Daku Dulhan: ‘डाकू दुल्हन’ने केली एवढी लग्ने

Daku Dulhan

लखनौ : गुजरातमध्ये ती काजल, हरियाणात सीमा, बिहारमध्ये नेहा आणि उत्तर प्रदेशात स्वीटी म्हणून काही काळ वावरली. २१ वर्षांपर्यंत तिची किमान बारा लग्ने झाली, पण काही तासांपेक्षा ती जास्त काळ टिकली नाहीत. दरवेळी तिच्याबाबत दुर्दैवी घटना घडत असे (म्हणजे घडवली जात असे) (Daku Dulhan)

लग्नस्थळावरून किंवा लग्नानंतर काही वेळातच अंगावरच्या सर्व दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूंसह अपहरण होत असे. त्यानंतर तिचे तोंड नवख्या वराने कधीच पाहिलेले नसे.

पण तिला मात्र काहीच फरक पडत नसे. तिचे फोटो काही दिवसांतच विवाहेच्छुकांच्या वेबसाइट्स आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झळकत. अर्थातच नव्या शिकारीवर जाळे टाकण्यासाठी ती सज्ज असे…

तर ही आहे ‘डाकू दुल्हन!’ तिचे मूळ नाव गुलशाना रियाज खान. ती आहे उत्तर प्रदेशातील जौनपूरची. रियाज खान तिचा नवरा. (Daku Dulhan)

तिच्यासह तिच्या टोळीतील आठ जणांना गुरुवारी (१ मे) आंबेडकर नगर पोलिसांनी अटक केली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये पाच महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. ते सराईत गुन्हेगार आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ७२,००० रुपये रोख, एक मोटारसायकल, एक सोन्याचे मंगळसूत्र, ११ मोबाईल फोन आणि तीन बनावट आधार कार्ड जप्त केली आहेत.

अटक करण्यात आलेल्यांची ओळख पटली आहे. मोहनलाल (३४, रा. जिंद, हरियाणा), रतन कुमार सरोज,  रंजन उर्फ ​​आशु गौतम, मंजू माली (तिघेही रा. जौनपूर) राहुल राज, सन्नो उर्फ ​​सुनीता, पूनम आणि रुखसर (सर्वजण रा. आंबेडकर नगर) अशी त्यांची नावे आहेत. आपण जौनपूरच्या ‘सीमा’चे नातेवाईक असल्याचे त्यांनी भासवले. आंबेडकर नगरचे पोलिस अधीक्षक केशव कुमार म्हणाले की, या टोळीने नुकतीच एक ‘शिकार’ केली होती. बासखरी पोलिस हद्दीतील कसादाहा गावाजवळ या टोळीला पकडण्यात आले. (Daku Dulhan)

ताज्या प्रकरणात हरियाणातील रोहतक येथील रहिवासी सोनूला फसवून, कधीही न झालेल्या लग्नासाठी ८०,००० रुपयांची मागणी केली. लग्नासाठी मुलगी मिळत नसलेल्या कुटुंबाला हेरून गुलशाना आणि तिची टोळी जाळे टाकत असे.

‘‘लग्नाच्या दिवशी, समारंभानंतर लगेचच, टोळीतील पुरुष वधूचे अपहरण करत. सर्व मौल्यवान वस्तू लुटत असत,’’ असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणात, सोनूबाबतही अशीच घटना घडली. त्याने यूपी पोलिसांना तत्काळ कळवले. त्याच्या वधूचे दुचाकीवरून आलेल्या पुरुषांनी अपहरण केले आहे. त्यानंतर आम्ही नाकाबंद केली. त्यानंतर एकाला अटक करून चौकशी केली असता त्यांनी सर्व माहिती सांगितली. त्यावरून या टोळीचा पर्दापाश झाल्याचे पोलिस अधीक्षक केशव कुमार यांनी सांगितले.

डाकू दुल्हनने १२ कुटुंबांना फसवल्याची कबुली दिली. सर्वच गुन्ह्यात त्यांनी एकच पद्धत वापरली. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी ती ओळख आणि ठिकाणे बदलत असे. नव्या पाहुण्यांचा विश्वास जिंकण्यासाठी तिने बनावट ओळखपत्रही तयार करत असे. सर्व आरोपींविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी कट आणि बनावटगिरीशी संबंधित विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर