

प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की, भगवानबाबा गडावरील हा दसरा मेळावा भक्ती आणि शक्तीचा सुंदर असा मिलाफ आहे. बहुजनांचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे वारस आहेत. निवडणुका येत असतात जात असतात. आता आपल्याला पंकजा मुंडे यांच्या पाठीशी आपल्याला उभे राहायचे आहे.

समर्थकांची गर्दी

भगवान गडावर झालेल्या मुंडेंच्या दसरा मेळाव्या समर्थकांनी अलोट गर्दी केली होती. यंदा पहिल्यांजाच पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे एकत्रित आले. यावेळी पंकजा मुंडे यांनी उघड्या जीपमधून गडावर एन्ट्री घेतली. त्यांच्या यात्रेत मोठ्या संख्येने समर्थक, कार्यकर्ते उपस्थित होते.  हातामध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पोस्टर घेत पंकजा मुंडे यांनी समर्थकांमधून मंचाकडे प्रवास केला. समर्थकांनी ‘आमचं सरकार आमची ताई’ असा जयघोष केला.

हेही वाचा :

Related posts

परभणीत तरुणाचा मृत्यू

hingoli health news: शस्त्रक्रियेनंतर ४३ महिलांना जमिनीवर झोपवले

धाराशिव : मोबाईल दुकान लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या