कर्जत : प्रतिनिधी : भाजप सध्या ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत आहे; पण येथे कुणीच बटणार नाही किंवा कटणार नाही. उलट या लोकांनीच देशात गरीब व श्रीमंत अशी दरी पाडण्याचे पाप केले. मी मुख्यमंत्री असताना कोण कटले? मी सर्वांना सोबत घेऊन पुढे जात होतो; पण त्यांनी गद्दारी करून सरकार पाडले. आता हे लोक आपल्या नोकऱ्या आणि उद्योग गुजरातला पळवण्याचे काम करतात. २३ तारखेनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. आता जा तिकडेच ढोकळा खायला, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि महायुती सरकारवर आसूड उगारला. (Uddhav Thackeray)
कर्जत येथे आयोजित प्रचारसभेत ते म्हणाले, की या लोकांनी जनतेला धोके देऊन स्वतःला खोके घेतले. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही हिशेब नाही. राज्यातील ज्या-ज्या ठिकाणी गद्दारी झाली, त्या ठिकाणी हेच चित्र आहे. या मतदारसंघांत अनेक कंत्राटे देण्यात आली. सरकारच्या तिजोरीतून पैसा देण्यात आला; पण तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलाच नाही. आता ५० खोके यांच्यासाठी सुटे पैसे झाले. या लोकांनी हजारो कोटींनी महाराष्ट्र लुटला आहे.
या निवडणुकीत पैशाचा महापूर आला आहे. माझ्या उमेदवारांकडे तेवढे पैसे नाहीत. शिवसैनिकांनी आपल्या निष्ठेचा खडक त्यात वाहून जाऊ देऊ नये. महापूर येतो आणि जातो; पण पैसे घेऊन मते विकत घेणारी ही औलाद महाराष्ट्राला काय सुख देणार? या लोकांनी ठिकठिकाणी जाहिरातबाजी सुरू केली आहे. केलेय काम भारी, लुटली तिजोरी. केली गद्दारी, पुढे लाचारी, असे ठाकरे म्हणाले.