जत; प्रतिनिधी : देशाला विकसित करण्यासाठी युवाशक्ती, नारीशक्ती, शेतकरी आणि गरीबांना सक्षम केले पाहिजे. भाजपने दहा वर्षात हे काम करून दाखवले. हाताला मत मागणाऱ्यांनी हाताला काम दिले का? असा सवाल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उपस्थित केला. भाजपा महायुतीचे उमेदवार आ.गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सावंत आणि आयुष्मान भारतचे सचिव डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत डाॅक्टर, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशयन, वकील, इंजिनिअर यांचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. (Pramod Sawant)
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ‘काँग्रेसला ६० वर्षे जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत करून दाखवले. मोदी यांनी डिजिटल इंडियाद्वारे सर्व शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थींच्या खात्यात जमा केला त्यामुळे भ्रष्टाचार पूर्ण थांबला आहे.’ ओमप्रकाश शेटे म्हणाले, आमदार पडळकर जत तालुक्याचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय शांत बसणारा नाहीत, याची गॅरंटी मी देतो, मंत्री पद देण्यासाठी मी आग्रही भूमिका घेतो त्यामुळे त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या. यावेळी डॉ. रवींद्र आरळी, चंद्रशेखर गोब्बी, विक्रम ताड, सलीम गवंडी उपस्थित होते.