दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द : प्रवाशांना दिलासा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लालपरी अर्थात एसटी सर्वसामान्यांच्या साठी वरदान आहे. राज्याच्या ग्रामीण तसेच बहुतांश भागात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. दरवर्षी दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून दहा टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो. यावर्षी २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान तब्बल एका महिन्यासाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, एसटी महामंडळानं ही भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. (Diwali 2024)

भाडेवाढ रद्द

यंदा २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान दहा टक्के हंगामी भाडेवाढ करण्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आलं होतं.ही भाडेवाढ विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू होती. मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरीकरीता भाडेवाढ लागू करण्यात आलेली नव्हती.सध्या दिवसाला सुमारे २२ ते २४ कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न महामंडळाला मिळते. हंगामी भाडेवाढीमुळे दिवसाचे उत्पत्र सहा कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे महिन्याभरात महामंडळाला ९५० ते एक हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, सध्या घेण्यात आलेल्या निर्णयामुळे महिन्याला ८५० कोटी रुपये महामंडळाला उत्पन्न मिळणार आहे. (Diwali 2024)

प्रवाशांना दिलासा

दिवाळीला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक कुटुंबे गावी, पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे बेत आखतात. यावेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा करते. दिवाळीच्या सुट्यांमध्ये आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी हंगामी भाडेवाढ करत असते. त्या प्रमाणं या वर्षी देखील निर्णय घेण्यात आला होता. आता तो निर्णय रद्द करण्यात आला आहे. दिवाळीमधील सणांच्या काळात सर्वसामान्य प्रवासी एसटीला प्राधान्य देत असतात. दहा टक्के हंगामी भाडेवाढ केल्यानं प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, यंदा एसटीच्या निर्णयामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ