५० हजार लाचेच्या मागणीप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यासह कॉन्स्टेबलवर गुन्हा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जनावरे वाहतूक करणारा टेम्पो वाहतूक करणाऱ्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पन्नास हजार लाच मागितल्याप्रकरणी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस कॉन्स्टेबल या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक शंकर जाधव (वय ४४, रा. बापट कॅम्प कोल्हापूर. मुळ गाव पेठ किनाई, ता. कोरेगांव, जि.सातारा) आणि हेड कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे (वय ३३, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले. जि. कोल्हापूर) या दोघांना अटक केली आहे. तर गुन्हा दाखल झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगारे (रा. निगडेवाडी, उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर.  मुळ गाव उमरगा चिवरी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हे ट्रेनिंगला गेले असल्याने त्यांच्यावरील कारवाई ट्रेनिंग झाल्यानंतर होणार आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. या कारवाईतील तक्रार व त्यांच्या मित्राचा जनावरे वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुन्ह्यात पोलिसांनी तक्रारदाराचा टेंपो जप्त केला आहे. गुन्ह्यात जप्त केलेला टेंपो कोर्टातून सोडवण्यासाठी मदत करण्यासाठी गुन्ह्याचे तपास अधिकारी  पोलिस उपनिरीक्षक शिरगारे यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. तर गुन्ह्यातील तपासात मदत करण्यासाठी गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांनी तक्रारदारांच्या मित्राकडे ३५ हजार रुपये लाचचेची मागणी फोनवरुन केली.

तक्रारदाराने लाचेसंदर्भात कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अर्ज केला. या अर्जाची पडताळणी पोलिसांनी केली. पडताळणी करताना गुन्ह्यातील टेंपो कोर्टातून सोडवून देण्यासाठी उपनिरीक्षक शिरगारे यांनी तक्रारदाराला फोन करुन पोलिस कर्मचारी कांबळे यांची भेट घेण्यास सांगितले. तक्रारदाराने कांबळे यांची भेट घेतली असता कांबळे यांनी तक्रारदाराच्या समक्ष शिरगारे यांना मोबाईलवर कॉल केला. शिरगारे साहेबांच्यावतीने कांबळे  यांनी लाचेच्या रक्कमेत २० हजार रुपयांमध्ये तडजोड करत १५ हजारांची लाच मागितली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांनी गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराच्या सहकाऱ्यांकडून यापूर्वीच पैसे घेतल्याची कबुली देत राहिलेले ३५ हजार रुपयांची मागणी तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्याकडे केली. तसेच टेंपो सोडवण्यासाठी शिरगारेंना दहा हजार रुपये द्या अशी मागणी दीपक जाधव यांनी केल्याचे निष्पण्ण झाले. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव आणि पोलिस कॉन्स्टेबल कांबळे अटक केली.

कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उप अधीक्षक वैष्णवी पाटील याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंके यांच्या पथकाने कारवाई केली.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी