Dalit Groom : दलितांच्या लग्नात घोड्याला, बाबासाहेबांवरील गाण्याला विरोध

Dalit Groom

पंचाहत्तर वर्षांपूर्वी संविधानानं सर्व नागरिकांना समता आणि स्वातंत्र्य दिलं… पण आजही देशाच्या काही भागांमध्ये दलितांना लग्नातही घोड्यावर बसता येत नाही आणि आपले प्रेरणास्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवाची गाणी वाजवता येत नाहीत. अनेक ठिकाणी दलितांच्या लग्नात पोलीस संरक्षणाची गरज का भासते? असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. (Dalit Groom)

-डॉ. विजय चोरमारे

दोन दिवसांपूर्वीची मथुरेजवळच्या दहरुआ गावातली ही घटना आहे. राम कुमार आणि सौरभ कुमार या दोन भावांची लग्नं झाली. त्यानंतर निघालेल्या वरातीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्यावरील गाणी लावण्यात आली. जाटव समाजाच्या गौरवपर गाणीही वाजवण्यात आली. त्यावेळी ठाकूर समाजातील लोकांनी या गाण्यांना विरोध केला. शिविगाळ आणि दगडफेकही केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. यावेळी झालेल्या मारामारीत दोघेजण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डीजेवर वाजणाऱ्या गाण्यांवरून वाद निर्माण झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिका-यांनीही सांगितले आहे. (Dalit Groom)

मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात एका पोलीस शिपायाला त्याच्या लग्नासाठी घोड्यावर बसण्यापासून रोखण्यात आलं होतं. घोडा थांबवण्यात आला, बाजा बंद करण्यात आला. डीजे पळवण्यात आला. सामाजिक वास्तव एवढं भीषण आहे की, एका पोलीस शिपायालाही सामाजिक भेदभावाचे चटके सहन करावे लागले.

राज्यात गेल्या एका महिन्यात ही अशी तिसरी घटना होती, जिथे दलित वराला घोड्यावरून लग्नासाठी जाण्यापासून रोखण्यात आलं. घोड्यावरून लग्नासाठी जाण्यापासून रोखलेला पोलीस शिपाई अखेर पोलीस संरक्षणात घोड्यावरून गेला. तब्बल शंभर पोलिसांचा बंदोबस्त त्यासाठी पुरवण्यात आला. (Dalit Groom)

ज्या पोलीस शिपायाचं लग्न थांबवलं, त्यानं सांगितलं की, “उच्चवर्णीय लोकांनी मला घोड्यावर बसू दिलं नाही. पोलीस इथे आहेत, पण नंतर काय होईल, हे सांगता येत नाही.”

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं. मिरवणूक रोखण्यात आली नव्हती. “सर्व विधी शांततेत पार पडले,” असं त्यांनी सांगितलं.

दुसऱ्या घटनेत, दमोह जिल्ह्यात एका आंतरजातीय जोडप्याने आरोप केला की, त्यांच्या लग्नामुळे गावातील पंचायत नाराज आहे. जर त्यांना गावात राहायचं असेल, तर २ लाख रुपये दंड द्या, अशी मागणी पंचायतीकडून केली जात आहे. राजेश प्रजापती, हा इतर मागासवर्गीय समाजाचा आहे. त्यांने गावकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन अनुसूचित जातीतील ज्योतीशी लग्न केलं.

राजेश प्रजापती याने पोलिसांना सांगितले की, त्यांच्या समाजातील काहीजण त्यांच्याकडून दोन लाख रुपये मागत आहेत. त्यांच्या कुटुंबावर सात वर्षांपासून सामाजिक बहिष्कार घालण्यात आला आहे. त्यांचा पाच वर्षांचा मुलगा गावातील इतर मुलांबरोबर खेळू शकत नाही, असंही त्यानं सांगितलं.

“आम्ही आधीच सात वर्षं त्रास भोगला आहे. माझ्या वडिलांनी पंचायतने सांगितलेल्या प्रायश्चित्ताला मान्यता दिली. आम्हाला पुन्हा समाजात सामील व्हायचं होतं, म्हणून आम्ही गावजेवण घालायलाही तयार झालो. आमच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे आम्ही कर्ज घेतलं. आम्ही सर्व काही केल्यानंतरही काही गावकऱ्यांनी गोंधळ घातला आणि सांगितलं की, तुम्ही आणखी दोन लाख रुपये देत नाही तोपर्यंत प्रायश्चित्त पूर्ण होणार नाही. आमच्याकडे हे पैसे नाहीत आणि जेवणासाठी घेतलेलं कर्जही वाया गेलं आहे,” असं त्यांनी सांगितलं. (Dalit Groom)

ही दोन्ही गावे बुंदेलखंड परिसरातील आहेत. हा परिसर देशातील सर्वांत मागास भागांपैकी एक मानला जातो.

आगरा येथील एतमादपुर परिसरातही दलित वर घोड्यावर बसल्यामुळे आणि वरातीत बँड वाजवल्याने काही उच्च जातीच्या  लोकांनी हल्ला केला. याच महिन्यात उत्तर प्रदेशातील एटा येथे ठाकुर समाजाच्या काही लोकांनी दलित मुलीच्या वरातीत अडथळा आणला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दगडफेक करण्यात आली. ज्यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. रात्री बारा वाजता पोलिसांनी शांतता प्रस्थापित करून विवाह संपन्न केला.

उपलब्ध माहितीवरून असे दिसते की या प्रकारच्या घटना उत्तर प्रदेशातील मथुरा, बरेली, आग्रा, अमरोहा, बुलंदशहर, मेरठ आणि मध्य प्रदेशातील टीकमगढ़, दमोह येथे घडल्या आहेत.

वर घोड्यावर बसल्यामुळे : मध्य प्रदेशातील टीकमगढ़ (मोखरा गाव), दमोह, आणि उत्तर प्रदेशातील बुलंदशहर, मेरठ येथे अशा घटना घडल्या. या घटना जातीयवाद आणि सामाजिक तणावाचे द्योतक आहेत.  दलितांना त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक हक्कांपासून रोखण्याचा प्रयत्न केला जातो.

उल्लेख केलेल्या घटना अलीकडच्या काळातील म्हणजे २०२४ च्या डिसेंबरपासून चालू महिन्यापर्यंतच्या कालावधीतील आहेत. (Dalit Groom) हा केवळ उत्तर प्रदेश किंवा मध्यप्रदेशचा प्रश्न नाही. देशात अनेक ठिकाणी हे चित्र दिसेल. भारतात आजही पाळंमुळं घट्ट रोवून असलेल्या जातीयवादाचं हे भीषण चित्र आहे. लग्नात घोड्यावर बसणं म्हणजे केवळ प्रतिष्ठेचा मुद्दा नाही. पिढ्यान् पिढ्या अन्याय सहन केलेल्या लोकांच्या स्वाभिमानाचा लढा आहे. माणूस पृथ्वीच्या कक्षा ओलांडून पलीकडे गेला. तरीही उच्चवर्णियांना दलिताचं हे घोड्यावर बसणं पचनी पडत नाही.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी