पॅरिस : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पेनकडून ०-२ असा पराभव स्वीकारल्यानंतर फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापे याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना पराभवही ताठ मानेने स्वीकारायला हवा, असे म्हटले आहे. आम्ही इतिहास घडवण्याची संधी गमावली, असे निराश झालेला एम्बापे म्हणाला. (Mbappe shocked after France defeat)
स्पर्धेत आतापर्यंत आठ गोल करणाऱ्या २७ वर्षीय एम्बापेने आता काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रिअल माद्रिदकडून नव्या हंगामाची तयारी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. आपल्या संघाच्या कामगिरीवर कठोर शब्दांत टीका करतानाच त्याने स्पेनच्या संघाचे कौतुक केले. स्पेनने सुरुवातीपासूनच तांत्रिकदृष्ट्या सरस खेळ करत फ्रान्सच्या बलस्थानांना निष्प्रभ केले आणि आमच्या उणिवांचा अचूक फायदा घेत अंतिम फेरी गाठली, असे तो म्हणाला.
सामन्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना एम्बापेने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “आम्हाला जसा खेळ करायचा होता तसे आम्ही खेळलोच नाही. डावपेच, तांत्रिक कौशल्य आणि एकूणच कामगिरी या सर्व बाबतीत आम्ही अपयशी ठरलो. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अपेक्षित खेळ करता आला नाही, तर विजय मिळवता येत नाही.” (Mbappe shocked after France defeat)
खेळावर नियंत्रण ठेवण्यात स्पेन सक्षम
स्पेनविरुद्धची रणनीती स्पष्ट करताना तो म्हणाला, “त्यांना त्यांच्या संथ आणि नियंत्रित खेळाची लय सापडू नये म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच आक्रमक प्रेसिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र खेळावर नियंत्रण ठेवण्यात स्पेन आमच्यापेक्षा अधिक सक्षम आहे आणि आम्ही त्यांना रोखण्यात अपयशी ठरलो.” (Mbappe shocked after France defeat)
एम्बापेने सामन्यातील तांत्रिक बाबींचाही उल्लेख केला. “मधल्या फळीत आम्ही वारंवार ३ विरुद्ध २ अशा प्रतिकूल परिस्थितीत अडकलो. स्पेनसारख्या संघाविरुद्ध ही मोठी समस्या ठरते. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे पराभव. आमचे चेंडूवरील नियंत्रण आणि खेळातील हालचाली विश्वचषक उपांत्य फेरीच्या दर्जाला साजेशा नव्हत्या,” असे तो म्हणाला.
“अंतिम फेरी गाठणे हे आमचे स्वप्न होते. देशाला पुन्हा एकदा स्वप्न पाहण्याची आणि इतिहास घडविण्याची संधी द्यायची होती. पण ते शक्य झाले नाही,” अशी खंतही त्याने व्यक्त केली. (Mbappe shocked after France defeat)
“जिंकताना जसे ताठ मानेने विजय स्वीकारतो, तसेच पराभवही ताठ मानेने स्वीकारायला हवा. सध्या मात्र आमच्या सर्वांसाठी हा मोठा धक्का आहे. आमची निराशा शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे,” असे तो म्हणाला.
“आता स्वतःला सावरावे लागेल, विश्रांती घेऊन पुढच्या आव्हानासाठी तयार व्हावे लागेल. फुटबॉल कोणासाठीही थांबत नाही. या अपयशातून धडा घेत आम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल,” असेही एम्बापेने स्पष्ट केले.