पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातले आरोपी का सुटले?

मुंबईः पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी हा निकाल दिला. ३ जून २००६ रोजी घडलेल्या या हत्याप्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. तब्बल वीस वर्षांनी निकाल जाहीर झाला. तपासात अनेक त्रुटी असल्याचे तसेच माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असून तिथे आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. (Pawanraje Nimbalkar case verdict)

या निकालाचा आणि राजकीय निर्णयाचा काही संबंध नव्हता. मी मतदारसंघात जाऊन मतदारांशी चर्चा करेन आणि त्यानंतर राजकीय निर्णय़ घेईन, असेही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

या प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंह आणि छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव, शशिकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन हे संशयित आरोपी होते. पैकी पारसमल जैनला माफीचा साक्षीदार बनवण्यात आले होते. (Pawanraje Nimbalkar case verdict)

निकालपत्राचे सविस्तर वाचन

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी सुमारे दोन तास निकालपत्राचे वाचन केले. या संपूर्ण खटल्याची भिस्त माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्यावर होती. परंतु त्याची साक्षच ठिसूळ असल्याचे स्पष्ट झाले. माफीच्या साक्षीदाराचे दोन वेगवेगळे कबुलीजबाब होते, आणि त्यातली तफावत सरकारी वकिलांनी तपासली नव्हती, पोलिसांनीही खबरदारी घेतली नव्हती. आरोपी ज्या हॉटेलमध्ये राहिला असे म्हटले त्याचाही पुरावा जोडला नव्हता. आरोपी फोनवर बोलले असतील तर त्याचा सीडीआर जोडणे आवश्यक होते, परंतु सरकारी वकील, तपास यंत्रणांनी यासंदर्भातील पुरावे सादर केले नाहीत, असे न्यायाधीशांनी म्हटले.

पारसमल जैनला सुरुवातीला मुंबई क्राइम ब्रँचने ताब्यात घेतले होते आणि पंधरा दिवस कोठडीत ठेवून टॉर्चर केले होते, त्याला अटक केली नव्हती. याकडेही न्यायाधीशांनी लक्ष वेधले. (Pawanraje Nimbalkar case verdict)

सरकारी पक्ष कुठे चुकला?

ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, या खटल्याच्या न्यायाधीशांचा इतिहास चांगला आहे. यामध्ये सरकारी पक्षाची कुठं चूक झाली की पुरावे व्यवस्थित नव्हते, हे बघावे लागेल असे. तपासात उणिवा राहिल्या असतील तर त्या कोणत्या आहेत, हेही पाहावे लागेल, असे निकम म्हणाले. (Pawanraje Nimbalkar case verdict)

निकम म्हणाले, माफीचा साक्षीदार संवेदनशील असतो. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी इतरांना गोवत असतो, असं कायदा मानतो. त्यामुळे माफीच्या साक्षीदाराची साक्ष न्यायालय विचारात घेत असते तेव्हा त्यासाठीचा भक्कम पुरावा आहे का हेही पाहिले जाते. या खटल्यात तसे झालेले दिसत नाही.

गोळ्या झाडून हत्या (Pawanraje Nimbalkar case verdict)

३ जून २००६ रोजी पवनराजे निंबाळकर मुंबईत आले होते. मुंबईतील कामे आटोपून ते पुण्याच्या दिशेने निघाले होते. नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांना एका व्यक्तीसोबत जमिनीच्या व्यवहाराबाबत चर्चा करावयाची होती. (Pawanraje Nimbalkar case verdict)

पांढ-या रंगाच्या मोटारीतून पवनराजे निंबाळकर कळंबोली येथीलचार रस्ता भागात पोहचले. तिथे मारेकरी आधीपासूनच पवनराजेंवर हल्ला करण्यासाठी पाळत ठेवून होते, असे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या मोटारीला ओव्हरेटक केले. चालकाला कार थांबवायला सांगितले. त्यावेळी मोटारीत असलेल्या पवनराजेंना गाडीतच झोप लागली होती. मारेकरी गाडीजवळ आले आणि चौकशी करण्याच्या निमित्ताने बोलू लागले. तेव्हा चालकाने पवनराजेंना झोपेतून जागे केले आणि खिडकीच्या काचा खाली केल्या. गाडीच्या काचा खाली होताच शूटर्सनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

मतदारसंघात चर्चा करून राजकीय निर्णयः ओमराजे

निकालानंतर प्रतिक्रिया देताना पवनराजे यांचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, निकाल दुर्दैवी आहे. वीस वर्षांपासून अखंडपणे आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करीत होतो. दुर्दैवाने जो निकाल आला आहे, त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. उच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. न्यायासाठी न्यायालयाच्या पातळीवर शेवटपर्यंत आम्ही संघर्ष करणार.

कलियुगात वाईटाला बळ असते, चांगल्याला न्याय मिळायला उशीर होतो, असे सांगून ओमराजे निंबाळकर म्हणाले, मतदारसंघात जाऊन निर्णय़ घेईन. या केसचा आणि माझ्या निर्णयाचा काही संबंध नाही. माझ्यासाठी निकाल महत्त्वाचा होता. कारण वीस वर्षे त्यासाठी मी संघर्ष करीत होतो. माझा राजकीय निर्णय़ आहे तो मी मतदारसंघातील लोकांशी चर्चा करून निर्णय घेईन.

Related posts

पवनराजे निंबाळकर हत्या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

भाजपला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी ऑपरेशन कमळ करावे लागेल : उद्धव ठाकरे

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण नेमके काय आहे?