माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट निर्दोष

नवी दिल्ली : गुजरातच्या पोरबंदरमधील न्यायालयाने माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांची एका खटल्यात निर्दोष मुक्तता केली. १९९७ च्या एका खटल्यात कोर्टाने हा निकाल दिला. त्यांच्याविरोधात पुरावे सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरला असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. (Sanjiv Bhatt)

१९९७ मध्ये संजीव भट्ट पोरबंदरचे पोलीस अधीक्षक होते. त्यावेळी एका गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नारन जादवचा गुन्हा कबूल करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप होता. या प्रकरणात भट्ट यांच्यासह वाजूभाई चौ या पोलीस शिपायावरही गुन्हा दाखल झाला होता. चौ यांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला.

खटल्याची पार्श्वभूमी

१९९४ मध्ये शस्त्रतस्करीच्या गुन्ह्यात २२ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यात नारन जादवचाही समावेश होता. अटकेनंतर त्यांची रवानगी अहमदाबाद मध्यवर्ती कारागृहात झाली होती. पोरबंदर पोलिसांचे एक पथक ५ जुलै १९९७ मध्ये जादवला अहमदाबाद गेले. मध्यवर्ती कारागृहातून बदली वॉरंट घेऊन बाहेर पडले. तेथून भट्ट यांच्या पोरबंदरमधील निवासस्थानी घेऊन आले. तेथे माझा छळ करण्यात आला. यावेळी मला आणि माझ्या मुलाला विजेचे चटके देण्यात आले, असा आरोप जादवने केला होता.

तथापि, या आरोपात कसलेही तथ्य नसल्याचे सांगत पोरबंदरचे मुख्य न्यायदंडाधिकारी मुकेश पंड्या यांनी संजीव भट्ट यांची शनिवारी, ७ डिसेंबररोजी निर्दोष मुक्तता केली. (Sanjiv Bhatt)

कोर्टाने या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली असली तरी त्यांच्यावर वेगवेगळ्या कोर्टात आणखी काही खटले सुरू आहेत. त्यामुळे भट्ट यांचा कायदेशीर संघर्ष यापुढेही सुरूच राहणार आहे.

कोर्टाने नोंदवलेले निरीक्षण

  • गुन्हा कबूल करण्यासाठी तक्रारदाराचा छळ करण्यात आला, त्यासाठी घातक शस्त्रांचा वापर करण्यात आला किंवा त्याला धमक्या देण्यात आल्याचे फिर्यादी पक्षाला सिद्ध करता आले नाही.
  • भट्ट हे त्यावेळी वरिष्ठ सरकारी अधिकारी होते. त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यासाठी आवश्यक त्या सरकारी परवानग्या घेतल्या गेल्या नाहीत.

भट्ट यांच्याविरोधातील खटले आणि झालेल्या शिक्षा

  • पोलीस कस्टडीतील मृत्यू प्रकरण (१९९०) : जामनगरमधील पोलीस कस्टडीत असताना एका आरोपीच्या मृत्यूप्रकरणात आजन्म कारावास.
  • ड्रग प्लांटिंग (मार्च २०२४) : राजस्थानातील एका वकिलाला ड्रग्ज प्लांट प्रकरणात अडकवण्याच्या प्रकरणात २० वर्षाची शिक्षा.
  • याशिवाय २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगल प्रकरणात पत्रकार आणि नागरिक अधिकार कार्यकर्ता तिस्ता सेट्लवाड आणि गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार यांच्यासह भट यांच्यावर खोट्या साक्षी पुरावे तयार केल्याचा आरोप
  • तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरात दंगलीचा आरोपही त्यांनी केला होता. मात्र विशेष तपास पथकाने (एसआयटी) हे सर्व आरोप फेटाळले होते.
  • भट्ट यांना २०११ मध्ये निलंबित करण्यात आले. त्यानंतर २०१५ मध्ये ‘अनधिकृत अनुपस्थिति’चे कारण देत त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. सध्या ते राजकोट मध्यवर्ती कारागृहात आहेत.

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले