Beed- Parbhani Incident : आंबेडकरी आणि मराठा समाजावर मार खाण्याची वेळ का आलीय?

विजय चोरमारे :

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्र्यांनी शपथ घेतली. आणि या शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या आनंदापेक्षाही ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, अशा लोकांच्या नाराजीचा सूर अधिक तीव्रपणे उमटू लागलाय. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधीही मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त झाली नव्हती. ही नाराजी भारतीय जनता पक्षातून व्यक्त झाली. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. ज्या नेत्याच्या मुलानं वेगळ्या पक्षातून निवडणूक लढवली त्याचासुद्धा मंत्रिमंडळात समावेश झाला, पण मला डावललं, असं त्यांनी गणेश नाईक यांचं नाव न घेता थेट त्या संदर्भातला उच्चार केलेला आहे. छगन भुजबळ यांनी थेट नाराजी व्यक्त केलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या प्रकाश सुर्वे असतील, तानाजी सावंत असतील त्यांनीही नाराजी व्यक्त केली. काही लोक तर अधिवेशनाला आले नाहीत, काही लोक नागपुरात पोहोचले होते. ते नागपुरात अधिवेशन सुरू असताना नागपूर सोडून आपापल्या मतदारसंघात किंवा आपापल्या गावी परतले. इतकी तीव्र नाराजी या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आपल्याला पाहायला मिळते आहे. पण एकीकडे हे नाराजी नाट्य आणि त्याचबरोबर नाराजांची मनधरणी करण्याचं सगळं काम सुरू असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र दोन अत्यंत गंभीर घटनांमुळे अस्वस्थ आहे. मंत्रिपद न मिळालेल्या लोकांच्या नाराजीपेक्षा, अस्वस्थतेपेक्षा महाराष्ट्राची अस्वस्थता वेगळी आहे. महाराष्ट्राच्या अस्वस्थतेची वेगळी कारणे आहेत. (Beed- Parbhani Incident)

परभणीतील कोठडी मृत्यू

पहिली घटना आहे परभणीतली. परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरच्या संविधान शिल्पाची मोडतोड करण्यात आली. त्यानंतर स्वाभाविकपणे आंबेडकरी चळवळीतून त्यासंदर्भात तीव्र असंतोष व्यक्त झाला. आंदोलन पुकारलं गेलं. बंद पुकारला गेला. त्यादरम्यान दगडफेक झाली. जाळपोळ झाली. आंदोलनात सहभागी झालेल्या पन्नास लोकांना अटक करण्यात आली. त्यात अटक केलेला सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक ३५ वर्षांच्या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. एखाद्या चळवळीतल्या तरुणाचा आंदोलनानंतर अटक झाल्यानंतर कोठडीत मृत्यू होणं ही अत्यंत गंभीर स्वरूपाची घटना आहे. अर्थात कोठडीत मृत्यू ही आपल्याकडे अत्यंत गंभीर स्वरूपाची घटना मानली जाते. कारण तिथं जे कायद्याचे रक्षक असतात त्यांच्याकडून हा मृत्यू झालेला असतो. सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचा दावा सरकारी यंत्रणेकडून, पोलिसांकडून करण्यात येतोय. परंतु पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशीला जीव गमावा लागलाय, असा दावाही करण्यात येतोय. आंदोलन आंबेडकर चळवळीतल्या लोकांचं होतं. आंबेडकरी चळवळ म्हणजे केवळ बौद्ध समाजाची चळवळ नव्हे, हे लक्षात घ्यावं लागेल. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी कुठल्या जातीचा आहे याचा उल्लेख करण्याची गरज नाही. तो आंबेडकरी चळवळीतला तरुण होता आणि एका आंबेडकरी चळवळीतल्या तरुणाचा कोठडीमध्ये मृत्यू झालाय, ही वस्तुस्थिती आहे. त्यासंदर्भातले तपशील नंतरच्या काळात समोर येऊ शकतील. आताच त्या संदर्भात निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही. पण आंबेडकरी चळवळीतल्या एका तरुणाचा कोठडीत मृत्यू झाला ही गोष्ट इथं दुर्लक्षित करून चालणार नाही.

संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या

दुसरी घटना आहे बीड जिल्ह्यातली. गेले काही दिवस चर्चा सुरू आहे बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची. हत्येचा विषय आता मागे पडलेला आहे. आणि या हत्येच्या सूत्रधाराच्या अटकेवरून राजकारण तापले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. काही लोक फरारी आहेत. या हत्येचे मुख्य सूत्रधार म्हणून ज्याचा सातत्याने उल्लेख हो ते नाव म्हणजे वाल्मिक कराड. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख थेट सभागृहात केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतले गटनेते जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा वाल्मिक कराड यांच्या अटकेची मागणी केलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा थेट वाल्मिक कराडकडे बोट दाखवून वाल्मिक कराड याच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. हे वाल्मिक कराड म्हणजे बीड जिल्ह्यातले धनंजय मुंडे यांचे उजवे हात मानले जातात. वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पान हलत नाही, असं सांगितलं जातं. वाल्मिक कराड हा या खुनाच्या घटनेचा मुख्य सूत्रधार म्हणून चर्चा आहे. अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण, त्यानंतर त्यांची हत्या या गोष्टी समोर आल्याच. पण त्यानंतर आत्ता काही दिवस उलटल्यानंतर ही हत्या किती क्रूरपणे करण्यात आलेली होती याचे तपशील समोर यायला लागले आहेत. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. कुणाही माणसाच्या काळजाला पाझर फुटेल अशी ही घटना आहे. अत्यंत वाईटपणे संतोष देशमुख या एका चांगल्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. (Beed- Parbhani Incident)

संतोष देशमुखचा गुन्हा काय होता, तर मस्साजोगजवळ एक पवनचक्की प्रकल्प आहे. त्या पवनचक्की प्रकल्पावर खंडणी मागण्यासाठी वाल्मिक कराडचे लोक गेलेले होते. तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांना त्यांनी मारहाण केली. ते सुरक्षा रक्षक दलित समाजातले होते आणि ते मस्साजोग गावचे होते. संतोष देशमुख यांनी आपल्या गावातल्या सुरक्षा रक्षकांना मारहाण केली त्या संदर्भात विचारणा केली. त्यातून हा पुढचा सगळा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. संतोश देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. हत्येचा सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडकडे बोट दाखवण्यात आले आहे, जो वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा हस्तक आहे. (Beed- Parbhani Incident)

मराठा-वंजारी संघर्ष

बीड जिल्ह्यातलं राजकारण लोकसभा निवडणुकीपासून बदललं आहे. त्याआधी मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर मराठा आणि ओबीसी समाज घटकांमध्ये विशेषतः मराठा आणि वंजारी समाजामध्ये तिथं कटुता निर्माण झाली. त्यातून एक संघर्ष वाढत गेलेला आहे आणि त्या सगळ्याची पार्श्वभूमी याला आहे. इतकं सगळं गंभीर प्रकरण घडल्यानंतर, धनंजय मुंडे मात्र बीडचा बिहार झाला असं म्हणणं बीडवर अन्याय करणारं असल्याचा दावा करायला लागलेत. संतोष देशमुख यांची हत्या पैशाच्या देवाण-घेवाणीवरून झाल्याचं धडधडीत खोटं सांगत आहेत. आमदार सुरेश धस यांनीच त्यांचा तो दावा खोडून काढलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारानंच धनंजय मुंडे यांचा तो दावा खोडून काढला आहे. कोणत्याही पैशाच्या देवाण घेवाणीशी संतोष देशमुख यांचा संबंध नव्हता. त्यावरून ती हत्या झालेली नाही असं सुरेश धस यांनीच ‘ऑन कॅमेरा’ स्पष्ट केलेलं आहे. हे सगळं तापल्यानंतर देवेंद्र फडणवीस मात्र, सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असं म्हणतायत. पण हत्येचा मूळ सूत्रधार वाल्मिक कराडचे बॉस धनंजय मुंडे त्यांना एकीकडे ते पोटाशी धरतायत. आणि आम्ही हल्लेखोरांना किंवा या प्रकरणातल्या कुणालाही पाठीशी घालणार नाहीत असं देवेंद्र फडणवीस सांगतात, यातला विरोधाभास लक्षात आल्यावाचून राहत नाही. खरं तर धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. बीडच्या राजकारणावर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांचा अधिक प्रभाव आहे. गेल्या पाचेक वर्षातल्या पालकमंत्रिपदानंतर त्यांचं वर्चस्व वाढलेलं आहे. याच काळात त्यांच्या सरकारी समर्थनाने वाल्मिक कराडची दहशत वाढली आहे. घटना घडून गेल्यानंतर आठवडा उलटून गेल्यानंतरसुद्धा वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली नाही. खरं तर तर पोलिसांना शोध घेण्याची कुठेच गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना सांगितलं की वाल्मिक कराडला हजर करा तर वाल्मिक कराड हजर होऊ शकेल. त्यानंतर म्हणता येईल की कुणाला पाठीशी घालत नाही. अर्थात वाल्मिक कराडला आज ना उद्या अटक करावी लागेल पण यासाठी जी दिरंगाई होतेय, जो विलंब होतोय तो चिंताजनक आहे. सरकारकडून गुन्हेगारीला आश्रय दिला जातोय, असाच याचा अर्थ काढता येऊ शकतो. (Beed- Parbhani Incidentt)

आंबेडकरी आणि मराठा समाज टार्गेट

या दोन घटनांच्या निमित्तानं मला एक गंभीर बाब नोंदवायची आहे. परभणीच्या दंगलीनंतर तिथं आंबेडकरी चळवळीतल्या तरुणाचा कोठडीत मृत्यू झाला. मस्साजोगमध्ये मराठा समाजाच्या सरपंचाची हत्या झाली. या दोन्ही घटना अत्यंत निषेधार्ह आहेत. अत्यंत काळजी वाटायला लावणाऱ्या आहेत.

 एक मराठा समाजातला सरपंच आहे. एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे. जेव्हा तुम्ही समाज म्हणून निवडणुकीत ताठ मानेनं राजकारण करत नाही, समाज म्हणून जेव्हा विकले जाता, तेव्हा तुमची किंमत राहत नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. मराठा समाज या आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर विकला गेला. आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणावर विकला गेला. त्यामुळे राज्यकर्त्यांना या समाजांची किंमत कळलेली आहे. स्वाभाविकपणे या समाज घटकांच्यावर नजीकच्या काळात, भविष्यात जर अशा प्रकारचे अन्याय वाढत गेले, अत्याचार वाढत गेले तर आश्चर्य वाटायला नको. तुम्ही स्वाभिमान टिकवावा लागतो. स्वतःला विकता तेव्हा तुमची किंमत शून्य होते. शासनव्यवस्था तुम्हाला कचऱ्यासारखी वापरते हे लक्षात घ्यायला पाहिजे. खरं तर हे दोन लढाऊ समाज आहेत. आंबेडकरी समाज हा मराठा समाजापेक्षा अधिक लढाऊ आहे. अधिक आक्रमक आहे. तो कधीही मागे हटत नाही. लढाईत तडजोड करीत नाही. आपल्या एखाद्या ठरवलेल्या मागणीसाठी किंवा निश्चित ध्येयासाठी कोणत्याही पातळीवर जाऊन लढत असतो. पण निवडणुकीच्या काळात आंबेडकरी समाजातले नेते तडजोडी करतात. राजकीय तडजोडी करतात. आणि त्यांच्या पाठीमागे समाजातले बरेच घटक फरफटत जातात. त्यामुळे एरवी हा आक्रमक असलेला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानासाठी प्राणाची पर्वा न करणारा समाज निवडणुकीच्या काळात मात्र अवसानघात करून घेतो. आपल्या दलाली करणाऱ्या नेत्यांच्या पाठीमागे फरफटत जातो. त्यामुळे नंतरच्या काळात त्याची राजकीय किंमत शून्य असते. तीच गोष्ट मराठा समाजाच्या बाबतीत घडते. मराठा समाज हा आंबेडकरी समाजाच्या अनेक पटींनी विकला जाणारा समाज आहे. छोट्या छोट्या राजकीय लाभांच्यासाठी हा समाज विकला जातोय. आणि त्यामुळेच आता बीडसारख्या जिल्ह्यात या समाजावर बॅकफूटवर जाण्याची पाळी आलेली आहे. अर्थात कुठल्याही समाजाने आक्रमक होण्याची, ऊतमात करण्याची, सत्तेचा उन्माद करण्याची गरज नसते. पण ज्यावेळी सत्तेला आव्हान द्यायचं असतं तेव्हा तुम्ही स्वाभिमानी असावे लागता. तुम्ही स्वाभिमान गहाण टाकता, तुम्ही तुमचं मत विकता, तुम्ही स्वतःला विकता त्यावेळी तुमची किंमत शून्यावर येते. मला वाटतं बीडच्या आणि परभणीच्या घटनेचा हा अन्वयार्थ लक्षात घ्यायला पाहिजे. (Beed- Parbhani Incident)

हेही वाचा : 

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

पोटातले ओठावर!