तुळजापूरचे दोन महाद्वार पाडणार?

तुळजापूर  : प्रतिनिधी : तुळजाभवानी मंदिराच्या दोन्ही महाद्वाराचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ होणार आहे. ‘स्ट्रक्चरल ऑडिट’अहवाल नकारात्मक आला, तर तुळजाभवानी मंदिराची दोन्ही महाद्वारे पडून १०८ फुटी नवे महाद्वार बांधले जाणार आहेत, तर ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा अहवाल सकारात्मक आला तर दोन्ही महाद्वारांमध्ये नवीन महाद्वार तयार केले  जाणार आहे. यासंदर्भातील माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली आहे.

तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या राजमाता जिजाऊ आणि राजे शहाजी महाद्वाराचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. या महाद्वारांचे बांधकाम अजून किती दिवस टिकू शकते, याचा अहवाल आल्यानंतर नवीन महाद्वाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ऑडिट रिपोर्ट नकारात्मक आला, तर दोन्ही महाद्वारे पाडून १०८ फुटांचे नवे महाद्वार बांधले जाणार आहे, तर ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ अहवाल सकारात्मक आला तर दोन्ही महाद्वाराच्या मध्ये नवीन महाद्वार बांधले जाणार आहे.

तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरातील नूतनीकरणाच्या विविध विकासात्मक कामास मंदिर संस्थानकडून पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली सुरुवात करण्यात आली आहे. एकूण ५८ कोटी १२ लाख रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तीन टप्प्यांमध्ये हे काम होणार आहे. या कामादरम्यान तुळजाभवानी मंदिर परिसरातील काही वास्तू हटवल्या जाणार आहेत. यादरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही याचा विचार करून कामाची वर्गवारी करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कामाबाबत स्थानिक नागरिक, पुजारी, व्यापारी यांच्याशी चर्चा करून त्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या आहेत.

मंदिराचा इतिहास

तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिराचा इतिहास हा ९०० वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते. यादव कालीन बांधलेल्या भवानी मंदिराचा छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केला. तुळजाभवानी मातेच्या मंदिराची वास्तू ही चालुक्य काळातील हेमाडपंथी शैलीची आहे. मंदिर परिसरातील उत्तम कलाकुसर हे स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे. भवानी मंदिराच्या परिसरात उत्कृष्ट कोरीवकाम, शिल्पे आणि सुंदर नक्षीकाम केलेले विविध दगडी खांब आहेत.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ