भारताची सर्वांगीण प्रगती न होण्याचे प्रमुख कारण हे “सक्तीचे समाधान” आहे. ही एक जणू अफूची गोळी जनतेने घेतलेली असते. (Happiness)
– डॉ. गिरीश जाखोटिया
“चंदन” – आमचा नवा धोबी. थेट गोरखपूरहून पार्ल्यात आला. प्रामाणिक, नम्र, कष्टाळू, मितभाषी आणि शिस्तबद्ध. मी एकदा त्याला सहज विचारलं, “क्यूं चंदन ठीक हो ?” तर तो कसंनुसं हसत म्हणाला, “हां साब, ठीक हूं”. त्याच्या बोलण्यात फारसा उत्साह नव्हता. सोलापूरजवळील एका शेतकऱ्यांच्या समूहाला भेटलो होतो. अत्यंत निराश दिसत होते. उत्तर मात्र असेच, “चालंलय कसंबसं साहेब !” अशी लाखो – करोडो कुटुंबे आणि माणसे आहेत जी नियतीशी जुळवून घेत जगताहेत – आला दिवस पुढे ढकलताहेत. “सक्तीच्या समाधाना”चा जणू करारच केलाय या मंडळींनी नियतीसोबत.(Happiness)
“आहे त्यात समाधान मानून घेण्याची वृत्ती ही अंगी बानवून घ्यावी,” असा जगण्याचा अध्यात्मिक डोस आम्हाला लहानपणापासूनच दिला जातो. परंतु या वृत्तीमुळे समस्यांची उत्तरे शोधण्याची आणि व्यवस्थेला बदलण्यासाठीचा संघर्ष करण्याची आमची वैचारिक बैठक काही तयार होत नाही. यामुळे यावर्षी “वर्ल्ड हॅप्पीनेस इंडेक्स”मध्ये आमचा नंबर ११८ व्वा आहे. (याबाबतीत पाकिस्तान, नेपाळ व अर्थात चीन आमच्यावर आहेत.) अतीउत्तरेकडचा फिनलॅन्ड हा देश सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठ व गॅलप या दोन संस्था ही “सुखानुसारची देशांची क्रमवारी” ठरवत असतात. अर्थात सुख आणि समाधान यांची व्याख्या ही बरीचशी ‘सापेक्ष’ असल्याने काही बाबतीत वैचारिक मतभेद होऊ शकतात. इतकी प्रचंड मोठी सत्ता हाताशी असतानाही ट्म्प साहेबांना नोबेल शांती पुरस्कार मिळाल्याशिवाय समाधान लाभणार नाही. आमच्याकडे काळबादेवीतला गाडीवान संध्याकाळी देवाचे आभार मानत समाधानाने जी पाठ टेकतो, तो डायरेक्ट पहाटेच उठतो. बऱ्याच भरकटलेल्या अमेरिकनांना समाधान शोधण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्यावी लागते. आमच्याकडे गावाच्या पारावर थोडा वेळ बसलात की समाधानाचे फुलारे फुलू लागतात!
सुख (किंवा आनंद) आणि समाधान हे शब्द समानार्थी होऊ शकत नाहीत. समाधान हा काही निवडक गृहितकांवर आधारित असा मेंदूचा उपक्रम असतो जो कृत्रीमरित्याही साधला जाऊ शकतो. म्हणजे ‘समाधान’ हे ‘Systemic’ असू शकतं. कोणत्या यशप्राप्तीवर समाधान बाळगावं, यशाच्या घोडदौडीत कुठे थांबावं याचं काहीएक तत्त्वज्ञान असतं. सर्व सरकार – पुरस्कृत मक्तेदाऱ्या उपभोगूनही एखादा उद्योगपती थांबत नाही कारण तो समाधानी नसतो. निसर्गाशी एकरूप होत जगण्याला समाधानाची बैठक मानणारा एखादा आदिवासी मात्र प्रगतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर थांबतो. आदिवासींचे व उद्योगपतीचे भिन्न भिन्न तत्वज्ञान म्हणूनच एकमेकांच्याविरुद्ध जेव्हा उभे राहते तेव्हा मोठा सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय आणि आर्थिक समरप्रसंग उभा राहतो. सामान्य कुटुंबीयांमध्येही यशाचे, जगण्याचे असे चित्रविचित्र मापदंड वापरले जातात की पूर्ण समाधान हे दुर्बिणीने शोधावे लागते. जगण्याचे तत्वज्ञानच गंडल्याने अनेक सुखवस्तू परिवारांमधील मुले उत्तेजकांच्या आहारी जातात नि न दिसणाऱ्या-न गवसणाऱ्या समाधानाला शोधत राहतात. अर्थात कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, बाजार व्यवस्था इ. बहुतेक व्यवस्थांची हल्ली कुत्तरओढ होत असल्याने या व्यवस्थांचे लाभार्थी सुद्धा “समाधान म्हणजे नेमके काय ?” या प्रश्नाचे उत्तर देताना गोंधळतात. हा गोंधळ फक्त समाधानाच्या व्याख्येपुरता सीमित नाही तर तो असमाधानाच्या कारणांबाबतही आहे. गेल्या तीन दशकांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था मोकळी होत गेली, आमचा जगाशी संपर्क वाढला, माहिती तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी कळत गेल्या, काही अंशी वैज्ञानिक दृष्टीकोनातही सुधार झाला. इतकं सगळं होऊनही आम्ही आजसुद्धा समाधान नसण्याच्या कारणांचा शोध घेत त्यांच्या मुळांपर्यंत जात नाही.(Happiness)
सुखाची किंवा आनंदाची भावना ही एक मनोवस्था असते जी मेंदूपेक्षा मनाद्वारे सक्रीय होते. एखादा अत्यंत विद्वान व आदरणीय मनुष्य हा लहान मुलांमध्ये रमत आनंद चाखेल तर दुसऱ्या एखाद्या महान कलाकाराला पाळीव प्राण्यांच्या सहवासात सुखानुभव जाणवेल. समाधानासारखे आनंदाचे तार्किक मापदंड नसतात. आनंद हा उत्फुल्ल आणि मनस्वी असतो. एकाच घटनेचा आनंद हा वेगवेगळ्या लोकांना भिन्न भिन्न मात्रेने होऊ शकतो. थोडक्यात असे की आईनस्टाईनचा सापेक्षतेचा सिद्धांत हा समाधानापेक्षा आनंदाला जास्त लागू होतो. परंतु समाधान आणि आनंद या दोहोंमधील अन्योन्य संबंध हा मजेशीर असतो. एखादी व्यक्ती समाधानी नसेल तर ती आनंदी असू शकणार नाही. आनंदी व्यक्ती मात्र समाधानाची फारशी चिंता करणार नाही. समाधानी असणारी व्यक्ती ही आनंदी असेलच असे नाही. म्हणजे आनंद आणि समाधान हे एकाच वेळी असतीलही आणि नसतीलही. हां, साधारणपणे समाधान ही मनोवस्थेची पहिली पायरी असेल तर आनंद किंवा सुख ही दुसरी पायरी असू शकेल. समाधान हे मेंदूचे काम असल्याने ते दीर्घकाळ जनुकांमध्ये स्थानापन्न झालेले असते. आनंद मात्र उत्फुल्ल असल्याने ते अल्पजीवी असू शकते. याचा अर्थ असा होतो की सतत आनंदी रहाण्याची कसरत ही अवघड असते. परंतु ‘बेस लेवल’ला आपण नीटपणे समाधानी असलो तर सदोदितपणे ‘आनंदी’ राहणे सहज जमून जाते. श्रीमंत – गरीब अशा सर्वच भारतीयांना ‘आनंदी’ राहणे फारसे जमत नाही. अनेक बोजड व जुनाट सामाजिक बंधनांमध्ये आम्ही अडकलेलो असल्याने छोट्या छोट्या आनंदालाही आम्ही मुकत राहतो. उदाहरणार्थ, “टवाळा आवडे विनोद” हे तद्दन मूर्खपणाचे सुभाषित (?) कुणी रचले ते माहीत नाही. परंतु विनोदाने जो काही क्षणांसाठीचा आनंदाचा शिडकावा होतो, त्याला तोड नाही. ज्या घरात मनमोकळा संवाद असतो, एकमेकांच्या मतांबद्दल आदर असतो आणि फालतू अवडंबरे नसतात त्या घरात आनंदालाही रहायला आवडते.
बरेच संस्कृतीरक्षक पुरुष आणि तत्सम स्रिया अधूनमधून सांगत असतात की भारतीय विवाह संस्था ही अत्युत्तम, अजोड आणि टिकाऊ आहे. परंतु एक महत्त्वाची बाब ते सांगत नाहीत की ही विवाह संस्था मुख्यत्वे स्रियांनी आपल्या समाधानाशी केलेल्या तडजोडींमुळे टिकून आहे. स्रीचे मन खोलात जाऊन जाणण्याचा प्रयत्न केल्यास हे उमजेल की ती पूर्णपणे समाधानी नाही. पदोपदी पुरुषी वर्चस्वाच्या परंपरा ती झेलत राहते. आर्थिक परावलंबन, तथाकथित सामाजिक व धार्मिक प्रथा, समाजाचा – नातेवाईकांचा दबाव, अनेक अंधश्रद्धा इ. गोष्टींमुळे स्वतःच्या समाधानाला मुरड घालत भारतीय स्री ही आपला संसार टिकवत आली आहे. नव्या युगातील मुली शिक्षण व आर्थिक स्वावलंबनामुळे हल्ली आपल्या समाधानाबाबतीत एकतर्फी तडजोड करायला नाखुश असतात. अर्थात हे आजही अनेक दुढ्ढाचारी पुरूषांना आवडत नाही. ९०% बहुजन हे आजसुद्धा स्वतःच्या समाधानाशी तडजोड करीत आयुष्य कंठीत असतात. ते व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करत नाहीत. आपले “असमाधान” हे आपल्याच पूर्वजन्मातील पापाचे फलित आहे असे त्यांना वाटते. पुढील जन्मी हे असमाधान मिटेल किंवा मरणानंतर आपण “स्वर्गवासी” झाल्याने भरभरून आनंद मिळेल या भाबड्या आशेवर मूर्ख लोक अन्याय सहन करीत राहतात. ८४ लक्ष योनींमधून आपणांस मोक्ष मिळेल या अध्यात्मिक कल्पनेवर आधारित ते जपजाप्य, अनवाणी चालत तिर्थाटन करणे, अखंड ग्रंथपठण, नवस, क्लिष्ट आणि खर्चिक पूजा, बाबा – बापू – आचार्य – मौलवींचे अंगारेधुपारे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रवचन – श्रवण, दानधर्म इ. अनेक गोष्टी ते करीत राहतात नि जमवलेला पुण्याचा साठा कुटुंबियांना सोपवत केव्हा तरी मरून जातात. या संपूर्ण वाटचालीत त्यांना सहसा कधीही असे वाटत नाही की मानवी जीवनाच्या समस्या ज्या “भौतिक” आहेत त्यांचे समाधानही “भौतिक”च असते. अध्यात्मिक साधनेतून असमाधान सहन करण्याची थोडीबहुत ताकद ही जरूर मिळते परंतु बहुसंख्य पीडितांच्या पीडेचे उत्तर त्यातून मिळत नाही. यामुळे बहुजनांचा समाज हा पीडाग्रस्त व गोंधळग्रस्त रहात स्थितीजन्य बनतो. तो समाधानाच्या बाबतीत उत्क्रांत होत नाही.(Happiness)
सक्तीचे समाधान मानण्याच्या खोलवर रूजवलेल्या प्रवृत्तीमुळेच भारतीय लोक रोजच्या जगण्यातील समाधान वाढविणाऱ्या संशोधनांवर काम करत नाहीत. आज दूरदेशी राहणाऱ्या मुलांना व्हिडीओ कॉन्फरन्स करीत आम्ही पाहू शकतो, हे समाधान किती मोठे ! क्षणार्धात आमचे मेसेजेस सातासमुद्रापार पोहोचतात नि त्यांची उत्तरेही मिळतात, हा आनंद अगदीच अवर्णनीय ! अन्यथा पूर्वी पोस्टाचे एक पत्र चातकासारखी खूप वाट पाहिल्यानंतर मिळायचे. पूर्वी सातासमुद्रापार जायची बंदी असायची. हल्ली पंधरा तासात तुम्ही न्यूयॉर्कला पोहोचता. हे सारे काही शक्य झाले ते समाधानाच्या नवनव्या पायऱ्या चढण्याच्या उमेदीमुळे. युरोपात काही शतकांपूर्वी “रिनाईसंस” नावाची मोठी सांस्कृतिक – सामाजिक क्रांती झाली. या सामूहिक विद्रोहातून पाखंडाला हद्दपार करण्यात आले. जगण्याच्या एकूण व्यवस्थेत वैज्ञानिक आधाराने अनेक बदल आणले गेले. आम्ही त्याचवेळी इकडे भारतीय उपखंडात मात्र जपजाप्यावर समाधान मानत मुघलांचे आक्रमण स्विकारले. नंतरही वैज्ञानिकरित्या पुढारलेले फक्त काही हजार इंग्रज कोट्यवधी भारतीयांवर दीडशे वर्षे राज्य करून गेले. आम्ही मात्र पारंपारिक समाधानाच्या मूर्ख संकल्पनांना चिटकून रहात “मागासलेपणा”चे उदात्तीकरण करीत राहिलो. सक्तीच्या या समाधानाचे आम्ही अध्यात्मिक भाषेत समर्थन करताना आजही म्हणत राहतो, “ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान !” मनःशांतीसाठी हे ठीक आहे परंतु भविष्यातील आमच्या अस्तित्वाची ग्यारंटी यामुळे मिळत नाही.
उदाहरणार्थ, यांत्रिकीकरणामुळे अनेक हस्तोद्योग व कुटिरोद्योग हे बंद पडले. आर्टिफिशल इंटिलिजंसच्या आजच्या क्रांतीमुळेही अनेक नोकऱ्या नष्ट होणार आहेत. या अशा साधारण जाणिवेने सुद्धा आमचे सुख हरपते. मनात नैराश्याची भावना येऊ लागते. परंतु या परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या मार्गाचा आम्ही नीटपणे विचार करत नाही कारण आहे त्याच परिस्थितीशी तडजोड करण्यात आम्ही समाधान मानत असतो. इतरांनी लावलेल्या – वाढवलेल्या झाडाची आम्हाला आयती फळे खायची असतात. इतरांची “कॉपी मारण्यात” आम्ही खूप पटाईत असतो. आम्ही रोजच्या गरीबीत खितपत पडून राहू परंतु बदल करण्यासाठीचा सक्रीय विद्रोह मात्र करणार नाही. आमची ही परिस्थिती बदलायला एखाद्या जागृत देवाला आम्ही नवस घालू. म्हणजे पुन्हा सुटकेचा सोपा मार्ग ! आपल्या समाधानासाठी, आनंदासाठी आणि सुखासाठी आम्ही नेहमी देवाला टेंशन देत असतो कारण आम्हाला स्वतःला फारसे कष्ट करायचे नसतात.
भारताची सर्वांगीण प्रगती न होण्याचे प्रमुख कारण हे “सक्तीचे समाधान” आहे. ही एक जणू अफूची गोळी जनतेने घेतलेली असते. खोलात जाऊन विचार केल्यास या सक्तीच्या समाधानाची काही महत्त्वाची कारणे सापडतात, जसे की – इनोव्हेशन नाही, नवे पाऊल उचलण्याचे धाडस नाही, व्यवस्थेतील बदलासाठीचा उठाव नाही, तर्कनिष्ठता व शिस्त नाही, येथील अभिजनांमध्ये बौद्धिक प्रामाणिकपणा कमी आहे, बहुतेक क्षेत्रांमध्ये दूरदर्शी नेतृत्व नाही, सर्वच प्रकारच्या भ्रष्टाचाराची रेलचेल आहे आणि जगण्याचे उत्तम तत्वज्ञान नाही. आपल्या उच्चतम समाधानासाठी आपणच मेंदू आणि मनगटाचा सामूहिक व वैयक्तिक वापर केला पाहिजे, अशी आमची मनोधारणा साधारणपणे नसल्याने आम्ही प्रगतीचा विचार चिकाटीने करीत नाही. स्वातंत्र्यप्राप्ती मिळून ७८ वर्षे झाली परंतु आजही ८० कोटी भारतीयांना प्रत्येकी पाच किलो धान्य द्यावे लागते. सन १९५० पर्यंत आमच्या मागे असलेला चीन समाधानाबाबतीत आमच्या बराच पुढे निघून गेलाय.
हां, आम्ही लोकसंख्येच्या बाबतीत चीनच्या पुढे जरूर गेलो आहोत. जगातील सर्वात मोठी “संख्यात्मक” लोकशाही आमची आहे हे वास्तव तर आहेच परंतु ती “गुणात्मक”रित्या सर्वोत्तम होण्यासाठी आम जनतेच्या संपूर्ण आणि खऱ्या समाधानावर आम्हाला प्रचंड काम करावे लागेल. अर्थात असंघटित बहुजनांना, शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना जोपर्यंत आपण संपूर्ण समाधानाचे नि म्हणून आनंदाचे हकदार आहोत हे कळत नाही तोपर्यंत एक राष्ट्र म्हणून आम्ही सशक्तपणे जागतिक पटलावर उभे राहणे अवघडच असेल. आमच्या अर्थव्यवस्थेच्या “ट्रिलियन” आकारात बहुजनांचा हिस्सा किती आहे व असेल, हे एकच परीमाण आमची पुढची वाटचाल ठरवेल. बहुजन युवक “वास्तव समाधाना”ची व्याख्या शोधताहेत – बनवताहेत नि तत्संबंधीत त्यांना पडणारे प्रश्नही विचारताहेत !