WPL Auction : सोळावर्षीय कमिलिनी बनली कोट्यधीश

बेंगळुरू : विमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी आज (दि.१५) खेळाडूंची लिलावप्रक्रिया पार पडली. यामध्ये तमिळनाडूची सोळावर्षीय खेळाडू जी. कमलिनी हिला मुंबई इंडियन्स संघाने तब्बल १.६ कोटी रुपये मोजून करारबद्ध केले. भारताच्या सिमरन शेख, प्रमिला रावत या खेळाडूंसाठीही कोट्यवधींची बोली लागली. (WPL Auction)

या लिलावासाठी ९१ भारतीय आणि २९ परदेशी अशा एकूण १२८ खेळाडू उपलब्ध होत्या. सुमारे दोन तास चाललेल्या या लिलावप्रक्रियेमध्ये भारताची सिमरन शेख ही सर्वांत महागडी खेळाडू ठरली. गुजरात जायंट्सने तिला १.९० कोटी रुपयांना करारबद्ध केले. लिलावामध्ये तिची मूळ किंमत १० लाख इतकी असताना तिला तब्बल एकोणीस पट किमतीला करारबद्ध करण्यात आले. वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू डिएंड्रा डॉटिन ही सर्वाधिक किंमत मिळालेली परदेशी खेळाडू ठरली. तिलाही गुजरात संघानेच १.७० कोटींना करारबद्ध केले. तिची मूळ किंमत ५० लाख इतकी होती.

मुंबई संघात आलेल्या कमलिनीला मूळ किमतीच्या सोळा पट किमतीचा करार लाभला. तिने यावर्षी तमिळनाडूमधील १९ वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धेत ८ सामन्यांत ३११ धावा फटकावल्या होत्या. त्याचबरोबर भारत ब संघातर्फे खेळताना तिने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध ७९ धावांची खेळी केली होती. पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.  उत्तराखंडची लेगस्पिनर प्रमिला रावतसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १.२० कोटी रुपये इतकी किंमत मोजली. यावर्षी प्रथमच खेळवण्यात आलेल्या उत्तराखंड प्रीमियर लीगमध्ये ती मसुरी थंडर्स संघातर्फे खेळली होती.

कराराविना राहिलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडू हेसुद्धा या लिलावाचे एक वैशिष्ट्य ठरले. भारताच्या तेजल हसबनीस, स्नेह राणा, मानसी जोशी, पूनम यादव या खेळाडूंना कोणत्याही संघाने करारबद्ध केले नाही. इंग्लंडची कॅप्टन हिथर नाइट, लॉरेन बेल, सारा ग्लेन, ऑस्ट्रेलियाची डार्सी ब्राउन, न्यूझीलंडची रोझमेरी माएर या खेळाडूही कराराविना राहिल्या. (WPL Auction)

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत