रायपूर : छत्तीसगडमधील बस्तर विभागातील विजापूर जिल्ह्यात सोमवारी माओवाद्यांनी केलेल्या स्फोटांत किमान आठ जवान शहीद झाले. माओवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर आयईडी स्फोट केला. आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह एक चालक यात ठार झाला. (IED Blast)
कुत्रु-बेद्रे मार्गावर दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. जिल्हा मुख्यालयापासून किमान ८० किमी अंतरावर कुत्रू हे गाव आहे. तेथे माओवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला. दरम्यान, सुरक्षा दलाने या संपूर्ण प्रदेशाला वेढा दिला आहे. (IED Blast)
गेल्या दोन वर्षांत राज्यातील सुरक्षा दलांवर माओवाद्यांनी केलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे.
दंतेवाडा जिल्ह्यातील डीआरजीचे जवान नक्षलविरोधी कारवाईनंतर त्यांच्या स्कॉर्पिओ वाहनातून परत येत होते. त्यावेळी कुत्रु पोलिस स्टेशन हद्दीतील अंबेली गावाजवळ दुपारी २.१५ वाजता माओवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला, असे पोलिस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी. यांनी सांगितले.
एसयूव्हीमध्ये प्रवास करणारे सर्व आठ डीआरजी जवान आणि वाहन चालक जागीच ठार झाले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
डीआरजी हे राज्य पोलिसांचे एक युनिट आहे आणि त्यातील कर्मचारी बहुतेक स्थानिक आदिवासींतून आणि आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमधून भरती केले जातात. सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे, अशी माहिती आयपीएस अधिकाऱ्याने दिली.
नारायणपूर, दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकांनी तीन दिवस चाललेल्या नक्षलवादविरोधी मोहिमेत हे डीआरजी कर्मचारी सहभागी होते, असे सुंदरराज यांनी सांगितले. तीन दिवस चाललेल्या या कारवाईत पाच नक्षलवादी ठार झाले. यात डीआरजी हेड कॉन्स्टेबललाही आपला जीव गमवावा लागला, असे ते म्हणाले.
हेही वाचा :
बर्थ डे पार्टी झाली आणि दुसऱ्या दिवशी…
कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू