मुंबई : विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परभणी जिल्ह्यातील माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश झाला. (Durani Join Congress)
दुर्राणी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र महाविकास आघाडीच्या वाटेला ही जागा न आल्याने ते नाराज होते.
यावेळी सपकाळ म्हणाले की, देशात दोन विचारधारा असून समतेचा, संविधानाचा सर्वांना सोबत घेऊन जाणारा एक विचार आहे आणि दुसऱ्या बाजूला संविधान व लोकशाही न माननारा हुकूमशाही व ‘हम दो हमारे दो’, हा विचार आहे. भारताचा व काँग्रेसचा डीएनए एकच आहे. देशात व राज्यात सध्या अराजक माजले आहे. एका उद्योगपतीसाठी देशाला वेठीस धरले जात आहे, तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात धुमश्चक्री सुरु आहे. यातून ‘महाराष्ट्र धर्म’ वाचवण्याची गरज असून बाबाजानी दुर्राणी यांनी देशाला जोडणारा, महाराष्ट्र धर्म वाचवणारा विचार निवडला आहे. येणारा काळ हा काँग्रेसचा असेल असे सांगून बाबाजानी दुर्राणी यांच्या काँग्रेस प्रवेशाने परभणी जिल्हा व मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला अधिक बळ मिळेल असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला. (Durani Join Congress)
माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले की, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
बाबाजानी दुर्राणी यावेळी म्हणाले की, भाजपा युती सरकारमध्ये अल्पसंख्याक, ओबीसी व मागासवर्गीय समाज सुरक्षित नाही. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी राज्य आहे आणि मी व माझे सहकारीही याच विचाराचे आहोत. काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा असून देशात आगामी काळात काँग्रेस व भाजपा हे दोनच पक्ष राहतील असे दुर्राणी म्हणाले. तसेच परभणी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष एक नंबरचा करु असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. (Durani Join Congress)
यावेळी शरद पवार पक्षाचे नागपूर शहर उपाध्यक्ष शिव लिलाधर बेंडे, नागपूर अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष रिजवान अन्सारी, नागपूर शहर जिल्हा प्रवक्ता संतोष सिंह, भारतीय कामगार सेना नागपूर जिल्हा अध्यक्ष राजेश रंगारी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नागपूरचे माजी महानगर अध्यक्ष श्याम चौधरी व मुंबईतील मालाडचे मनसेचे नेते राजेश नंदनवार यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या कार्यक्रमाला माजी मंत्री अमित देशमुख, काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व परभणीचे निरीक्षक, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व परभणीचे निरीक्षक अतुल लोंढे, प्रा. यशपाल भिंगे, किशोर कान्हेरे, माजी खासदार हुसेन दलवाई, परभणी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शफी इनामदार, बाळासासाहेब देशमुख, आदी उपस्थित होते.
नवनियुक्त तालुकाध्यक्षांचे शिबीर
काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त तालुकाध्यक्षांच्या दोन दिवसीय शिबिराचे उदघाटन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते झाले. हे शिबीर दोन दिवस चालणार असून शुक्रवारी दुपारी ४ वाजता या शिबिराचा समारोप असेल. पक्ष संघटना वाढ, आगामी निवडणुका तसेच विविध मुद्द्यांवर यावेळी ऊहापोह होणार आहे.
हेही वाचा :
राहुल यांनी फोडला बॉम्ब; पुराव्यानिशी उघड केली ‘मत चोरी’
मतापासून दूर ठेवून वंचितांचा आवाज दाबला जाऊ नये : अमर्त्य सेन