Beguluru Stampede: आरसीबीच्या जल्लोषाला गालबोट; चेंगराचेंगरीत अकराजणांचा मृत्यू

Beguluru Stampede

बेंगळुरू : आयपीएलमधील विजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)च्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बुधवारी (४ जून) लाखो चाहते जमलेले असताना झालेल्या चेंगराचेंगरीत अकराजणांचा मृत्यू झाला. चेंगराचेंगरीचे गांभीर्य पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर ही दुर्घटना घडली. आरसीबीचा विजयाचा आनंद साजरा होत असताना क्षणार्धात झालेल्या या दुर्घटनेने गालबोट लागले. घटनेत ४० वर जखमी झाले आहेत. (Beguluru Stampede)

आरसीबीमधील आपल्या आवडत्या खेळाडूंची छबी टिपण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या चाहत्यांनी स्टेडियमचा परिसर आधीच फुलून गेला होता. त्यामुळे सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे या घटनेने स्पष्ट झाले. (Beguluru Stampede)

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने बुधवारी येथे विजेत्या आरसीबी खेळाडूंसाठी एक विशेष सत्कार समारंभ आयोजित केला होता.

दरम्यान, या दुर्घटनेतील जखमींना शिवाजीनगरमधील बोरिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रिकेट संघ बहुप्रतिक्षित विजय साजरा करण्यासाठी ज्या स्टेडियममध्ये येणार होता त्या स्टेडियमच्या गेटवर मोठ्या संख्येने लोक जमले होते. मात्र ही गर्दी अनियंत्रीत झाली आणि चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. (Beguluru Stampede)

आरसीबीच्या आयपीएल २०२५ च्या विजयाचा आनंदोत्सव पाहण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमच्या अनेक प्रवेशद्वारांकडे हजारो चाहत्यांनी गर्दी केली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त असूनही पोलिसांचा गोंधळ उडाला. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आली होता तरीही गर्दी नियंत्रित करण्यासाठी अधिकाऱ्यांना संघर्ष करावा लागला. मोठा पोलिस बंदोबस्त असूनही गर्दीचे व्यवस्थापन करणे कठीण झाले. गर्दी नियंत्रित करण्यासाठी कर्नाटक पोलिसांना प्रवेशद्वारांजवळ आणि विधान सौध येथे सौम्य लाठीमार करावा लागला.

खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते गेट, झाडे आणि कुंपणावर चढले.

सुरक्षेच्या भीतीने सरकारने विजय परेड रद्द केली होती. (Beguluru Stampede)

मोठ्या गर्दीची अपेक्षा असल्याने, कर्नाटक सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव विधान सौध ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंतची खुली बस विजय परेड रद्द केली होती.
मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर मोफत उपचार करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.(Beguluru Stampede)

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतेक जण तरुण आहेत. एकूण ४७ जण जखमी झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘ही एक गंभीर दुर्घटना घडली आहे. दुर्दैवाने, चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मी बोरिंग आणि वैदेही रुग्णालयात जखमींची भेट घेतली.’’

एवढी गर्दी होईल असे अपेक्षित नव्हते

आनंदाच्या उत्सवात अशी दुर्घटना घडायला नको होती. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,  ‘‘आरसीबी’चे एक लाखाहून अधिक चाहते विधान सौधच्या बाहेर जमले होते. तथापि, तेथे कोणतीही दुर्दैवी घटना किंवा जीवितहानी झाली नाही. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियममध्ये सुमारे ३०,००० लोक बसू शकतात. परंतु जवळपास २-३ लाख लोक गेटबाहेर जमले होते. अंतिम सामना काल रात्री झाला आणि आम्हाला सकाळपर्यंत याची तयारी करावी लागली. आम्हाला इतक्या गर्दीची अपेक्षा नव्हती.” (Beguluru Stampede)

श्वास गुदमरवणारी गर्दी

स्टेडियमवर प्रचंड गर्दी झाली होती. अक्षरश: श्वास गुदमरवणारी गर्दी होती. किंचीत हालचालही करता येत नव्हती, असे स्टेडियमच्या गेट्सजवळ अडकलेल्या एका चाहत्याने सांगितले. ‘‘स्टेडियम गच्च भरले आहे. पोलिस आम्हाला आत जाऊ देत नाहीत. आम्हाला परत जायचे आहे, पण परतही जाऊ दिले जात नाही. गेट उघडले तर पुन्हा बाहेरची गर्दी आत घुसेल, अशी पोलिसांना भीती वाटत होती,’’ असे त्याने सांगितले.

हेही वाचा :
आरसीबीची ६,२५५ दिवसांची प्रतीक्षा संपुष्टात
सूर्यकुमार ठरला ‘मौल्यवान’ खेळाडू

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी