Australia PM : दोन्ही संघांनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट

सिडनी : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील सिडनी येथील अखेरच्या कसोटीपूर्वी भारत व ऑस्ट्रेलियाच्या संघांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. नववर्षाच्या स्वागतासाठी अल्बानीज यांनी किरीबिल्ली हाउस या आपल्या निवासस्थानी कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी अल्बानीज यांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे कौतुक केले. (Australia PM)

सिडनी मॉर्निंग हेराल्ड या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. सुमारे दीड तास अल्बानीज यांनी दोन्ही संघांसोबत वेळ घालवला. “बुमराह दरवेळी गोलंदाजीस येतो, तेव्हा काहीतरी उत्कंठावर्धक घडते. त्याला डाव्या हाताने किंवा लंगडी घालत गोलंदाजी करावी लागेल, असा कायदा आपण येथे संमत करू शकतो,” अशी मिश्किल प्रतिक्रियाही अल्बानीज यांनी यावेळी दिली. ऑस्ट्रेलियाचा नवोदित फलंदाज सॅम कॉन्स्टसने या कार्यक्रमादरम्यान भारताच्या विराट कोहलीसोबत छायाचित्र घेतले. मेलबर्न कसोटीदरम्यान कॉन्स्टसला धक्का दिल्यामुळे विराटला मानधनाच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला होता. कॉन्स्टसचे पालकही या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी बुमराहसोबत छायाचित्र काढण्याची विनंती केली.

या कार्यक्रमामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा छोटेखानी भाषण करणार होता. तथापि, ऐनवेळी त्याच्याऐवजी भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीरने हे भाषण केले. “ऑस्ट्रेलिया हा प्रवासासाठी खूप सुंदर, परंतु क्रिकेटदौरा करण्यासाठी खूप कठीण देश आहे. येथील प्रेक्षक हा उत्साही आहे. या दौऱ्यातील आमची आणखी एक कसोटी शिल्लक आहे. त्या कसोटीत आम्ही प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकू, अशी मला आशा आहे,” असे गंभीर म्हणाला. (Australia PM)

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही या वेळी मनोगत व्यक्त केले. “मागील आठवड्यामध्ये मेलबर्नमधील कसोटी ही आम्ही खेळलेल्या सर्वोत्तम कसोटींपैकी एक आहे. त्या पाच दिवसांमध्ये आम्ही स्टेडियममध्ये जे वातावरण अनुभवले, तसे मी यापूर्वी कधीही अनुभवले नव्हते. या आठवड्यात होणाऱ्या मालिकेतील अखेरच्या कसोटीकरिताही मी तितकाच उत्सुक आहे. मालिकेचा निकाल या कसोटीवर अवलंबून असल्याने आम्हाला मालिका जिंकण्याची संधी आहे,” असे कमिन्सने सांगितले. अल्बानीज यांनी भारतीय संघाची या दौऱ्यामध्ये घेतलेली ही दुसरी भेट आहे. यापूर्वी भारत आणि प्राइम मिनिस्टिर इलेव्हन यांच्यामध्ये कॅनबेरा येथे रंगलेल्या सराव सामन्यापूर्वी अल्बानीज भारतीय संघास भेटले होते.

</

p>
हेही वाचा :

Related posts

KSA Football : ‘पाटाकडील’ला ‘दिलबहार’ने रोखले

Karun Nair : करुण नायरचा विश्वविक्रम

India’s unwanted Records : भारताचे नकोसे विक्रम