महिला मान-सन्मानाच्या बाता मारणार्‍या सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्याची माफी मागितली का?

dhananjay mahadik

कोल्हापूर; प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. पण त्यानंतर एका क्षणाचाही विलंब न लावता, समस्त महिला वर्गाची जाहीर माफी मागितली. तरीही विरोधक गेले आठ दिवस टीका करत आहेत. यानिमित्ताने काँग्रेसचे आमदार महिलांच्या मान-सन्मानाच्या बाता मारत आहेत. मात्र आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्यातील सुनेचा जाहीरपणे घोर अवमान केला. त्याबद्दल त्यांनी महिलांची माफी मागितली का, असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला. भागीरथी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना सक्षम करण्याचं काम प्रामाणिकपणे केले आहे. त्यामुळं विचार आणि आचारातून स्त्री शक्तीबद्दल आदर आणि सन्मान असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी नमुद केले. गुरुवारी दसरा चौकात झालेल्या महायुतीच्या युवा शक्ती मेळाव्यात ते बोलत होते.

विधानसभा निवडणूक रिंगणातील महायुतीचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक, कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर, करवीरचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारासाठी, गुरुवारी दसरा चौकात महायुतीचा युवा शक्ती मेळावा झाला. यावेळी खासदार महाडिक यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, महिलांच्या मान-सन्मानाबद्दल काँग्रेस नेत्यांनी आपल्याला शिकवू नये. गेली २० वर्षे भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, महिला सक्षमीकरणाची चळवळ सुरु आहे. तर कोल्हापूरची पहिली महिला महापौर करण्याची कामगिरीसुध्दा महाडिक कुटुंबियांनी केली होती. आजवर महिलांसाठी अनेक सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवले. त्यामुळे महिला वर्गाचा अवमान करण्याचा विचारही कधी मनात आला नाही. केवळ राजकीय विद्वेषातून झालेली टीका दुर्दैवी आहे, असेही खासदार महाडिक म्हणाले.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी