पुराणकथा स्त्रियांवर अन्याय करायला शिकवतात?

Dr. Tara Bhawalkar

लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी अलीकडेच पुराणकथांमधील स्त्रियांवर लिहिलेला हा लेख…

पुराणकथा म्हणजे काय? पुराणकथांना आपण पोथ्या म्हणतो. पुराणकथांबद्दल आपल्याकडे भक्तीची आणि आदराचीच भावना आहे.  संशोधकांच्या मते निदान ती दोनशे ते अडीचशे पुराणं आहेत आणि याच्यामध्ये प्रमुख अठरा पुराणं मानली जातात. ती अठरा पुराणं पुन्हा निरनिराळ्या काळाबद्दल, निरनिराळ्या विषयाबद्दल, निरनिराळ्या देवतांच्या बद्दल आहेत. अगदी शेवटचं पुराण सुद्धा इंग्रजांच्या आगमनानंतरचं  आहे. म्हणजे ते इसवीसनाच्या अठराव्या शतकातील आहे. म्हणजे पुराणाची रचना दीर्घकाळपर्यंत होत होती. जवळजवळ हजार दीड हजार वर्षे तरी निरनिराळी पुराणं निरनिराळ्या काळात लिहिली जात होती. त्यापूर्वीही भारतात वेद होते.

वेद वाङ्‌मय हे भारतामधलं सगळ्यात प्राचीन वाङ्‌मय समजलं जातं. त्यामध्ये ऋग्वेद हा सगळ्यात प्राचीन असून तो इ. स. पूर्व २००० च्या आसपासचा मानला जातो. त्याच्यानंतर यजुर्वेद, नंतर सामवेद, अथर्ववेद हा सर्वांत शेवटचा. या रचना निरनिराळ्या काळामध्ये, निरनिराळ्या व्यक्तींनी केलेल्या आहेत. मी व्यक्ती म्हणते, आपल्या परंपरेमध्ये त्यांना  ऋषी असं म्हणतात. या रचना करणाऱ्यांमध्ये स्त्रिया आणि पुरुष आहेत. एकाच वेदात अनेकांच्या ऋचा आहेत. एकच कर्ता नाही. म्हणून वेदांना अपौरुषेय म्हटलं जातं. या रचना निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या विषयांवर केल्या गेल्या आहेत. वेदांच्या नंतरच्या वाङ्‌मयांना ‘उपनिषदं’ म्हणतात. म्हणजे वेदांच्या विषयांचं

स्पष्टीकरण करणारी उपनिषदं. ही उपनिषदं सुद्धा अनेक आहेत.  म्हणजे एकेका वेद ग्रंथावर शंभर दीडशे उपनिषदंसुद्धा आहेत. “वेद, उपनिषदानंतर ‘आरण्यक्ये, ब्राह्मण्ये’ हे ग्रंथ येतात. या सगळ्या साहित्याला आपण धार्मिक किंवा अध्यात्मिक साहित्य असं म्हणत असलो तरी ज्या काळामध्ये आणि ज्या व्यक्तींनी रचलेलं आहे तर त्या माणसांचे अनुभव, भोवतालचं वातावरण, ती माणसे जे जगतात, त्यांचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनामध्ये, बोलण्यामध्ये उमटतं. ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. जसं की अगदी प्राचीन वेदांच्यामध्ये ज्या देवदेवता आहेत ती सगळी निसर्गतत्त्वे आहेत. म्हणजे त्या संबंधातली ‘सूक्ते’ आहेत, ‘सूक्त’ म्हणजे मंत्र. आपण त्याला श्लोक म्हणतो. वेदांमध्ये पर्जन्यसूक्त, उषासूक्त, सूर्यसूक्त, वायूसूक्त अशी नावे आहेत. निसर्गामध्ये ज्या काही शक्ती आहेत. त्यासंबंधी ही सूक्ते आहेत. म्हणजे वायू आहे, सूर्य आहे, पाऊस आहे, तर त्यांच्यासंबंधी  केलेल्या या प्रार्थना आहेत. त्यांना आवाहन आहे. ‘तुम्ही आम्हाला प्रसन्न व्हा किंवा त्रास देऊ नका.’ अशा आशयाच्या त्या प्रार्थना आहेत. (Dr. Tara Bhawalkar)

त्याच्यानंतर पुढे माणसांच्या जगण्यामध्ये ज्या आवश्यक गोष्टी असतात त्यांच्याबद्दलची सूक्ते आहेत. म्हणजे अपत्यसंभव व्हावा, वंश नीट चालावा, पीकपाणी नीट यावं. म्हणजे माणसांच्या ज्या भौतिक गरजा आहेत त्या पूर्ण करीत असताना त्यांनी देवतांची आराधना केलेली आहे. रोगराई होते,  मग त्याच्या निराकरणाची सूक्ते आहेत. प्रसूती नीट व्हावी, सुलभ व्हावी त्याच्यासाठीची सूक्ते आहेत.  कारण ती गरज आहे. माणसांना निरनिराळे आजार होतात. त्यांच्या निराकरणाची सूक्ते आहेत आणि त्याचे पडसाद आपल्याला माणसांच्या सर्व स्तरात उमटलेले दिसतात. ज्या माणसांच्या भौतिक गरजा आहेत त्याच्यासाठी आवाहन केलेले आहे. त्यामुळे वेद असू देत उपनिषदं असू देत त्याच्यामध्ये तात्विक गोष्टी, तत्त्वज्ञानातील गोष्टी जरूर आहेत. तत्त्वज्ञान शेवटी जीवनाला पूरक, उपयुक्त असं आहे.

याच्यानंतर पुराणे येतात. म्हणजे पुराणाचा काळ, या सगळ्या रचनांच्या अलीकडचा काळ आहे. ती निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या व्यक्तींनी लिहिलेली आहेत. निरनिराळ्या देवतांशी संबंधित निरनिराळ्या कथा त्याच्यात आहेत. पुराणांचं वैशिष्ट्य असं की, त्या प्रामुख्याने कथा आहेत. पुराणांमध्ये कथांना जास्त महत्त्व आहे. इंग्रजीमध्ये त्यांना myth असं म्हटलं जातं. त्या मिथकांचा अभ्यास, म्हणजे ‘मिथक’ कसं तयार होतं,  पुराणकथा कशी तयार होते, तर त्याचा आधार कुठला? तर जीवनातलं जे वास्तव असतं. त्या वास्तवाच्या भोवती माणूस आपल्या कल्पनेने, बुद्धीने काही रचना करत असतो. वेदांच्यापासूनही अशाच रचना होत आलेल्या आहेत. खरं सांगायचं म्हणजे कथाकार आपला अनुभव जास्त सजवून सांगतो. जास्त स्पष्टीकरण, आकर्षक करून सांगणं, जगण्यातला आपला अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल. तो कसा टिकेल, त्या काळात, त्या काळाच्या भाषेमध्ये त्या काळाची उदाहरणं, असं सर्व तो सजवून सांगत असतो. पुराणकथांमध्येही अशाच कथा असतात. फक्त त्या देवादिकांशी  संबंधित असतात. देव म्हटलं की आपल्याला असं वाटतं की, या सर्वश्रेष्ठ शक्ती आहेत.

पण गंमत अशी आहे की, या पुराणकथांमध्ये जे देव असतील किंवा पात्रे म्हणूयात आपण तर ती चुकतानाही दिसतात. ती एकमेकांच्याबद्दल आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. एकमेकांना मदत करतानाही दिसतात. एकमेकांचा सूड घेताना एकमेकांशी लढाया करतानाही दिसतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे जे आचरण आहे ते आपल्याला पुराणकथांच्या पात्रांमध्ये दिसत असते. ते लढाईला जातात, शस्त्र घेतात, एकमेकांविरुद्ध डावपेचही रचतात. उदारपणाही दाखवतात. निरनिराळ्या प्रसंगी पुराणकथांमध्ये मानवी जीवनाचा आरोप देवतांवर केला जातो. निसर्गतत्त्वेही  माणसाप्रमाणे वागताना दिसतात.

पुराणांमध्ये ज्या कथा आहेत त्या प्रामुख्याने रामायण-महाभारताच्या मूळ कथा आहेत. त्या कथांच्याच आवृत्ती पुन्हा पुन्हा आलेल्या आपल्याला दिसतात. महाभारतातल्या कथेमध्ये शंतनू आहे. त्याने गंगेशी विवाह केला. गंगा ही नदी आहे. पुत्र झाल्यानंतर त्याला गंगेमध्ये सोडून दिले. त्याच्यावर बायकांनी प्राकृत भाषेत गाणी रचली. सांगण्याचे तात्पर्य असं की, जो प्रत्यक्ष अनुभव आहे तो कधी जास्त, कधी गूढ, कधी गुंतागुंतीचा करून, कधी सुलभ करून सांगितलेला असतो. जगण्यात निसर्गाला मानवी रूप दिले जाते. म्हणजे मानवाचा आरोप त्या देव-देवतांवर, निसर्गतत्त्वावर केलेला आपल्याला दिसतो. माणसाच्या ज्या काही भावना, प्रवृत्ती, वर्तन असते ते आपल्याला त्या पुराणकथांच्या मध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते.

सगळ्या पुराणकथेची मुळं आपल्याला रामायण, महाभारत या महाकाव्यामध्ये दिसतात. ही महाकाव्ये आहेत. म्हणजे ती पूर्ण सत्य नाहीत. हे कल्पितावर उभा असलेलं सत्य आहे. किंवा सत्यावर उभे असलेले कल्पित. त्यामुळे त्याच्यामधलं सत्य म्हणजे वास्तव कुठलं? इतिहासाच्या भाषेत बोलायचं झालं तर ऐतिहासिक सत्य कुठलं आणि त्याच्यावर चढवलेला कल्पनेचा साज कुठला, हे शोधून काढणं हे मिथकाच्या अभ्यासकाचं काम असतं. पुराणकथेच्या अभ्यासाला मायथॉलॉजी म्हणजे पुराणकथाशास्त्र म्हणतात.  पुराणकथाशास्त्राच्या अभ्यास करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. वायू क्रोधित झाला, वायूने असं केलं, त्याने पर्वताला उडवलं, मग पर्वत ठाम उभा राहिला. म्हणजे काय झालं हे निसर्गतत्त्व आहे. निसर्गातील ती एक घटना आहे. या निसर्गतत्त्वावर मानवी आरोप केला गेला. काही कथा अशा आहेत की, ज्या आकाशातील नक्षत्रांची प्रतीकं घेऊन आलेल्या असतात. कधी त्याच्यामध्ये मानवी जीवनाच्या वास्तवाचा भाग असतो. मागे प्रत्यक्ष घडलेली एखादी घटना असते. (Dr. Tara Bhawalkar)

मात्र आपला सर्वसामान्य भारतीय समाज हा अतिशय श्रद्धाळू आहे. आपली सर्वांची भूमिका अशी आहे की,  रामायण, महाभारत किंवा पुराणकथेत सांगितलेले खरेच प्रत्यक्ष होऊन गेले. म्हणजे राम, कृष्ण होताच इथे,  सीता, जनक होताच इथे, रावण वगैरे, हे जे काय कथेत आहे ते, “होताच इथे” हे गृहित धरून आपण चालतो आणि त्याच्या आधाराने आपण विश्लेषण करायला जातो. पण जे मायथॉलॉजीचे अभ्यासक असतात ते असा शोध घेतात की, याच्या मुळामध्ये काही प्रतीकं आहेत का? म्हणजे ही कुठली प्रतीक कथा आहे? की वास्तव कथा आहे? म्हणजे राम कशाचं प्रतीक आहे का? कृष्ण कशाचं प्रतीक आहे का? सीता हे कशाचं प्रतीक आहे का? आणि त्याचेही आपल्याला धागेदोरे मिळत असतात.  ते धागेदोरे ऋग्वेदापासून मिळतात.

ऋग्वेदामध्ये सीता जी आहे ती ‘नांगरलेली भूमी’ म्हणून येते. सीतायज्ञ नावाचं सूक्त वेदात आहे. सीतायज्ञाचा तो विधी आहे. म्हणजे काय तर जमिनीत बी पेरायचं असेल तर त्याच्यापूर्वी जमीन नांगरतात. नांगरताना जमिनीची पूजा करायची असते. आणि सीता ही जणू काही नांगरलेली भूमी. नांगरण्याचा जो तास मारला जातो त्याच्याशिवाय बी पेरता येत नाही. पेरणी केलेलं बी उगवत नाही. म्हणून हे तास मारले जातात. नांगरणी ही खरं म्हणजे कृती असते. त्याला आपण धार्मिक आवरण देतो. मग त्याची पूजा करायची, नांगराची पूजा करायची, बैलांची पूजा करायची वगैरे वगैरे. आणि मग तो सीतायज्ञ होतो. सीता हे कायम भूमीचं प्रतीक होतं. रामायणामध्ये ती भूमिकन्या म्हणूनच येते.  इतकच नव्हे अगदी अलीकडच्या काळात एकविसाव्या शतकामध्ये ग. दि. माडगूळकर ज्या वेळेला गीतरामायण रचतात त्यावेळेस ते लिहितात,

“आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे

स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे|”

आकाश तत्त्व  म्हणजे राम आणि पृथ्वीतत्त्व  म्हणजे सीता. तर हे आकाश आणि पृथ्वी यांचे मीलन. तर बालकवी एक  निसर्गातली साधी घटना घेतात. सकाळी सूर्यकिरण बागेमध्ये पडतो. रात्री जी कळी होती त्याचं सकाळी सूर्यकिरण पडल्यावर उमलून फूल होतं. आणि मग बालकवी काय म्हणतात की…

“तो रविकर का गोजिरवाणा

आवडला अमुच्या राणीला?”

 म्हणजे पृथ्वीवर आलेला सूर्याचा किरण हा वर आणि भूमीवर असलेली कळी म्हणजे वधू. म्हणजे इकडे सीता जशी वधू होते आणि तिकडे पर्जन्य जसा राम होतो तसेच हे आहे. अशा मिथकामध्ये पुन्हा पुन्हा आवर्तित होणाऱ्या कल्पना असतात त्याला ‘आवर्तक कल्पनाबंध’ असं म्हटलं जातं. या पुन्हा पुन्हा येणाऱ्या संकल्पना असतात आणि त्या निरनिराळ्या रूपांमध्ये, निरनिराळ्या काळामध्ये येत असतात. कधी कवितेत येतात, नाटकात येतात, कथेत येतात, भाषेमध्ये येतात. अगदी ग्रामीण बायकांच्या साध्या म्हणी किंवा कल्पना पहा. एखाद्या मुलीला लवकर अपत्य होत नसलं, लग्न झालं आणि ती लवकर गर्भवती राहिली नाही तर म्हाताऱ्या बायका जरा फटकळ असायच्या. त्या पटकन म्हणायच्या “धरतीच नापीक आहे.” म्हणजे आता स्त्रीचे गर्भाशय ही भूमी. त्या पुरुषाकडून जे काय शुक्राणू मिळतात ते पर्जन्य. हा एक कल्पनाबंध या ठिकाणी येतो. आणि हा कल्पनाबंध निरनिराळ्या ठिकाणी येताना दिसतो. फक्त पुराण कथेतच येतो असं नाही. कारण ते जीवनातलं सत्य असतं, वास्तव असतं आणि त्याच्याभोवती ते सगळे कल्पनाबंध असतात.

या कल्पनाबंधाच्या मागून पावित्र्य, चारित्र्य, धर्म या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यावर कर्मकांडं येतात. अमका दिवस अमक्या देवाचा, त्याचा जन्मोत्सव. अमका दिवस पवित्र, मग त्या दिवशी काय उपवास करायचा, मग तो कसा करायचा, त्यांनीच ठरवलेलं असतं. त्या दिवशी काय खावं काय खाऊ नये हे माणसांनीच ठरवलं आहे. तर सांगायचं तात्पर्य, पुराणकथा कशी तयार होते याचं जरा एकदा आपण सूत्र समजून घेतलं तर मग ‘‘पुराणकथा स्त्रियांच्यावर अन्याय करायला शिकवतात का नाही शिकवत,’’  हे विधान आपल्याला तपासून बघता येईल. पुराणकथा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते पातिव्रत्य, चारित्र्य. स्त्रीचं सगळ्यात मोठे बलस्थान कुठलं तर तिचं पावित्र्य. पावित्र्य म्हणजे ती पतिव्रता असणे. आणि पतिव्रता असणे म्हणजे काय तर आपल्या पतीशी एकनिष्ठ असणे. एकनिष्ठ कुठल्या बाबतीमध्ये असणं, तर लैंगिकतेच्या बाबतीत. स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांमध्ये सांगायचं झालं तर ती आपल्या पतीशी लैंगिकदृष्ट्या एकनिष्ठ असते. पतीखेरीज दुसऱ्या कोणाशी लैंगिक व्यवहार न करणारी ती पतिव्रता. तिने मनामध्ये सुद्धा दुसऱ्या पुरुषाचा विचार आणायचा नाही. (Dr. Tara Bhawalkar)

विवाह विधीमध्ये मंत्र येतात, “काया वाचा मने स्मरून मी अमक्याशी एकनिष्ठ राहीन.”  आता काया म्हणजे शरीर, तोंडाने (वाचेने) सुद्धा इतर कुणाचं नाव मी  घेणार नाही आणि मनामध्ये सुद्धा दुसऱ्या पुरुषाचा विचार येणार नाही. याला पातिव्रत्य म्हणायचं. आणि हे कशाशी बांधील तर तिच्या लैंगिकतेशी बांधलेलं! त्या एका पुरुषाच्या ठिकाणी आपली लैंगिकता समर्पित करणारी ती पतिव्रता. तिला पुत्र झाला की पुत्रवती म्हणून तिला प्रतिष्ठा. मग ती मरताना सुद्धा नवऱ्याच्या आधी मेली तर ती पुण्यवान आणि पवित्र. जर नवऱ्याच्या नंतर मेली तर ती विधवा, अपवित्र. तिचं तोंड सुद्धा सकाळी पाहायचं नाही. आता हे पावित्र्य, अपावित्र्य, शुभ, अशुभ या सगळ्या संकल्पना आहेत. त्या स्त्री पुरुषांच्या लैंगिकतेशी नाते जोडून येतात. त्या आपल्या कथांमध्ये, पुराणांमधून, काव्यामधून, नाटकांमधून पुन्हा पुन्हा येताना दिसतात. गडकर्‍यांच्या “एकच प्याला”मधली नायिका सिंधू ही पतिव्रता म्हणून चित्रित केलेली आहे. पतीशिवाय तिच्या मनात दुसऱ्या कोणाचा, कसलाही विचार येता उपयोगाचा नाही. गडकर्‍यांनी सिंधूच्या तोंडी घातलेलं वाक्य,  “ती बापाची मुलगी नसते, भावाची बहीण नसते, फार काय जन्म दिलेल्या मुलाची आईसुद्धा नसते. ती फक्त पतिव्रता असते.” तर अशा या विधानाचं प्रतिबिंब आपल्याला पुराणकथांमध्ये दिसतं. सती अनुसूयेची ही कथा आहे. अत्री नावाचे ऋषी त्यांची पत्नी अनुसूया. ही अतिशय सत्त्वगुणी आणि सत्त्वशील होती. आणि पुन्हा पातिव्रत्यासाठी सत्त्व ही कल्पना बायकांच्या बाबतीत आहे. म्हणजे ती बाई सत्त्वशील हवी, सत्त्वशील असणे म्हणजे काय, तिने आपल्या पतीशिवाय दुसऱ्या कुणाचा कसलाही विचार करायचा नाही. मुलाचासुद्धा नाही.

म्हणजे गंमत कशी आहे, आपल्याकडे मातृत्व हे पवित्र, महन्मंगल, श्रेष्ठ वगैरे  म्हणायचं आणि नवऱ्यासाठी म्हणून जर त्या पोराचा त्याग करायचा झाला, अगदी वध करायचा झाला तरी तिने करायचा. मग ते मातृत्व पवित्र झाले का पितृत्व पवित्र झाले?  कुठल्याही परिस्थितीत स्त्री माता झाली तर ती सगळी मातृत्व पवित्र असतात का? नाही. कुठलं मातृत्व पवित्र असतं? तर जो वर आपल्या आई-बापांनी आपल्या जातीपातीचा, धर्माचा वगैरे बघून दिला असेल आणि त्याच्याशी वैध, कायदेशीर मार्गाने लग्न झालं असेल तर त्याच्यापासून होणारं मातृत्व हे पवित्र मानलं जातं. हा गौरव मातृत्वाचा आहे का पितृत्वाचा? कुठलीही माता महन्मंगल नाही. असं असतं तर विधवांचे, पंढरपूरसारखे “नवरंगे” आश्रम निघाले नसते. विधवांची मुलं टाकून देण्यासाठी अनाथ बालकाश्रम निघाले नसते. हे निघतात याचं कारण असं की, आमच्याकडे कुठलेही मातृत्व पवित्र नाही तर मातृत्व गौरवाच्या नावाआड पितृत्व पवित्र मानलं जातं. कुठल्या पुरुषापासून मातृत्व लाभले आहे हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे माझ्या मते ही चक्क फसवणूक आहे. आणि पुराणकथांनी निरनिराळ्या पद्धतीने आपल्या बायकांवर आणि पुरुषांच्या मनावर, समाजाच्या मनावर पिढ्यानपिढ्या थोपवलेलं आहे.

सत्यवती, सत्वशील, पतिव्रता वगैरे त्यांना आपण पूजनीय मानतो, पवित्र मानतो अशा अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. या पाच महत्त्वाच्या स्त्रिया आहेत. त्याच्याबद्दलचा श्लोक प्रसिद्ध आहे.

“अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा|

पंचकंम: स्मरे नित्यं महापातक नाशनम||”

या स्त्रियांचं स्मरण केलं की महापातकाचा नाश होतो. तो श्लोक आपण नीट समजून घेत नाही. पंचकम, न: स्मरे नित्यं न: म्हणजे संस्कृतमध्ये न: म्हणजे नर. म्हणजे नराने स्मरण केलं तर महापातकांचा नाश होतो. पण आपण काय म्हणतो माणसाने त्या पाच जणींचं स्मरण केलं की महापातकांचा नाश होतो. म्हणजे कुठल्याही माणसाने. खरं म्हणजे पुरुषाने त्यांचं स्मरण करायला पाहिजे. या स्त्रियांसह बाकीच्या तर पुष्कळ आहेत ज्यांना पिडलेलं आहे, नाडलेलं आहे ज्या खरंच सत्यवती होत्या तरीसुद्धा छळलेलं आहे. पण या पाचजणी आपण उदाहरणादाखल घेऊ.

अहल्या :

अहल्येचा उद्धार कोणी केला? रामाने. उद्धार करायची वेळ का आली?  शीलासाठी. तिचं पातिव्रत्य भंग झालं होतं. पातिव्रत्य भंग व्हायला कारण कोण झालं? तिचा नवरा गौतम ऋषी. नवरा म्हातारा होता आणि ही तरुण सुंदर मुलगी होती. तिची बिचारीची काय चूक होती? त्या तरुण मुलीवर इंद्र भाळला. त्याने तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं. सकाळच्या प्रहरी तिचा नवरा म्हणजे गौतम ऋषी नदीवरून जसा स्नान करून येतो तसा हा नवऱ्याच्या आधी नदीवरून स्नान करून आला. तिला फसवण्यासाठी तो नवऱ्याचं रूप घेऊन आला. तिने दार उघडलं आणि त्याने तिच्याशी संभोग केला. तर गंमत अशी की हा नवरा ऋषी सकाळी स्नान संध्या करून आल्या आल्या स्त्रीशी संभोग करतो?  आल्याबरोबर देवधर्म वगैरे करायचं सोडून हे करतो?  ते चालतं?  बरं तिला फसवलं कोणी? इंद्राने फसवल्याचं नवऱ्याच्या लक्षात आलं. मग नवऱ्याने शाप कोणाला दिला? अहल्येला, की ‘तू दगड होऊन पडशील’ म्हणून. परत तिचा उद्धार कोणी केला? रामाने. आता यात तिची काय चूक आहे? पहिली गोष्ट म्हणजे नवरा म्हातारा. तो दुर्लक्ष करतो. दुसरी गोष्ट त्या इंद्राने तिला नवऱ्याचं सोंग घेऊन फसवलं. तिसरी गोष्ट तिला दगड व्हायला लावलं. चौथी गोष्ट राम नावाच्या एका पुरुषाने तिचा उद्धार केला. ही तिच्या नवऱ्याची आणि इंद्राची चूक आहे. पण पहिल्यांदा तिला भ्रष्ट करायची आणि मग तिचा उद्धार करायचा. मग म्हणायचं याने स्त्रियांचा उद्धार केला.  गाणी तयार करायची.

‘अहिल्या शिळा राघवे मुक्त केली|

पदी लागतां दिव्य होऊनि गेली||”

पुरुषाचा पाय लागला की ‘दिव्य’ झाली. भ्रष्ट  करणारा  तोच आणि उद्धार करणारा तोच पुरुष.  तिचा एकच अपराध ती बाई म्हणून जन्माला आली. ते तिच्या तरी हातात असतं का? पुरुष म्हणून जन्माला आला तो त्याचाही काही पराक्रम नसतो. बाई म्हणून जन्मला आली त्याच्यात तिचा काही दोष नसतो.

द्रौपदी :

तिची कथा सर्वज्ञात आहे. महाभारतातील पाच पांडवाची बायको. आता पाच भावाची बायको ती तिच्या इच्छेने झाली का? तिला जिंकून आणली अर्जुनाने आणि वनामध्ये आईकडे आणले. त्यावेळी ते वनवासात होते. आईला ओरडून सांगितले की, आम्ही भिक्षा घेऊन आलो आहोत. तेव्हा ते रोज भिक्षा मागायला जायचे. आईने सांगितले “वाटून खा” आणि मग तो धर्मराजा, मातृभक्त. आणि मग त्या पाच जणांनी बायको वाटून घेतली. ‘बायको वाटून घेणे’ ही कल्पना कशी वाटते?  कुठलाही बाप आपली मुलगी, कितीही शूर असले श्रीमंत असले काहीही असले तरी पाच पोरांना मिळून एक बायको करून घ्या असं म्हणेल का? कुठली आई असं म्हणेल एक बाई तुम्ही पाच जण वाटून घ्या म्हणून? मग म्हणे तिला इतके दिवस ठरवून दिले. अमके दिवस एकाचे वगैरे.  मग आणखी एक बूट काढला. आमच्या मनुस्मृतीने सांगितले, अशा वेळेला ती स्त्री अपवित्र नसते. का? एरवी दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श झाला की ती अपवित्र होते आणि आता एका भावाने वापरलेली बाई दुसऱ्या भावाला जाईपर्यंत परत अपवित्र नसते?  का नसते?  कारण मनुस्मृतीने सांगितले आहे की, नंतरची एक मासिक पाळी झाल्यानंतर स्त्री शुद्ध होते.  हे फक्त द्रौपदीच्या बाबतीतच. तुमच्या आमच्या बाबतीत होत नाही. (Dr. Tara Bhawalkar)

एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर ती कायम बलात्कारी म्हणून तिला हिणवले जाते. पण मनुस्मृतीने इथं द्रौपदीपुरती पळवाट ठेवली आहे. आणि आम्ही ती तेवढी उचलली की, तिची मासिक पाळी झाली की ती पवित्र होणार. मग दुसऱ्यांना वापरायला हरकत नाही. ‘वापर’च नाही तर काय? पुढे द्रौपदीच्याबाबत पुष्कळ घडलेलं आहे. ते द्युत खेळायला गेले. खेळायला धर्मराजा बसला. द्रौपदीने त्याला सांगितलं होतं का? बरं पांडवांना इतर बायका नव्हत्या का?  प्रत्येक पांडवाला वेगवेगळ्या बायका होत्या. द्रौपदीखेरीज. त्या सगळ्या वनवासाला गेल्या का? नाही.  त्या सगळ्या आपापल्या माहेरी जाऊन राहिल्या. द्रौपदी ही पाचांमध्ये एक. सगळ्यांना तिचा उपयोग व्हावा. स्वयंपाक पाणी करून घालता यावं. त्यांची सेवा करता यावी आणि यांना ‘बाई’ म्हणून पण उपयोगी पडावी. द्रौपदीची खूप परवड झाली.  प्रचंड हाल झाले. महाभारतात तिने म्हटले आहे, “पाच नवरे असून मी अनाथ आहे.‘‘ महाभारतातले हे शब्द आहेत. “नाथवती अनाथवत’’ लग्न झाल्यानंतर बाई सनाथ होते आणि तिला संरक्षण मिळतं. हा समज इथे खोटा ठरतो.

आपल्याकडे अजूनही एकदा मुलीचं लग्न करून दिलं की तिची जबाबदारी संपली, असे जे लोक म्हणतात तर, तिची जबाबदारी कोण घेते? तो नवरा घेतो? आजसुद्धा कोणी घेत नाही? आणीबाणीची वेळ आली की, ‘तुझं तू बघ’ म्हणून हात झटकतात. अगदी घरात भांडणं जरी झाली तरी आपण पुरुष म्हणजे, फार म्हणजे उच्च, उदात्त विचार करणारे. बायका-बायका तुमचं तुम्ही बघून घ्या. म्हणतात. नणंदेबरोबर भांडण झालं, सासूबरोबर भांडण झालं तर पुरुष कुठल्याही बाईची जबाबदारी अंगावर घेणार नाही. मग आम्ही म्हणतो, “तेल लावलेल्या पैलवानासारखे पुरुष सहज निसटून जातात.”

द्रौपदीची अशी सर्वांनी परवड केली. तिला वनवास सोसावा लागला. इतकं करून तिला द्युतसभेत पणाला लावली. म्हणजे पहिल्यांदा एखाद्या राजाने द्युताला बळी पडणे हे व्यसन झालं. पराक्रम करायचा असला, तुला जिंकायची हिंमत असेल तर तू खेळायला जा. समजा नसेल, हरायचं असेल तर तुझ्या मालकीच्या वस्तू पणाला लाव. राजपाट वगैरे पुढे सगळ्या भावांना त्याने पणाला लावलं. का तर मोठा भाऊ हा सगळ्यांचा मालक असतो. शेवटी त्याने द्रौपदीला पणाला लावलं. तिने भर सभेत प्रश्न विचारला, तिथे ज्येष्ठ लोक भीष्माचार्य, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र बसलेले होते. द्रौपदीने प्रश्न विचारला, ‘‘जो स्वतः हरलेला आहे त्याला बायकोला पणाला लावायचा अधिकार आहे का?  आणि या सभेत वृद्ध माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नसतील तर त्याला राज्यसभा म्हणायचं का?’’ वृद्ध याचा अर्थ काही केस पिकलेले नाही. ज्यांचे विचार परिपक्व झाले आहेत त्यांना वृद्ध म्हणायचं. जे वृद्ध न्यायाचा शब्द उच्चारत नाहीत त्यांना वृद्ध म्हणायचं का? सगळे माना खाली घालून बसले आणि तिला सभेत आणली. ती रजस्वला असताना तिचे वस्त्र फेडायला सुरुवात झाली. सगळे माना खाली घालून बसले. आणि मग धर्माच्या गोष्टी सांगायला लागले की, धर्म राजा आहे आणि त्याने पणाला लावल्यानंतर आम्हा इतरांना बोलायचा काही अधिकार नाही. तिच्या बाजूने  कोणी उभा राहिला नाही. फक्त कर्णाचा भाऊ विकर्ण तिच्या बाजूने बोलला. भीम शक्तिमान पण तिथे कोणीही बोलले नाही. म्हणून ती म्हणाली, ‘‘नाथवती अनाथवत.’’

एक सोडून पाच नवरे असताना तिची अशी अवस्था झाली तर लग्न करून बायकांना खरेच सुरक्षितता मिळते का? आम्ही काय समजायचं? त्याच्यावर विश्वास ठेवायचा? लग्न झाल्यावर तो तिची जबाबदारी घेतो? एखाद्याची बायको बाहेर गेली आणि तिच्यावर बलात्कार झाला आणि ती घरी आली म्हटल्यावर कुठला नवरा तिची जबाबदारी घेताना दिसतो?  तो तिला हिडीसफिडीस करतो. हे आजही होतंय. आणि तिची दयनीय अवस्था झालेली दिसते. हे माझ्या जात्यावर दळणाऱ्या अडाणी समजल्या जाणाऱ्या शहाण्या बायकांना कळलं आहे. पण राजसभेतले वृद्ध होते त्यांना कळलेलं नाही. जात्यावर दळणाऱ्या बाया म्हणतात,

“पाच पतीची मी नार अनाथ रंडकीवाणी|

यावं शिरीहरी वाचुनी मला नाही कोणी||” 

सीता :

सीतेची परवड सर्वांनाच माहीत आहे. बिचारी जन्माला आली ती अनाथ म्हणूनच. ती सापडलीही भूमीमध्ये,  म्हणून ती भूमिकन्या. तिचे स्वयंवर वगैरे ठीक आहे. पण पुढे काय झालं सीतेचं? वनवास सोसावा लागला, तिथे तरी तिला नीट राहता आलं का? तिला रावणाने पळवून नेली. सहा महिने लंकेत राहावं लागलं. तिचा काय दोष? ती वनवासात रामाबरोबर चौदा वर्षं राहिली आणि तिने त्याला सोबत केली. तिथे रावण वेषांतर करून आला आणि तिला पळवून घेऊन गेला. ती लंकेत झाडाखाली राम नाम जपत राहिली. मारुती तिथे गेला. जपत असलेलं नाव ऐकायला आलं म्हणून त्याला तिचा शोध लागला. आणि मग तिचा शोध काढत काढत सगळे गेले. मग वानरांनी, वाली, सुग्रीव सगळ्यांनी प्रयत्न केले. मग राम, लक्ष्मण गेले. रावण मेला. रावण मेल्यावर ती बिचारी रामाला भेटण्यासाठी प्रचंड  उत्सुक होऊन रामाकडे गेली. तिकडे रावणाची चिता जळते आहे. राम लक्ष्मण उभे आहेत. सगळे सैनिक उभे आहेत. रावणाचे पुत्र आणि बंधू आहेत. ती धावत गेली. राम म्हणाला, ‘थांब. मी हे तुझ्यासाठी केलं नाही. मी माझ्या क्षत्रियत्वाच्या लौकिकासाठी रावणाचा वध केलेला आहे.’ सीतेची अब्रू वाचवण्यासाठी नाही तर क्षत्रियत्वाला  कमीपणा आला तो पुसून जावून त्याचा लौकिक वाढावा म्हणून हे केलं. मग मराठी कवींनी त्याच्यावर गाणी रचली

“तुज साठी नाही केले,

हे तुझ्यामुळे गे झाले|”

तुझ्यामुळे ही केवढी यातायात करावी लागली. तो तिला वनवासात घेऊन गेला? तिची काय चूक? ती तिथे राहिली, रावणाला वश झाली नाही तिची काय चूक?  परत नवऱ्याने बोलावं, सगळ्यांच्या समोर तू अग्निदिव्य करून दाखव. तिथे लंकेमध्ये तिने अग्निदिव्य केले. मग राम तिला अयोध्येत घेऊन आला.

ती अयोध्येत आली. गरोदर राहिली. गरोदर राहिल्यानंतर पुन्हा शंका घेतली. कैकयीने किंवा नगरातल्या लोकांनी, प्रजाजनांनी शंका घेतली की याची बायको तिथे सहा महिने राहून आली ती कशावरून पवित्र राहिली? मग रामाचं सत्व डळमळलं. अशी बाटलेली, कलंकित झालेली बायको सांभाळणारा राजा, हे कसं काय मान्य करायचं? म्हणून तिला पुन्हा वनवासात पाठवलं. पण त्याने सरळ सांगितलं नाही की, ‘मला तुझी शंका आली म्हणून मी तुला पाठवतो,’  लक्ष्मणाला सांगितले, तिला वनात सोड. तिला खोटं सांगितलं गेलं, ‘तुला माहेरी सोडत आहे म्हणून.’ लक्ष्मण गेला. तिला वनात सोडून दिलं. आमचे लोक त्याचं खंडन करतात तिला वाल्मिकी आश्रमाजवळ सोडलं म्हणून. सरळ तिला सांगितलं का की, तुझ्याबद्दल शंका आली म्हणून? म्हणजे ज्या शीलासाठी ती धडपडली, रावणाला वश झाली नाही, त्या शीलावर संशय घेऊन कोणीतरी प्रजाजन म्हणतात म्हणून, तिला नवऱ्याने सोडून दिली. आणि परत हा, ‘धर्मनिष्ठ राजा. प्रजाहितदक्ष.’ आता आपली बायको ही प्रजाजन नव्हती का? बाकी काही नाही, ही एक बाई आहे. प्रजाजन आहे. गरोदर आहे. तिला संरक्षण देणे एखाद्या राजाचं काम आहे की नाही? (Dr. Tara Bhawalkar)

त्यानंतर तिला जुळी मुले झाली. पुन्हा त्यांच्यावर संशय घेतला. ती जुळी कशी झाली?  कारण त्यावेळच्या लोकांच्या धारणा काय, म्हणजे अज्ञान की, एका स्त्रीचा दोन पुरुषांशी संबंध आल्याशिवाय जुळी मुले होत नाहीत. म्हणून,

“अंकुश रामयाचा,

लहू कुणाचा आणिला?

होतेस वरले वनी

संग केलास कोणाचा?”

पुन्हा तिच्या शीलावर कैकयीने काही कारण नसताना घेतलेला हा आक्षेप. सीतेने ती पोरं त्याच्या स्वाधीन करून टाकली. ती कशी स्वीकारली? तिच्या शीलावर जर संशय आला होता तर मुलांना वारस आणि उत्तराधिकारी म्हणून का स्वीकारलं? ती मात्र पुन्हा अयोध्येत गेली  नाही.  धरणी मातेला ती म्हणाली, “मला आता कुशीत घे. पुष्कळ झालं. तुझा वंश पोटात वाढवला. वनवासात पोरं वाढवली. ती स्वीकारली वारस म्हणून.” सीता बिचारी भूमिगत झाली. सरळ सरळ तिचा परित्याग केला. तिने स्वेच्छामरण पत्करलं म्हणायचं का?

 

तारा :

तारा नेमकी कुठली? एक वाली आणि सुग्रीवची. त्याच्यातली मुळात एकाची-वालीची पत्नी तारा आणि दुसरी जी आहे ती बृहस्पतीची पत्नी तारा. पण या दोघींचाही असाच छळ झाला. बृहस्पतीची पत्नी तारा ही खूप सुंदर होती. या सर्व स्त्रिया उच्च कुलातल्या. त्या सुंदर असल्याखेरीज ते त्यांच्याशी लग्न करणार नाहीत. ती सुंदर होती. तिच्यावर चंद्र भाळला आणि त्याने तिला कलंकित केले. आता याच्यात तिची काय चूक? त्या वाली-सुग्रीवाची तारा तशीच. वालीला रामानं  मारलं. सुग्रीवची ती पत्नी झाली.  आधी एक राजा मेला की त्याच्या बायकोला जिंकून घेतले जाई. ही प्रथा होती. त्याने बायको पण जिंकली असं म्हणायचं. वाली मेला त्याची बायको सुग्रीवाची झाली.  पुन्हा सुग्रीव मेला, परत तिने कुठे जायचं? परत तिसऱ्याकडे जायचं, म्हणजे एका राजाची बायको, तिची अशी ससेहोलपट, तिची काय चूक? लढाईत नवरा मेला आणि तिला मात्र ज्या राजाने राज्य जिंकलेलं आहे त्या राजाच्या संपत्तीसारखी बायको न्यायची. म्हणजे सोनं नाणं, जमीन-जुमला न्यायचा तशी बायकोही न्यायची. म्हणजे कुठलीही तारा घेतली; बृहस्पतीची पत्नी किंवा वालीची तरी तिची तीच अवस्था.

मंदोदरी :

मंदोदरी ही रावणाची बायको. तिचा बिचारीचा काही दोष नाही. तिच्या नवऱ्याचे, रावणाचे बाकीचे उद्योग चाललेले आहेत. त्याने सीतेला पळवून आणलं. रावणाकडे दास दासी बऱ्याच आहेत. अनेक दासींचा त्याने उपभोग घेतलेला आहे. तो मोठा राजा आहे. त्याने स्वर्गात जाऊन देवांचा पराभव केला. अप्सरांचे जथेच्या जथे जिंकून आणले आहेत. आणि तो त्याचा मोठेपणा. तो मंदोदरीला सांगतो आहे की, “तू जा आणि सीतेची समजूत घाल की तिने माझ्याकडे यावे.” मंदोदरीने रावणाला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे की, “राम हा मोठा राजा आहे आणि ती सीता पतिव्रता आहे. तिची काही चूक नाही. तिला सन्मानाने रामाकडे पोहोचव.” पण रावणाने ऐकले नाही. आणि त्याच्यामध्ये मंदोदरीला दूषण दिलेले आहे.

एक पर्याय कथा अशी आहे, रामायण हे फक्त वाल्मिकी रामायण एकच नाही तर विविध दोनशे ते अडीचशे रामायणे आहेत. त्यात एक रामकथा अशी आहे की, ज्यामध्ये सीता ही रावणाची कन्या आहे. म्हणजे मंदोदरी आणि रावणाची कन्या आहे. बंगालमध्ये जे “चंद्रावती रामायण” आहे त्यामध्ये हा उल्लेख आलेला आहे. आणि माझ्या “सीतायन” या पुस्तकांमध्ये त्याचे अतिशय विस्ताराने भाषांतर केलेले आहे. ते रामायण एक चंद्रावती नावाची एक बाई सांगते आहे. मंदोदरी म्हणते की, “तू त्या सीतेच्या मागे असा लागू नको, कारण ती आपलीच मुलगी आहे.” म्हणजे ती मंदोदरीची आणि रावणाची मुलगी आहे. परंतु ती जन्माच्या आधी ‘‘ही मुलगी तुझ्या राज्याच्या मुळावर उठेल,’’ असे कळले म्हणून तिला आधीच नष्ट करायचं ठरलेलं असतं. परंतु मंदोदरी बिचारी आई होती. तिने गर्भपात केला नाही. तो गर्भ जन्माला येऊ दिला, तो पेटीत घालून समुद्रात सोडून दिला. तो वाहत वाहत जनक राजाच्या राज्यात गेला. तिथे एका कोळ्याला सापडला. कोळ्याने ती पेटी जनक राजाकडे दिली आणि जनक राजाने तिचे पालन पोषण केले. तात्पर्य काय तर ती बाई,  पुरुष कुणी का असेना तो राजा असू देत, महाराजा असू देत, ते इच्छित बाईच्या बाबतीत आक्रमक होतात. ती स्त्री जर वश झाली नाही तर त्यांना अपमान वाटतो आणि मग तिला भोगण्यासाठी असे सगळे प्रयत्न होतात. याचे दुष्परिणाम स्त्रियांना भोगावे लागतात.

आता या पाचही जणी, त्यांना ‘‘पंच महापतिव्रता’’ म्हणतात. या सगळ्यांचं आधी शील भ्रष्ट केलेलं आहे. अहल्या, द्रौपदी, सीता यांचं शील भ्रष्ट नाही केलं. शीलभ्रष्टतेचे आरोप केले, मग त्यांचा उद्धार केला आणि तो उद्धार ही कुठल्यातरी पुरुषाने केला आणि नंतर  त्यांना महापतिव्रता म्हणून पूजनीय वगैरे मानलं. या पाच जणींच्याच बाबतीत झालं का?  नाही. पुराणकथांत अनेक स्त्रियांच्या बाबतीत झालेलं आहे. त्यावर एका महाकाय ग्रंथ होऊ शकेल. आता आपण उदाहरण म्हणून  या सुप्रसिद्ध स्त्रिया घेतल्या आहेत.

त्यामुळे पुराणकथा स्त्रियांवर अन्याय करायला शिकवतात का? तर फक्त पुराणकथा नाही तर पुराणकथाच्या पाठीमागे जी सामाजिक पुरुषप्रधान मानसिकता आहे, ती धर्मगुरूंची मानसिकता आहे, ती शासनकर्त्याची मानसिकता आहे, अशी मानसिकता त्याच्या पाठीमागे असते. ती सगळ्या समाजाने वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या घडवून दिलेली असते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत तो अन्याय होतो. स्त्रियांवर अन्याय करायला केवळ कथा शिकवत नाहीत तर त्या कथेच्या पाठीमागे असलेली समाजाची मानसिकता शिकवते. जी पिढ्यानपिढ्या घडवलेली असते.

मनुस्मृती ही आमच्याकडे प्रधान प्रतीक म्हणून घेतलेली आहे. आणि ती वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये सगळा दोष स्त्रियांना दिलेला आहे. सगळं पातिव्रत्य हे त्या स्त्रीच्या लैंगिकतेशी बांधलेलं आहे. पुरुषांच्या बाबतीत ते काहीही नाही. आणि म्हणून पुरुषप्रधान व्यवस्था असे जे म्हटले जाते, ते नुसतं पुरुषप्रधान नाही, ‘मेन डॉमिनेटिंग सोसायटी,’ आहे ती. तिच्यात दबाव आहे. पुरुषत्त्वाचा दबाव, पुरुषी धारणांचा दबाव हा तिच्या लैंगिकतेशी बांधलेला आहे. मातृत्वाची महती आमच्याकडे नाही. मातृत्वाच्या महतीचे शब्द आहेत. पण त्याच्या आडून पितृत्वाचीच महती गायली गेली आहे. कारण कुठल्या पित्यापासून ते अपत्य झालेलं आहे याला आम्ही जास्त महत्त्व देत आहोत. त्यामुळे मातृत्वाची महती हा सुद्धा एक भ्रम आहे. (Dr. Tara Bhawalkar)

पुराणकथांमधून हे आवर्तक कल्पनाबंध वारंवार आलेले दिसतात. काही जरी झालं तरी जे मी मागे सांगितलं की, “मुलगासुद्धा आपला नाही असं म्हणणारी एक कथा आहे.” म्हणजे ही कथा आहे रेणुकेची. रेणुका, जमदग्नी आणि परशुराम. रेणुकेच्या पातिव्रत्याबद्दल पती जमदग्नीला शंका आली. म्हणजे नवऱ्याला बायकोबद्दल. मग त्यांनी काय करावे, आपला पुत्र परशुराम, रेणुकेचा आणि जन्मदग्नीचा. तो पितृभक्त होता. मुलाने पितृभक्त असले पाहिजे. त्याने सांगितलं,  “तुझ्या आईचं शीर उडवून टाक.” मग परशुरामने आईचं शीर उडवलं आणि तोच परशुराम आमचं दैवत आहे. महाराष्ट्रातल्या एका जातीचं. मातृहत्यारा. आईच्या शीलाची शंका बापाने घेतली म्हणून, आईचं मस्तक उडवणारा, रेणुकेचं शीर उडवणारा परशुराम देवत्त्व पावला.

पुत्र सुद्धा फक्त पुरुषी पद्धतीने वागलेला आपल्याला पुराणकथेत दिसतो. हे वाईट आहे. इथे प्रत्यक्षात असा पुरुष कुठे दिसला तर आपण त्याला शिक्षा देऊ शकू. पण पुराणकथा आमच्या आदर्श असतील तर ते आदर्श आम्हाला काय शिकवतात? स्त्रियांचा तुम्ही अपमान करा.  स्त्रीचं लैंगिकत्व सगळ्यात महत्त्वाचं माना. असं आमच्या पुराणकथा शिकवतात काय? असे प्रश्न जर निर्माण झाले तर ते अतिशय रास्त आहे. चुकीचे तर नाहीच. फक्त असे प्रश्न निर्माणच होऊ नये, अशी मनाची तगडबंद व्यवस्था सगळी झालेली आहे आणि बायकांची मनेही त्यांनी झापडबंद केलेली आहेत. सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं. स्वतंत्र विचार करण्याची आमच्या मनाची आणि मेंदूची दारे बंद केली आहेत. परंपरेविषयी तुम्ही विश्लेषण करायचं नाही- हा दंडक जबरदस्त आहे.

आज आम्ही ते विश्लेषण करतो आहोत की, पुराणकथांनी स्त्रियांच्यावर अन्याय करायला शिकवलं का? तर स्त्रियांवर अन्याय करणाराच हा समाज असल्यामुळे पुरणकथामध्ये तो आलेला आहे आणि पुराणकथांनी त्याबद्दल पुष्टी दिल्यामुळे त्याला जास्त उत्तेजन मिळाले आहे. असं आमचं म्हणणं आहे. जर पुराणकथांनी त्याचा निषेध केला असता तर जास्त बरं झालं असतं. पण तसा तो कुठेही केलेला नाही हे दुर्दैव आहे. म्हणून पुराण कथा स्त्रियांवर अन्याय करायला शिकवतात का? तर या समाजामध्ये ही भूमिका आहेच. त्याचा निषेध करायला पुराणकथा शिकवत नाहीत, ही आमची तक्रार आहे.

थोडक्यात सांगायचे तर आधी जिवंतपणी छळ करायचा आणि मरणानंतर त्यांची पतिव्रता म्हणून पूजा करायची, असे पुराणकथांतील स्त्रियांबाबत दिसते.

“सजीव तोवरी लत्ता देती

मरता घेती खांद्यावरती

उफराटा सन्मान||”

——————————————————————–

शब्दांकन : प्रतिभा पद्माकर जगदाळे

———————————————————————-

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

Related posts

पोटातले ओठावर!

हिंदुदुर्ग!

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ