गांधी, नेहरू, आंबेडकरांकडून सर्वसमावेशक भारताची संकल्पना साकार : अरुण खोरे

oplus_2

कोल्हापूर : प्रतिनिधी :  देशाच्या उत्थानासाठी कार्य करण्याचे मार्ग वेगळे असले तरी गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांचे भारताच्या व्यापक उभारणीचे उद्दिष्ट मात्र एकच होते. ते साध्य करण्यासाठी त्यांनी संघर्षातून समन्वयात्मक संवादाचा मार्ग स्वीकारला. त्यातून सर्वसमावेशक भारताची संकल्पना साकारली, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अरुण खोरे यांनी केले. (A lecture by Arun Khore)

शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि नेहरू अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महात्मा गांधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर- पंडित जवाहरलाल नेहरू: एक संवाद’ या विषयावर अरुण खोरे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे होते.

अरूण खोरे यांनी आपल्या व्याख्यानात गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्या परस्पर संबंधांचा अत्यंत विस्ताराने वेध घेतला. ते म्हणाले, गांधी आणि नेहरू, आंबेडकर यांच्यामध्ये एका पिढीचे अंतर होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही बाबतीत मतभेद होत असत. तरीही गांधी, नेहरूंमध्ये एक वेगळे अद्वैत होते. नेहरूंसाठी गांधी नेहमीच पित्यासमान राहिले. गांधीजींची ग्रामस्वराज्याची संकल्पना आणि नेहरूंचा आधुनिकतावादी दृष्टीकोन यामध्ये अंतर असले तरी गांधींच्या रचनात्मक कार्याला नेहरूंचे सदैव सहकार्य राहिले. गांधीजी आणि डॉ. आंबेडकर यांच्यामध्ये मात्र हिंदू धर्मातील वर्णाश्रम पद्धती, जातीभेद यांवरुन मोठे मतभेद होते. गांधी आहे त्या घरात राहून सुधारणा करण्याच्या मताचे होते. तर, अथक प्रयत्नांनंतरही ते घर दुरुस्त होत नसेल तर त्याची संपूर्ण फेरबांधणी करावी, असे आंबेडकरांचे मत होते. जातीय निवाड्यावरुन आमरण उपोषणापर्यंत हे संबंध ताणले गेले तरी, या दोघांच्या संवादात खंड पडला नाही. घटना समितीमध्ये आंबेडकरांचा प्रवेश ही गांधी-आंबेडकरांच्या सुसंवादाची नवी सुरवात होती. या देशातील अखिल महिलांच्या कल्याणाचा विचार करणारे हिंदू कोड बिल जसेच्या तसे लागू करण्याच्या मताचे आंबेडकर होते.  कारण पुढे त्या बिलाचे काय होईल, ही चिंता त्यांना होती. पण, काँग्रेसजनांच्या मानसिकतेची पूर्ण जाणीव असलेल्या नेहरूंनी ते टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे विचार मांडला. बाबासाहेबांनी या तळमळीतून मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, नेहरूंनी आपले शब्द खरे करताना हिंदू कोड बिल तुकड्या-तुकड्यांत लागू करून महिलांना न्याय दिला. (A lecture by Arun Khore)

अरुण  खोरे म्हणाले, गांधी-नेहरू-आंबेडकरांनी अखिल भारतीय समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे स्वप्न पाहिले. त्या उद्दिष्टपूर्तीचे त्यांचे मार्ग वेगळे असले तरी देशातील बहुजन, वंचित, दलित घटकांच्या उन्नतीची तळमळ मात्र सारखीच होती. भारतीयत्व निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांचा समन्वयात्मक संवाद हा उच्च दर्जाचा होता. त्याची फळे आजही आपण चाखत आहोत. या त्रयीने देशाच्या निर्मितीच्या कालखंडात घेतलेल्या भूमिकांचा समग्र आणि साकल्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या विचारकार्याचे विस्मरण देशाला परवडणारे नाही. (A lecture by Arun Khore)

अध्यक्षीय मनोगतात डॉ. शिंदे म्हणाले, तत्कालीन परिस्थितीमध्ये गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्यासमोरील अग्रक्रमाचे मुद्दे वेगवेगळे होते. पण राष्ट्रनिर्मितीचे ध्येय मात्र समान होते. शोषणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोनही वेगळा होता. आज या महामानवांच्या विचारांना संकुचित आणि बंदिस्त करण्याचे प्रयत्न विविध स्तरांवर सुरू आहेत. ते उल्लंघून त्याच्याकडे पुन्हा नव्याने पाहणे आवश्यक आहे. (A lecture by Arun Khore)

डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मतीन शेख यांनी सूत्रसंचालन केले. सोनाली जाधव यांनी आभार मानले. यावेळी सौ. शोभा खोरे, डॉ. सुनीलकुमार लवटे, व्यंकाप्पा भोसले, दशरथ पारेकर, जयसिंग पाटील, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. ओमप्रकाश कलमे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते.

Related posts

अल्पसंख्याक मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्या : सुनेत्रा  पवार 

मराठी सक्तीचीच या मुख्यमंत्र्यांच्या  घोषणेचे ‘म्यांव’ का झाले?;  संजय राऊतचा हल्लाबोल 

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘व्हीएसआर’ला १४५ कोटींचे वाटप