शंभर टक्के आयातशुल्क लावण्याचा ट्रम्प यांचा इशारा

न्यू यार्क : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘सोशल मीडिया अकाउंट’वरून पोस्ट करताना ‘ब्रिक्स’ देशांवर आयातशुल्क लागू करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी डॉलर व्यतिरिक्त इतर कोणत्याही चलनात व्यापार करणाऱ्या ‘ब्रिक्स’ देशांवर शंभर टक्के शुल्क लागू करण्याचा इशारा दिला आहे.

ट्रम्प म्हणाले की, आम्हाला ‘ब्रिक्स’ देशांकडून हमी हवी आहे की, ते व्यापारासाठी अमेरिकन डॉलरच्या जागी कोणतेही नवीन चलन तयार करणार नाहीत किंवा ते इतर कोणत्याही देशाच्या चलनात व्यापार करणार नाहीत. जर ‘ब्रिक्स’देशांनी असे केले तर, त्यांना त्यांच्या अमेरिकेतील निर्यातीवर शंभर शुल्क आकारावे लागेल. तसेच, अमेरिकन बाजारपेठेत माल विकण्याचे विसरून जावे. व्यापारासाठी डॉलरऐवजी इतर चलनांचा वापर करण्यास जागा नाही. जर कोणत्याही देशाने असे केले तर त्यांनी अमेरिकेला विसरावे.

ब्रिक्समध्ये भारत, रशिया आणि चीनसह नऊ देशांचा समावेश आहे. ब्रिक्स हा उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा समूह आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये रशियातील कझान येथे ‘ब्रिक्स’ देशांची शिखर परिषद झाली. या काळात ‘ब्रिक्स’ देशांमध्ये त्यांच्या स्वत:च्या चलनाबाबत चर्चा झाल्याच्या बातम्याही आल्या. चलन निर्मितीबाबत ‘ब्रिक्स’मध्ये समाविष्ट असलेल्या सदस्य देशांमध्ये एकमत झालेले नाही. याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

चलन निर्माण करण्याबाबत एकमताचा अभाव

रशियात झालेल्या ‘ब्रिक्स’ देशांच्या शिखर परिषदेपूर्वी चलनाबाबत जोरदार चर्चा झाली. मात्र, शिखर परिषदेपूर्वीच रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी ‘ब्रिक्स’ संघटना स्वत:चे चलन तयार करण्याचा विचार करत नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, शिखर परिषदेत ‘ब्रिक्स’ देशांच्या स्वत:च्या पेमेंट सिस्टमबाबत चर्चा झाली. जागतिक स्विफ्ट पेमेंट प्रणालीच्या धर्तीवर ही पेमेंट प्रणाली तयार करण्याबाबत चर्चा झाली.

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले