Uddhav Thackeray : आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शी करा

नागपूर; विशेष प्रतिनिधी : ‘वन नेशन वन इलेक्शन’ होता कामा नये. त्याआधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. निवडणूक आयुक्तांची नेमणूकही निवडणुकीतून केली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. (Uddhav Thackeray)

हिवाळी अधिवेशनासाठी सहभागी होण्यासाठी ठाकरे मंगळवारी नागपूरला आले होते. विधान परिषदेत काही काळ उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा व महायुती सरकारवर जोरदार टीका केली. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ यांच्यासह शिवसेनेतील अनेक आमदार नाराज आहेत. त्यांना पुन्हा पक्षात घेणार का? अशी विचारणा केली असता त्यांना पहिल्यांदा आपली भूमिका स्पष्ट करू द्या मग पाहू, असे उत्तर दिले. हिवाळी अधिवेशन सुरू झाले. पण हे बिन खात्याचे मंत्रिमंडळ असून अद्याप खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे नेमकी जबाबदारी कोणावर, हे कधी निश्चित होणार, असा सवाल केला. (Uddhav Thackeray)

लवकरात लवकर खातेवाटप व्हायला पाहिजे होते. पण, राक्षसी बहुमत मिळाल्यानंतरही शपथविधीपासून मंत्रिमंडळ विस्तारात वेळ गेला. खातेवाटपही अजून झाले नाही. कोणताही मंत्री कोणत्याही प्रश्नाला उत्तर देतोय. हे काय चालले आहे, अधिवेशन घेतले कशाला? असा सवाल त्यांनी केला.

‘लोकसभेत वन नेशन वन इलेक्शन’ आणण्यात आले आहे. त्या विधेयकाबाबत ते म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शी करण्याची आवश्यकता आहे. कारण राज्यातील सध्याचे सरकार हे ईव्हीएम सरकार असल्याचे जनतेचे मत बनले आहे. तीव्र नाराजी असतानाही ते बहुमताने निवडून येतातच कसे, याबाबत जनतेमध्ये शंका व्यक्त होत आहे. निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील आणि ते जर आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही आणि अशा व्यक्तीच्या अधिपत्याखाली ‘वन नेशन वन इलेक्शन’ होता कामा नये. पहिला प्रथम निवडणूक आयुक्तही निवडणूक प्रक्रियेतून निवडला पाहिजे. त्यासाठी मतप्रक्रिया कशी घ्यायची हे ठरवावे लागेल. (Uddhav Thackeray)

राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘आरेमधील मेट्रोच्या कारशेडसाठी झाडांची कत्तल केली गेली. त्याच्यामध्ये यांना कुठे पर्यावरण दिसले नाही. तसेच आता डोंगरी येथे कारशेडसाठी  चौदाशे झाडांची कत्तल केली जाणार आहे. पर्यावरणाची तज्ञांची समिती हे होऊ देणार आहे का? राज्यातील  कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल, महिलांच्या सुरक्षेबद्दल राज्यपालमहोदयांच्या अभिभाषणात काही आढळले नाही.

सरकारची झाली रे दैना

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी ‘जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना,’ असे म्हटले होते. त्याबाबत बोलताना ठाकरे सरकारची झाली आहे दैना, अशी टीका केली. छगन भुजबळ माझ्याशी अधूनमधून संपर्कात असतात, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

उद्धव-राज ठाकरे एकत्र