-प्रा. प्रशांत नागावकर
सुगुण नाट्यकला संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेले प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाने ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेला कोल्हापूर केंद्रावर सुरुवात झाली.
१९६२ साली प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले. ते कमालीचे लोकप्रिय ठरले. नाटकाची पार्श्वभूमी ऐतिहासिक असली तरी त्यात कौटुंबिक ताणतणाव आहेत. नाटक छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्यावर बेतलेले असले तरी खऱ्या अर्थाने ते आधुनिक काळातील पितापुत्र संबंधावर आधारित आहे. त्यातही एका बापाच्या हृदयातील खंत अधिक तीव्रतेने व्यक्त करते. थोडक्यात, ते भवतालच्या ढासळत्या एकत्र कुटुंब व्यवस्थेसंदर्भातील आहे.
सुगुण नाटकाला संस्थेने या नाटकाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हे नाटक निवडण्यामागे दिग्दर्शकाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आपल्या दिग्दर्शकीय दृष्टिकोनात ते स्पष्ट म्हणतात की, दोन पिढ्यातील भिन्न विचारसरणी आणि स्वभावधर्म यातील अंतर या नाटकात अधोरेखित होत असल्यामुळे ते अंतर अजूनही अखिल मानवजातीमध्ये आहे. ते यापुढेही असणारच, अशा स्वरूपाची समकालीन मूल्ये या नाटकातून अधिक तीव्रतेने येत असल्यामुळेच हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेसाठी निवडल्याचे स्पष्टच आहे.
सुगुण नाट्यकला संस्था ही कोल्हापुरातील एक महत्त्वाची नाट्य संस्था आहे. ती सातत्याने राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेत आली आहे. आतापर्यंत त्यांनी ‘नटसम्राट, ’ ‘ती फुलराणी,’ ‘नागमंडल, ’ ‘विच्छा माझी पुरी करा,’ ‘हमीदाबाईची कोठी,’ ही काही प्रमुख नाटके उत्तमपणे सादर केली आहेत. दिग्गज मातब्बर नाट्यसंस्थेच्या गजबजाटात ‘सगुण’ ने नेहमीच आपले वेगळेपण जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अशा संस्थेचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते,’ या नाटकाच्या माध्यमातून अतिशय उत्तम असे सादरीकरण नाट्य स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेला रंगतदार सुरुवात झाली आहे.
मराठी रंगभूमीवर ऐतिहासिक नाटक सादर करण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे. तीच पारंपरिक ऐतिहासिक नाट्यशैली ‘सुगुण’नेही स्वीकारली. आजपर्यंत काही अपवादात्मक ऐतिहासिक नाटके रूढ ऐतिहासिक नाटकांच्या सादरीकरणाची चौकट मोडून सादर झाली आहे. पण बहुतांशी ऐतिहासिक नाटके ही पारंपरिक अभिजात शैलीत सादर करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. सगुण याला अपवाद नाही. राज्य नाट्य स्पर्धा म्हणून ऐतिहासिक नाटकाला वेगळ्या प्रायोगिक शैलीत सादर करण्याचा अट्टहास त्यांनी ठेवला नाही. ऐतिहासिक नाटकाचे सादरीकरण हे ‘स्टाईलाइज्ड’ असते याचा पुन: प्रत्यय हे नाटक बघताना आला.
ऐतिहासिक नाटक हा एका अर्थाने ‘कॉश्च्युम प्ले’ म्हणजे पोशाखी नाट्यच असते, असाही एक प्रवाद आहे. सगुणने सादर केलेले हे ऐतिहासिक नाटकही ‘कॉश्च्युम प्ले’ चा उत्तम नमुनाच म्हणावा लागेल. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक ऐतिहासिक अशा पारंपरिक शैलीत सादर केले. बॉक्ससेट, ऐतिहासिक काळाला साजेशी झगमगीत वेशभूषा अशा अनेक पारंपारिक गोष्टी स्वीकारलेल्या आहेत.
या नाटकातील अभिनय शैली ही वास्तविक नाटकातल्या अभिनय शैलीशी फटकून ती ऐतिहासिक स्वरूपाची असल्याने ‘कृत्रिमता’ नाटकातील सर्व कलाकारांच्या अभिनयाच्या शैलीत कळत नकळतपणे दिसून येते. कदाचित हा दोष कलाकारांच्या अभिनयाचा नसून दिग्दर्शकाने जाणिवपूर्वक दिलेल्या किंवा निवडलेल्या स्टाइलाइज्ड अॅक्टिंग ट्रिटमेंटचा असावा. ऐतिहासिक नाटक असल्याने नाटकातील संवाद मेलोड्रमॅटिक, कृतक, भावुक स्वरूपाचे आहेत. उत्तम पाठांतर त्याचबरोबर संवादातील आशय समजून घेत केलेली संवादफेक, त्याला साजेसा अभिनय, ही वैशिष्ट्ये सर्वच कलाकारांमध्ये पाहायला मिळाली. कमालीचा आत्मविश्वास सर्वच कलाकारांच्या अभिनयांमधून दिसून आला. ही अत्यंत महत्त्वाची आणि जमेची बाजू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेल्या ओंकार नलवडे यांनी आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्तीरेखेला अत्यंत कौशल्याने न्याय देण्याचा प्रयत्न केला. अत्यंत प्रिय असणाऱ्या शिवाजी महाराजांची भूमिका आपण साकार करतो आहोत, याचे भान त्यांनी संपूर्ण नाटकभर ठेवल्याचे दिसून आले. गैरसमजातून आपल्यापासून दुरावलेल्या मुलाच्या संदर्भात होणाऱ्या यातना त्यांनी नेमकेपणाने अभिनित केल्या. एका बापाची खंत तीव्रतेने प्रेक्षकांसमोर मांडण्यात ते यशस्वी ठरले.
रोहन घोरपडेने संभाजीराजे अत्यंत प्रगल्भतेने सादर केला. पित्यानेच आपल्यावर जाणीवपूर्वक अन्याय केल्याचे शल्य मनात ठेवूनही वडिलांविषयीचा आदर तितक्याच तीव्रतेने प्रकट केला. यातून त्याच्या अभिनयाची समज लक्षात येते. या दोन्ही कलाकारांनी मनातील अंतरिक संघर्ष तितक्याच ताकदीने अभिनयातून व्यक्त केला.
पद्मजा पाटील आणि सुप्रिया अनुक्रमे सोयराबाई आणि येसूबाईची भूमिका संयतपणे सादर करण्यात यशस्वी ठरल्या. राजघराण्यातील स्त्रियांचा आदबशीरपणा त्यांनी हुबेहूब पकडला.
या सगळ्यातही कीर्ती कुमार पाटील यांनी उभारलेला राजाराम आपल्या भूमिकेत शोभून दिसतो. त्याने अल्लडपणा बाहेर काढण्यासाठी अत्यंत खुबीने काही क्लृप्त्या शोधल्याचे दिसते. त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. शरद पाटील, योगेंद्र माने आणि राहुल पाटील यांनी हंबीरराव, अण्णाजी आणि मोरोपंत या व्यक्तिरेखा समजून घेऊन आपापल्या भूमिकांना न्याय दिला. या व्यक्तिरेखा इतरांच्या दृष्टीने गौण असल्या तरी त्यांच्या अभिनयामुळे नाटकात त्या महत्त्वाच्या ठरल्या आहेत. याबरोबरच शाहीर-सारंग सोनुले, बाळ शंभू – कु. मंजिरी चव्हाण यांनी आपल्या वाट्याच्या छोट्या भूमिकाही उत्तमपणे साकारल्या. त्यामुळे एक संपूर्ण सांघिक आविष्कार पाहायला मिळाला.
प्रकाश योजनेतील झगमगीत आणि चकचकीतपणा प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करत असला तरी काही वेळेला दिवाळीच्या रोषणाईची आठवण आल्या वाचून राहत नाही. नाटकाचे नेपथ्य बॉक्ससेट स्वरूपाचे असल्याने सूचकात्मकता किंवा प्रतीकात्मकता दाखवून देण्यास फारसा वाव नव्हता. पार्श्वसंगीत प्रसंगाला साजेसे. पण काही ठिकाणी वापरलेली ध्वनिमुद्रिके रसभंग करत होती. ऐतिहासिक पात्रांना शोभेशी वेशभूशा होती. त्यातील रंगसंगतीची निवड लक्षणीय तितकीच आशयपूर्ण ठरली. दिग्दर्शक म्हणून सुनील घोरपडे यांनी काही जागा अत्यंत खुबीने हेरल्या आहेत. काही ठिकाणी त्यांनी मांडलेल्या कम्पोझिशन्समधून प्रसंगाचा आशय व्यक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
- नाटक : रायगडाला जेव्हा जाग येते
- लेखक : प्रा. वसंत कानेटकर
- सादरकर्ते : सुगुण नाट्यकला संस्था, कोल्हापूर
- दिग्दर्शक : सुनील बाळासाहेब घोरपडे
- नेपथ्य आणि पार्श्वसंगीत : ओंकार घोरपडे
- रंगमंच व्यवस्था : सागर भोसले, समीर भोरे, पार्थ घोरपडे
- प्रकाश योजना : सुनील घोरपडे
- वेशभूषा : सुप्रिया घोरपडे, शिवानी घोरपडे, रोहिणी पाटील
- रंगभूषा : सुनील मुसळे
- रेकॉर्डिंग : ओंकार सुतार (स्वरतृप्ती रेकॉर्डिंग स्टुडिओ)
पात्र परिचय
- शिवाजी महाराज : ओंकार नलवडे
- राजाराम महाराज : कीर्तीकुमार पाटील
- हंबीरराव : शरद पाटील
- आण्णाजी : योगेंद्र माने
- मोरोपंत : राहुल पाटील
- येसूबाई : सुप्रिया पाटील
- सोयराबाई : पद्मजा पाटील
- शिवाजी राजे आणि मावळा : समीर भोरे
- बाळ शंभू : कु. मंजिरी चव्हाण
- शाहीर : सारंग सोनुले
- शंभूराजे : रोहन सुनील घोरपडे