Abu Azmi withdraws : ‘औरंगजेब’ वक्तव्यावर अबू आझमींची माघार

Abu Azmi withdraws

मुंबई : प्रतिनिधी :  समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता’ या वक्तव्यावर विधानसभेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाल्यावर अबु आझमी यांनी नरमाईची भूमिका घेतली. आपल्या वक्तव्याची मोडतोड केल्याचा दावा करत कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपले वक्तव्य मागे घेतो असे ते म्हणाले. विधानसभेत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमीच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत सभागृह दणाणून सोडले. (Abu Azmi withdraws)

आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता हे वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र पसरले. अर्थसकंल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतरही विधानसभा आणि विधान परिषदेच्या मात्र  अबू आझमींच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षांसह विरोधकांनी टीकेची झोड उठवली.  छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आझमी यांचा आम्ही निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात शिंदे यांनी अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. (Abu Azmi withdraws)

दोन्ही सभागृहात निवेदन करताना उपमुख्यमंत्री  शिंदे म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला मी मानाचा मुजरा करतो. विधानसभा सदस्य अबू आझमी यांच्यासारखी माणसे शरीराने भारतात राहतात. त्यांना देशाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी कसलेही देणेघेणे नाही. औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत आहे. अशांची भलामण करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. आपला इतिहास शौर्याचा, पराक्रमाचा आहे. नऊ वर्षात ६९६  जिंकणारे संभाजीराजे हे महापराक्रमी होते. ते उत्तम प्रशासक होते. औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींनी शिकावा ” असे त्यांनी सांगितले. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनाही अबू आझमींच्या वक्तव्याचा समाचार घेतला. औरंगजेबाचे गुणगाण करणाऱ्या अबू आझमीचे विधानसभेचे कामकाज सुरू असेपर्यंत निलंबनाची कारवाईची मागणी अनेक आमदारांनी केली.  निलंबनाच्या कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठकही झाली. आपल्याविरोधात निलंबनाची कारवाई होऊ शकते हे लक्षात घेतल्यावर आझमी यांनी आपले शब्द मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. (Abu Azmi withdraws)

अबू आझमींनी स्पष्टीकरण करताना असे म्हणाले, “इतिहासकारांनी लिहलेल्या पुस्तकांच्या आधारावरुन मी औरंगजेबाचे कौतुक केले. मी महापुरुषांविषयी किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केलेले नाही. पण माझ्या वक्तव्याची मोडतोड करुन कुणाला वाटत असेल की मी कुणाच्या भावना दुखावल्या आहेत तर मी माझे वक्तव्य  मागे घेतो. विधानसभेचे कामकाज सुरू रहायला पाहिजे. विधानसभेत भरपूर कामे होणार आहेत. विधानसभेत या मुद्द्यावरुन रोखणे योग्य नाही. विधानसभा रोखली तर महाराष्ट्र आणि जनतेचे सारे काम थांबून राहील” असे स्पष्टीकरण केले आहे. (Abu Azmi withdraws)

दरम्यान भाजपला वाचवण्यासाठी अबू आझमींनी वक्तव्य केले आहे, अशी टीका एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले. अबू आझमी यांची कोट्यवधींची संपत्ती आहे. ती वाचवण्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणूकीत भाजपला छुपी मदत केली होती ते जगजाहीर झाले आहे. भाजप आणि महायुतीचे सरकार अडचणीत आले होते. अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी अनेक मुद्दे होते पण आझमी यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी औरंगजेबाचा मुद्दा काढला याकडे त्यांनी लक्ष वेधले. (Abu Azmi withdraws)

हेही वाचा :

फेसबुक फ्रेंडने केला काँग्रेस कार्यकर्तीचा खून

दोन महिन्यांपूर्वी फोटो येऊनही फडणवीसांना झोप कशी लागली?

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक