पुणे : प्रतिनिधी : जेजुरी टोल नाक्याजवळ दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात तीन वारकऱ्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानंतर आरोग्य विभागाने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. (Three Warkaris killed in an accident)
या अपघातात सांगली जिल्ह्यातील दिंडीत सहभागी झालेल्या राजश्री शंकर भोसले (वय ६२, रा. डिग्रज), माधवी राजाराम सरवडे (वय ५५, रा. मालगाव) आणि नंदा पवार (वय ५२, रा. डिग्रज) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत वारकऱ्यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय, जेजुरी येथे तातडीने करण्यात येत असून शासनामार्फत त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जखमींवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार
अपघातात जखमी झालेल्या गीताबाई शेलार (वय ७०), शैलजा दिनकर जगताप (वय ६०) आणि मंगल विलास पाटील (वय ७०) यांच्यासह अन्य जखमी वारकऱ्यांवर ग्रामीण रुग्णालय, जेजुरी येथे उपचार सुरू आहेत. तसेच सात गंभीर जखमी वारकऱ्यांना जेजुरी येथील आनंदी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यापैकी एका अतिगंभीर रुग्णाला पुढील उपचारासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित करण्यात आले आहे. सर्व जखमी वारकऱ्यांवर महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार करण्यात येत असून आवश्यक औषधे, तपासण्या आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडून रुग्णांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. (Three Warkaris killed in an accident)
आरोग्य विभाग वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर
आरोग्य मंत्र्यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप साळवे तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जखमी वारकऱ्यांना तातडीने उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून आरोग्य सेवा अखंडपणे सुरू आहे. जखमी वारकऱ्यांवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेद्वारे केले जात आहेत.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शासन आणि आरोग्य विभाग प्रत्येक वारकऱ्याच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे स्पष्ट केले. वारीदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा तत्काळ मदतीसाठी सज्ज आहे. (Three Warkaris killed in an accident)