मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसंघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी भाषेच्या मुद्द्यावर केलेल्या विधानाचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भागवतांच्या कार्यक्रमाला आलेली मंडळी ही मोदींच्या भितीमुळे रटाळ प्रवचणाला आली होती, असा टोलाही मारला.
मुंबईत भागवतांची दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली होती. राज ठाकरे यांनी मोहन भागवताना सोशल मिडियावरुन खडे बोल सुनावले आहेत. संघाच्या कामाबद्दल आदर आहे, पण अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये असा सल्लाही राज ठाकरेंनी भागवतांना दिला आहे.
मोदींच्या भितीमुळे रटाळ प्रवनाचाला उपस्थिती
‘एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी असे म्हटले आहे की, “८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचे विधान केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या !” असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.
मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो! भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे. दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे. ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का?” असा प्रश्नही राज ठाकरेंनी भागवत यांना विचारला आहे. (Raj Thackeray’s criticism of Mohan Bhagwat)
गुजरातमध्ये समरसतेचे धडे का दिले नाहीत?
“जेव्हा देशातील चार, पाच राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेव्हा पळवून लावले, तेव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ?” असेही सवाल भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी मोहन भागवत यांना विचारले आहेत.
अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका
मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत. म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे, अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला? संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये आणि पडायचेच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा.” असे आव्हानच राज ठाकरेंनी सरसंघचालकांना दिले आहे. (Raj Thackeray’s criticism of Mohan Bhagwat)
बीफ व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला कधी खडे बोल सुनावणार
“यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितले आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणे शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसे मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरू आहे, उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे, तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश नवव्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचे राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार?” असे म्हणत राज ठाकरेंनी सरसंघचालक मोहन भागवत यांना खडेबोल सुनावले आहेत.
“असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील !” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Raj Thackeray’s criticism of Mohan Bhagwat)