Home » Blog » अफवांच्या बाजारात सुप्रिया सुळे, जयंत पाटील मैदानात

अफवांच्या बाजारात सुप्रिया सुळे, जयंत पाटील मैदानात

by प्रतिनिधी
0 comments

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासंदर्भात गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी बुधवारी सकाळी थेट पक्षाच्या लोकसभेतील नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील यांना मैदानात उतरावे लागले. पक्ष एनडीएसोबत जाणार, मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा देणार आणि जयंत पाटील अर्थमंत्री होणार यासंदर्भातील बातम्यांचा स्पष्टपणे इन्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देशात इंडिया आघाडीसोबत आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. (NCP Sharad Pawar party controversy)

जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी भेट

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी सुमारे दीड तास झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही उपस्थित असल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांनी दिल्या. त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, तसेच जयंत पाटील हे राज्याचे अर्थमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची चर्चा सुरू झाली.

दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनात येणा-या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याची बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली. त्यासंदर्भातही मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्व थरांमध्ये या बातम्यांमुळे अस्वस्थता पसरली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेसंदर्भातही संशय निर्माण झाला होता. (NCP Sharad Pawar party controversy)

ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष अपात्रतेचा मुद्दा

या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी बुधवारी सकाळी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली. ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांना जिल्हाधिका-यांनी अपात्र ठरवले आहे, त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र त्याठिकाणी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भेट झाली नाही, असे स्पष्ट करून जयंत पाटील म्हणाले, ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना जिल्हाधिका-यांनी अन्यायकारक रितीने अपात्र ठरवले आहे, त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. त्यासंदर्भात नगरविकास मंत्र्यांकडे अपील केले आहे.

एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी काल नगराध्यक्षही मुंबईत आले होते. परंतु एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. दरम्यान याच विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. त्याबाबत लवकर न कळल्यामुळे नगराध्यक्ष परत गेले. रात्री सव्वादहा-साडेदहा वाजण्याच्या सुमारास येण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा निरोप आला, त्यामुळे मी भेटीसाठी गेलो.

पटेल-तटकरेंची भेट नाही

जयंत पाटील म्हणाले, मी वर्षा बंगल्यावर हॉलमध्ये थांबलो असताना मुख्यमंत्री बाहेर आले. त्यांची काही महत्त्वाची बैठक सुरू होती. तरीही त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले आणि माहिती घेऊन दोन दिवसांत कळवतो असे म्हणाले. यादरम्यान माझी तिथे अन्य कुणाशीही भेट झाली नाही. तिथून घरी येऊन फुटबॉलचा सामना पाहात असताना बरेच फोन आले, ते यासंदर्भात विचारणा करण्यासाठी होते.

ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांसंबंधीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालायचा होता. दुसरे काही कामही नव्हते आणि कुठला कागदही माझ्याकडे नव्हता, असे जयंत पाटील म्हणाले. (NCP Sharad Pawar party controversy)

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी झालेल्या भेटीचा स्पष्ट शब्दात इन्कार करून जयंत पाटील म्हणाले, आमची भेट झाल्याचे मी बातम्यांमधूनच ऐकले. दोन्ही पक्षांचे विलिनीकरण वगैरे चर्चेचा प्रश्न उदभवत नाही. अजितदादांच्या निधनानंतर अशी कोणतीही चर्चा कुणाबरोबरही झाली नाही, त्यामुळं ती चर्चा थांबली असा शब्दही वापरता येणार नाही.

शरद पवारांसोबत सगळे ठाम

भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासंदर्भातील भेटीचा खुलासाही जयंत पाटील यांनी केला. ते म्हणाले, त्यावेळी उबेरॉय हॉटेलमध्ये संयुक्त संसदीय समितीची बैठक होती, तिथे बँकिंग क्षेत्रातील काही लोकांना भेटायचे असल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी मला बोलावले होते. तिथे तावडे भेटले त्यांच्यासोबत कॉफी घेतली.

आपण अर्थमंत्री होणार असल्याच्या बातम्यांचेही त्यांनी खंडन करून जयंत पाटील म्हणाले, आमच्या पक्षाचे सर्व खासदार, आमदार शरद पवार यांच्यामागे ठामपणे आहेत. वारंवार आमच्यासंदर्भात या चर्चा का होताहेत, याचे मात्र निश्चितपणे वाईट वाटते. आमच्या पक्षात अंतर्गत कोणतीही घालमेल नाही. अस्वस्थता नाही. पटेल-तटकरे यांची भेट रेवती सुळेंच्या लग्नात झाली होती, तीही उभ्या उभ्या पाच मिनिटे भेट झाली होती.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष इंडिया आघाडीसोबत

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची बातमी लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली. पाठोपाठ त्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी अधिकृत माहिती दिल्याचे वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांमधून सांगण्यात येऊ लागले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे दुपारी बारा वाजता त्यासंदर्भात स्पष्टीकरण देणार असल्याचे सांगितले. (NCP Sharad Pawar party controversy)

सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, मी अधिकृतपणे कुठल्याही वृत्तवाहिनीशी किंवा वृत्तपत्राशी बोललेले नाही. पक्षाच्या धोरणाबद्दल ज्या बातम्या येत आहेत, त्या सूत्रांकरवी दिल्या जात आहेत आणि त्या धादांत खोट्या आहेत. आमच्या पक्षासंदर्भात गैरसमज पसरवणा-या आहेत. आमच्या पक्षासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये कोणतेही गैरसमज असू नयेत म्हणून स्पष्टीकरण देत आहे.

अमित शाह यांच्यासोबत बैठक

पत्रकार परिषदेच्या आधी आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमच्या पक्षाचे नेते जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगून सुप्रिया सुळे म्हणाल्या, मतदारसंघ पुनर्रनेचे विधेयक अद्याप आमच्यासमोर आलेले नाही. ते आल्यानंतर त्याचा अभ्यास करून चोवीस तासात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.

महिला आरक्षण विधेयक संसदेत एकमताने मंजूर झाल्याची आठवण करून देऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासंदर्भात सत्ताधारी पक्ष विविध पक्षांशी चर्चा करीत आहे. किरण रिजिजू यांनी यासंदर्भात बोलावलेल्या बैठकीला, मी, शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि एमआयएणचे असदुद्दीन ओवेसी उपस्थित होतो. (NCP Sharad Pawar party controversy)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेसुद्धा उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस, डीएमके आणि समाजवादी काँग्रेसशी चर्चा झाल्याचे सांगितले. त्यानुसार सरसकट प्रत्येक राज्यात ५० टक्के जागा वाढवण्यासंदर्भातला आमचा प्रस्ताव आहे. त्यानुसार महाराष्ट्रातल्या जाग ४८ वरून ७२ होतील. किंवा उत्तर प्रदेशच्या ८०वरून १२० होतील. लोकसंख्येचा निकष बाजूला ठेवल्यास दक्षिणेतील राज्यांचा रोष राहणार नाही. महाराष्ट्राच्या ७२ पैकी तीन जागा एससी, एसटीसाठी राखीव राहतील. उरलेल्या ६९ पैकी ३३ टक्के महिलांसाठी आणि उर्वरित खुल्या राहतील. त्यावेळी आम्ही सांगितले की, ५० टक्के जागा सरसकट वाढल्या तर कुणाचा विरोध राहणार नाही. आम्ही इंडिया आघाडीमध्ये यासंदर्भात चर्चा करतो आणि कळवतो असे सांगितले. त्यावेळीही आमचं मत असं होतं की, सगळ्यांना एकत्र बोलवा. त्यानंतर मग काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला पत्र लिहिले. ५० टक्क्यांचा प्रस्ताव बरा वाटतो, परंतु डिलिमिटेशनची प्रक्रिया काय असेल. त्याचा फॉर्म्यूला काय, त्याचं उत्तर आम्हाला हवे होते, ते सरकारकडे नव्हते. विधेयक आले तेव्हा मला स्वतःला धक्का बसला, कारण त्यामध्ये ५० टक्क्यांचा उल्लेख नव्हता.

एनडीएसोबत जाणे, विलिनीकरणाच्या निव्वळ अफवा

सरसकट ५० टक्के जागावाढीचे विधेयकच अद्याप आलेले नाही, त्यामुळे त्याला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट करून सुप्रिया सुळे म्हणाल्या, सरकारने प्रस्ताव द्यावा, त्यासंदर्भात इंडिया आघाडीतील पक्षांशी चर्चा करून जनतेच्या हिताचा निर्णय़ घेतला जाईल, आमची चर्चेचीही तयारी आहे, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. आणि तीच इंडिया आघाडीची भूमिका आहे. डिलिमिटेशनची प्रक्रिया काय असेल, फॉर्म्यूला काय असेल हेही आम्हाला कळले पाहिजे. (NCP Sharad Pawar party controversy)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विलिनीकरण किंवा नव्या आघाडीसंदर्भात त्या म्हणाल्या, आम्ही इंडिया आघाडीत काम करतोय. आम्हाल एनडीएचा पाठिंब्याचा प्रस्ताव आलेला नाही. किंवा काँग्रेसकडूनही विलिनीकरणाचा प्रस्ताव आलेला नाही. शरद पवार यांनी विधानभवनात एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये जाणे हा योगायोग होता, त्याचे राजकीय अर्थ काढू नयेत.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!