म्युनिच : भारताच्या आर्या बोरसे, अर्जुन बाबुता या नेमबाजांनी आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये १० मीटर एअर रायफलच्या मिश्र गटात सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक असून याबरोबरच भारताने गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. (Arya-Arjun)
आर्या-अर्जुन जोडीने १० मी. एअर रायफलच्या मिश्र सांघिक गटामध्ये प्राथमिक फेरीत दुसरे स्थान मिळवल्याने ते सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी पात्र ठरले. प्राथमिक फेरीत आर्या-अर्जुन यांनी एकूण ६३५.२ गुण मिळवले. त्यांपैकी आर्याने ३१७.५, तर अर्जुनने ३१७.७ गुणांचा वेध घेतला. चीनच्या झिफेई वांग (३१८.२) आणि लिहाओ शिंग (३१७.७) यांनी एकत्रितरीत्या ६३५.९ गुण मिळवत प्राथमिक फेरीतील अग्रस्थानाबरोबरच नवा जागतिक विक्रमही नोंदवला. त्यांनी भारताच्याच नर्मदा राजू आणि रुद्रांक्ष पाटील यांचा ६३५.८ गुणांचा विक्रम मोडीत काढला. नर्मदा-रुद्रांक्ष जोडीने फेब्रुवारी, २०२३ मध्ये कैरो येथील स्पर्धेत हा विक्रम नोंदवला होता. दरम्यान, प्राथमिक फेरीमध्ये एलावेनिल वालारिवन-किरण जाधव ही जोडी ६३१.८ गुणांसह सहाव्या स्थानी राहिल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले. (Arya-Arjun)
अंतिम फेरीत मात्र आर्या-अर्जुन जोडीने चीनच्या विश्वविक्रमवीर जोडीचा १७-७ असा सहज पराभव करून सुवर्णपदक निश्चित केले. या फेरीत दोन्ही नेमबाजांनी प्रत्येकी १२ नेम साधले. यांपैकी आर्याने अकरावेळा, तर अर्जुनने बाराहीवेळा दहापेक्षा अधिक गुणांचा वेध घेतला. आर्याचा चौथा शॉट तर १०.९ गुणांचा अचूक लक्ष्यवेध होता. एकूण २४ पैकी १७ वेळा भारतीय जोडी आघाडीवर राहिली, तर चीनच्या जोडीला केवळ सातवेळा आघाडी घेता आली. नॉर्वेची जेनेट हेग ड्युस्टाड-जॉन हर्मन हेग ही जोडी अमेरिकन जोडीचा १६-१४ असा पराभव करून ब्राँझपदकाची मानकरी ठरली. (Arya-Arjun)
यापूर्वी, सुरुची सिंहने या स्पर्धेमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. भारतीय नेमबाजांनी दोन ब्राँझपदकेही पटकावल्यामुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या ४ झाली आहे.
हेही वाचा :
सुरुची सिंहचा सुवर्णनेम