तुम्हाला विवेकानंद हवेत की गोमाता?

– दत्तप्रसाद दाभोळकर :

‘गाय हा एक उपयुक्त पशू ती माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे’ हे विवेकानंदांनी अधिक भेदक शब्दात सांगितलंय.

विवेकानंद ग्रंथावलीच्या तिसऱ्या खंडात पृष्ठ पाच वर विवेकानंदांच्या एका शिष्याने सांगितलेली एक गोष्ट आहे- ‘बेलूर मठात विवेकानंदांना भेटायला मुंबईचे काही गोरक्षक आले होते. ते म्हणाले, ‘स्वामी आम्ही भाकड गायींचे रक्षण करतो. कसायाशी मारामारी करून किंवा त्याला पैसे देवून त्या गायींना आमच्या पांजरपोळात ठेवतो. आम्ही खूप पैसे जमवलेत पण तुमच्याकडूनही थोडी मदत हवी आहे. किमान तुमचा आशिर्वाद हवा.’ विवेकानंद म्हणाले, ‘आज मध्यभारतात माणसे भुकेने तडफडून मरताहेत. आता गायींना विसरा. सर्व पैसे तिकडे पाठवा.’ ते गोरक्ष म्हणाले, ‘स्वामी, तुम्ही म्हणता ते खरं, पण आमचे धर्मग्रंथ सांगतात- ती माणसे मरताहेत कारण त्यांनी गेल्या जन्मी पाप केलं होतं, आपण त्यांची काळजी कशाला करायची?’ विवेकानंद म्हणाले, ‘ही रचना फारच सोपी आहे. मग आपण म्हणू शकतो- त्या गायीपण मरताहेत, कारण त्यांनी गेल्या जन्मी पाप केलं होतं. आपल्याला त्याचं काय पडलंय?’ ते गोरक्षक म्हणाले, ‘स्वामी, तुम्ही म्हणता ते खरं. पण आमचे धर्मग्रंथ सांगतात- गाय ही आपली आई आहे. ती कितीही वाईट असली तरी आपण तिचे रक्षण करावयास हवे.’ विवेकानंद म्हणाले, ‘आता निघा. आज मला तुमचे आई वडील समजले! आणि हेच आई वडील बरोबर घेऊन हिंडणाऱ्या या देशाचं नवनिर्माण करावयाचे आहे. याची दाहक जाणीव झाली.’ त्याचवेळी विवेकानंदांनी आपला मित्र शशी (जो श्रीरामकृष्णांचा सर्वात आवडता म्हणून ज्याला रामकृष्णानंद म्हणतात.) त्याला पत्र पाठवून सांगितले, ‘उद्या मुंबईतील एखादा श्रीमंत व्यापारी ढेकणांसाठी हॉस्पिटल काढेल. लोक त्याला मदत करतील आणि घरी ढेकणांची पूजाही करतील!’ (Swami Vivekananda)

मालमदुरा येथे विवेकानंदांचा फार मोठा सत्कार करुन त्यांना मानपत्र देण्यात आले. त्यावेळी विववेकानंदांनी जे भाषण केले. ते विवेकानंद ग्रंथावलीच्या पाचव्या खंडात पृष्ठ ७७ वर येते- विवेकानंद म्हणाले, ‘तुम्हाला माहीत आहे का? एक वेळ या देशात गोमांस भक्षण केल्याशिवाय ब्राह्मण हा ब्राह्मण होऊ शकत नव्हता. आपल्या वेदात तर असं सांगितलंय, ‘आपल्या घरी राजा किंवा फार मोठा संन्यासी आला तर गाय बैल कापून त्यांच्या मांसाचे रुचकर अन्न त्याला द्यावे.’ मात्र त्यानंतरचे या देशातील दार्शनिक शहाणे होते. त्यांच्या लक्षात आले. हा कृषी प्रधान देश आहे. गाय वाचली पाहिजे. म्हणून त्यांनी एक रुढी बनवली. आज परिस्थिती बदलली असेल, तर ती रुढी आपण नाकारली पाहिजे. आपल्या अगदी जवळजवळच्या खेड्यात दैवत वेगळे आहे. रुढी आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत. त्या केवळ वेगवेगळ्या नाहीत तर परस्पर विरोधी आहेत. पण रुढी आणि परंपरा म्हणजे धर्म नव्हे. रुढी आणि परंपरा बदलता येतात. त्या गरजेप्रमाणे बदलल्या पाहिजेत.’- २२ ऑगस्ट, १८९२ रोजी दिवाणजी यांना पत्र पाठवून विवेकानंदांनी सांगितले, ‘या देशातील खरी अडचण समजावून घ्या. ज्यांच्या चारशे पिढ्यांनी वेद ही काय चिज आहे हे वाचलेलेसुद्धा नाही ते पुरोहित आज देशाला वेद समजावून देताहेत.’ ‘देवा, ब्राह्मणांच्या रूपाने आज माझ्या देशात हिंडणाऱ्या या राक्षसांच्यापासून माझ्या देशाचे रक्षण कर!’ (Swami Vivekananda)

‘धर्म त्याचा उद्देश आणि कार्यपद्धती’ हा विवेकानंदांचा निबंध विवेकानंद ग्रंथावलीच्या सातव्या खंडात पृष्ठ ९४ वर आहे. त्यात विवेकानंद सांगतात, ‘एखादी गोष्ट फार मोठ्या ग्रंथात लिहिलेली असेल. किंवा एखादा फार मोठा साधु संन्यासी सांगत असेल, पण ती गोष्ट जर तुम्हाला विचारांती पटत नसेल, तर ती ठामपणे नाकारा. कारण विचार करण्याची शक्ती ही परमेश्र्वराने आपणाला दिलेली सर्वात मोठी शक्ती आहे. ती शक्ती वापरून तुम्ही ती गोष्ट नाकारलीत तर परमेश्र्वराला आनंद होईल. मात्र अंधळेपणाने तुम्ही ती गोष्ट स्वीकारलीत, तर तुम्ही पुन्हा पशू बनला आहात म्हणून परमेश्र्वराला वाईट वाटेल.

Related posts

गांधी भारताचा आत्मा, तर आंबेडकर मेंदू

सावधान, जागतिक जलसंकट घोंगावतेय!

महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली की वाढवली?