Home » Blog » केंद्राला वांगचुकचा बळी हवा आहे; राज ठाकरेंची भाजपावर टीका

केंद्राला वांगचुकचा बळी हवा आहे; राज ठाकरेंची भाजपावर टीका

by प्रतिनिधी
0 comments
Raj Thackeray supports Sonam Wangchuk's hunger strike

जमीर काझी :  मुंबई : नीट परीक्षेतील गैरप्रकाराबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या १९ दिवसापासून दिल्लीत जंतर-मंतर येथे आंदोलनाला बसलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी आता देशभरातून आवाज बुलंद होत आहे. विविध राजकीय पक्षाबरोबर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना भाजप व केंद्र सरकारवर कडाडून हल्लाबोल केला आहे. श्रीरामाच्या तिजोरीची लूट होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारला सोनम वांगचुक यांचा बळी घ्यायचा आहे ,असा हल्लाबोल त्यांनी केला असून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने हस्तक्षेप करून  त्यांच्या मागणीची पूर्तता करावी अशी मागणी केली आहे. (Raj Thackeray supports Sonam Wangchuk’s hunger strike)

राज ठाकरे यांनी वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,  सोनम वांगचुक यांच्या  तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे.

श्रीराम मंदिरातील तिजोरी लुटताना सरकार शांतपणे बघ् शकतं….

हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ? ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकिय आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे. (Raj Thackeray supports Sonam Wangchuk’s hunger strike)

लडाखमध्ये उपोषण, आंदोलन करुनही सरकारने काही केलं नाही

भाजपाच्या दुटप्पी भूमिका उघड करताना त्यांनी नमूद केले आहे की, सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो.  वांगचुक यांना २०१८ साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेतले होते. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो, हे दाखवायचं होतं म्हणून  ते चालले. लडाख  स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटले. पण नंतर त्यांच्या  लक्षात आलं की ,यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही.

अमर्याद सत्तेमुळे सत्ताधारी निर्ढावलेत

आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता. 

निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे. 

पंतप्रधानांनी नीट परीक्षेत लक्ष घालावे

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की या प्रश्नात लक्ष घाला. नीट परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. आणि हा विषय राजकीय नाहीये. हा विषय सामाजिक आहे. नीट परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे अनेक त्रासातून गेले आहेत.

 सध्या पंडित नेहरूंपेक्षा किती जास्त दिवस तुम्ही पंतप्रधान पदावर बसले आहात याचा आनंद व्यक्त केला जात आहे . किती दिवस पंतप्रधानपद हा एक आकडा आहे दुसरं काही नसून विषयावर  ठाम भूमिका घेऊन कृती केलीत तर त्या आकड्याला अर्थ आहे. आणि तरच तुम्हाला पुढची पिढी लक्षात ठेवेल. नाहीतर तो आकडा काय कामाचा ज्याने देशाच्या हातात काहीच पडत नाही. (Raj Thackeray supports Sonam Wangchuk’s hunger strike)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!