Para-Athletics : जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स स्पर्धा दिल्लीत

नवी दिल्ली : दिव्यांग खेळाडूंची सर्वांत मोठी स्पर्धा असणारी जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स स्पर्धा पुढील वर्षी दिल्लीमध्ये रंगणार आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. (Para-athletics)

जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स संघटनेने (डब्ल्यूपीए) शुक्रवारी भारताच्या यजमानपदाबाबत घोषणा केली. भारताला प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. आतापर्यंत ११ वेळा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यापूर्वी तीनवेळा आशियाई शहरांमध्ये ही स्पर्धा रंगली होती. २०१५ साली कतारमधील दोहा येथे, २०१९ मध्ये दुबई येथे आणि २०२४ मध्ये जपानमधील कोबे येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. (Para-athletics)

डब्ल्यूपीएचे अध्यक्ष पॉल फिट्झगेराल्ड यांनी भारतात ही स्पर्धा आयोजित होणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “मागील दशकभरामध्ये भारताने पॅरा-ॲथलेटिक्समध्ये मोठी झेप घेतली आहे. २०१५ साली दोहा स्पर्धेमध्ये भारताला केवळ दोन रौप्यपदके जिंकता आली होती. या वर्षी मात्र कोबे येथील स्पर्धेमध्ये भारताने सहा सुवर्णांसह एकूण १७ पदके जिंकली आहेत. मोठ्या स्पर्धेच्या आयोजनामुळे संबंधित क्रीडाक्षेत्रावर होणारा परिणाम आम्ही यापूर्वी पाहिला आहे. त्यामुळेच, पुढील वर्षी जगातील सर्वोत्तम खेळाडूंना भारतात खेळताना पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत,” असे फिट्झगेराल्ड म्हणाले. (Para-athletics)

दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्येच पुढील वर्षी मार्चमध्ये जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स ग्रांप्री स्पर्धाही रंगणार आहे. ११ ते १३ मार्चदरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात येईल.

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत