Congress on rain: ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या : सपकाळ

Congress on rain

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात मुसळधार पावसाने अनेक भागात पूरस्थिती उद्भवली आहे. अतिवृष्टीमुळे सुमारे १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत द्या, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. (Congress on rain)

सपकाळ यांनी बुधवारी (२० ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात सपकाळ यांनी ही मागणी केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १७ जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी, बाजरी, उडीद, मका, सोयाबीन, मूग, कापूस, तूर, फळे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे, हजारो हेक्टरवरील ऊसालाही मोठा फटका बसला आहे, काही ठिकाणी शेतकऱ्याचे पशूधन वाहून गेले आहे तर नांदेड जिल्ह्यात जिवीतहानीही झाली आहे. (Congress on rain)

बळीराजाला निसर्गाने आणखी संकटात टाकले आहे. राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी सरकारने या कठीण प्रसंगी सर्व नियम, अटी व शर्थी बाजूला ठेवून शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे. जेथे जिवीतहानी झाली आहे त्यांच्या कुटुंबियांचा सहानुभूतीपूर्ण विचार करून मदत करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर