मुंबई : प्रतिनिधी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उघडपणे पाठिंबा देऊन अल्पसंख्याक समाजाची मते त्यांच्या पारड्यात टाकण्यात मोलाची भूमिका बजावणारा ऑल इंडिया उलेमा बोर्ड आता त्यांच्याशी पंगा घेण्याच्या पवित्र्यात आहे. बाबरी मशिद पाडण्याचे उदात्तीकरण करण्याची ठाकरे गटाची भूमिका उलेमा बोर्डच्या पचनी पडलेली नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ठाकरे गटाची भविष्यातील राजकारणाची दिशा जाणून घ्यावी. त्यांना हिंदुत्वावरच भर द्यायचा असेल तर समाजवादी पार्टीप्रमाणेच त्यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेपासून बाजूला व्हावे, अशी आक्रमक भूमिका उलेमा बोर्डने घेतली आहे. (ulema board meet)
६ डिसेंबर रोजी ठाकरे गटाकडून त्यांचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रात जाहिराती देऊन आणि बॅनर लावून बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेबद्दल अभिमान व्यक्त केला होता. उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवर पोस्ट करून या घटनेचा अभिमान व्यक्त केला होता. त्याबाबत ‘सपा’चे अबू आझमी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. महाविकास आघाडीसह ठाकरे गटाला विधानसभेत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. ९७ जागा लढवून जेमतेम २० आमदार निवडून आले. त्यामागील विविध कारणांबरोबरच हिंदूत्वांच्या मुद्यापासून बाजूला गेल्याचा फटका बसल्याचे पक्षातील काही नेत्यांचे मत आहे.(ulema board meet)
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा आक्रमक हिंदुत्ववादी भुमिका घेण्याचा आग्रह करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया उलेमा बोर्डच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यामध्ये ठाकरे गटाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. महाविकास आघाडीची स्थापना करताना कोणत्याही परिस्थितीत अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशी अट घालण्यात आली होती. (ulema board meet)
ठाकरे गटाच्या आमदारांपैकी बहुतांश जागा या मुस्लिम बहुल भागातील आहेत. मुस्लिम अनेकदा भावनेपोटी मतदान करतात, त्यामुळे मुस्लिम नेतृत्व उदयास येत नाही, असे असताना ठाकरे गटाच्या कृतीतून त्यांनी मुद्दाम मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचे सिद्ध होते. उद्धव ठाकरेंची शिवसेना मुस्लिमविरोधी राजकारणावर आधारित असून ती कधीही आपल्या कारवायांपासून दूर राहणार नाही. त्यामुळे काँग्रेस व शरद पवार गटाने त्याच्यापासून अलिप्त व्हावे, सांप्रदायिक शक्तींना दूर करण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांना २०१९ पासून मुस्लिम समाजाने मोठी साथ दिली आहे. मात्र ते जर पुन्हा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याला प्रोत्साहन देत असतील तर महाविकास आघाडीपासून त्यांना बाजूला करणे योग्य राहील. शरद पवार व काँग्रेसने त्याबाबत त्यांच्याकडून एकदा स्पष्टीकरण घ्यावे अन्यथा अल्पसंख्याक समाज त्यांच्याही पाठीशी राहणार नाही, असा इशारा ऑल इंडिया उलेमा बोर्डचे सरचिटणीस मौलाना अल्लामा बुनई हसानी यांनी दिला आहे.