मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, मला हलक्यात घेऊ नका

मुंबई; प्रतिनिधी : ‘आपले सरकार आले तेव्हा हे सरकार काही दिवसांत पडेल. पंधरा दिवसांत पडेल, महिन्यात पडेल, सहा महिन्यांत पडेल, असे दावे केले जात होते. पण टीका करणाऱ्याला हा एकनाथ शिंदे पुरून उरला. जनतेच्या आणि तुमच्या आशीर्वादाने आणि साथीने या सरकारने घासून, पुसून नाही तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मला हलक्यात घेऊ नका, असा इशारा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचले. (Eknath Shinde)

आझाद मैदानावर शनिवारी शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. काहींना हिंदू म्हणून घ्यायची लाज वाटत आहे. हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना आता हिंदू शब्दाची लाज वाटू लागली आहे, असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला.

ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी पाच लाखांचा विमा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आमच्या सरकारकडून अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले जात आहेत. विकासाचे वारे जोरात वाहू लागले आहे. त्यामुळे असत्याचा आणि अहंकाराचा रावण जाळून टाकून प्रगतीचा व विजयाचा निर्धार करू. दोन वर्षांच्या अगदी कमी काळात आपले सरकार लाडके सरकार झाले असून अनेक कामे पूर्णत्वास नेली आहेत. लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ हे सरकारचे ब्रँड अँबेसिडर आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत ते हिसका दाखवतील, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला. (Eknath Shinde)

धारावीकरांच्या पाठीशी…

धारावीतल्या सर्वांना म्हणजे दोन लाख १० हजार जणांना हक्काचे घर देणार आहोत. निवारा देणार आहोत. त्यामुळे विरोधकांच्या कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. प्रत्येक धारावीकरांच्या पाठीशी आमचे सरकार खंबीरपणे उभे आहे. प्रत्येकाला हक्काचे घर देऊ, हा आमच्या डबल इंजीन सरकारचा शब्द आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी आश्वस्त केले.

झोपटपट्टीसाठी योजना

रमाबाई आंबेडकर झोपडपट्टी योजना आम्ही एसआर आणि एमएमआरडीएला दिली आहे. तिथे १७ हजार घरे देणार आहोत. मुंबईत जे रखडलेले प्रकल्प आहेत, ज्यांना भाडे मिळत नाही, काही लोकांना मुंबईबाहेर जावे लागले हे सर्व प्रकल्प सरकार घेणार आणि पूर्ण करणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, ज्योती वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.

ते घरात, आम्ही दारात

कोरोनाकाळात खिचडी आणि कफन यांच्यात पैसे कोणी खाल्ले, मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे तुम्ही आहात, अशी टीका करून मुख्यमंत्री शिंदे म्हणले, सकाळ झाली मोरू उठला. आंघोळ केली आणि मोरू पुन्हा झोपला, अशी काही लोकांची अवस्था होती. बाळासाहेबांच्या मागे अख्खी दिल्ली झुकायची. आताचे त्यांचे नाव घेणारे दिल्लीच्या मागे मला मुख्यमंत्री करा, माझा चेहरा पुढे करा, म्हणून फिरत आहेत. अशावेळी तुमच्या सहकाऱ्यांना तुम्ही चालत नाही तर महाराष्ट्राला कसे चालाल, असा टोला एकनाथ शिंदे यांनी केला. आम्ही पीपीई किट घालून लोकांना मदत करत होतो हॉस्पिटलमध्ये जात होतो. तुम्ही घरात बसून होता, याचा पुनरुच्चार करत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ